Pages

Monday, September 13, 2010

आधुनिक पोल्ट्री व्यवसायाने दिली उभारी / Modern poultry business.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी खेडी विकासासाठी खेडय़ांकडे चला हा संदेश दिला होता. या संदेशाचा आधार घेऊन राज्य तसेच केंद्र सरकारच्या ग्रामीण विकासाच्या विविध योजना सुरु आहेत. शिक्षण घेऊन युवकांनी शहराकडे धाव न घेता खेडेगावातच रोजगार निर्माण व्हावा यासाठी शासनाने रोजगार निर्मितीचे प्रयत्न सुरु केले आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील ठाणेपाडा येथील विश्वनाथ आत्माराम सूर्यवंशी या आदिवासी युवकाने बीज भांडवल योजनेच्या पैशातून व्यवसाय सुरु केला आहे. या व्यवसायामुळे विश्वनाथ समाधानी असून इतर युवकांना तो प्रेरणादायक ठरत आहे.


स्पर्धेच्या युगात शिक्षण घेऊन नोकरीसाठी वणवण भटकण्यापेक्षा गावातच रोजगार शोधावा यासाठी विश्वनाथने प्रयत्न केला. १२ वी पर्यंत शिक्षण घेऊन तो स्वयंरोजगाराच्या शोधात असताना मोठय़ा भावाच्या मित्राचा डांग सैंदाणे (नाशिक) येथील पोल्ट्री व्यवसायाने त्याला प्रभावित केले. तेथे काही दिवस राहून त्याने पोल्ट्री व्यवसायाचा अनुभव घेतला. जिल्हा उद्योग केंद्र नंदुरबारचे महाव्यवस्थापक एस.पी. वसावे यांनी बीज भांडवल योजनेची माहिती दिली. त्यातून विश्वनाथला १ लाख २१ हजार रुपये कर्ज मंजूर झाले. तसेच सेंट्रल बँक आष्टे येथून ४ लाख ९५ हजार रुपयांचे कर्ज घेऊन दोन वर्षापासून त्याने स्वत:च्या शेतातच पोल्ट्री व्यवसाय सुरु केला आहे.

शेतात २५ X २९ फुट आकाराची दोन पत्र्याची शेड उभी केली आहेत. शेडच्या भोवती लोखंडी जाळ्या बसविल्या आहेत. मालेगाव येथील सगुणा कंपनीकडून एक दिवसाची ९ हजार २०० बॉयलर सगुणा जातीच्या कोंबडीची पिले आणली. कोंबडीची पिले मोठी झाल्यावर त्याच्या विक्रीसाठी कंपनीशी करार केला आहे. त्यामुळे बाजारपेठेची सोय झाली आहे. बॉयलर सगुणी कोंबडीची जात ही मांसाहारी खवय्यांसाठी चवदार असल्याचे विश्वनाथने सांगितले. या कोंबडय़ा अंडी देत नाहीत. सद्या ९ हजार २०० बॉयलरची पिले या शेडमध्ये आहेत. पोल्ट्री फॉर्मला भेट दिली तेव्हा ही पिले १७ दिवसांची होती आणि प्रत्येकाचे वजन अर्ध्या किलोचे होते.

या बॉयलर कोंबडय़ांच्या पिलांचे केवळ ४५ दिवस पालन पोषण करावे लागते. या कालावधीत प्रत्येक कोंबडीचे वजन सरासरी २ किलो २०० ग्रॅमचे होते. सगुणा कंपनी ४५ दिवसाच्या कोंबडय़ा विक्रीसाठी मोठय़ा विक्रेत्यांकडे संपर्क साधते. यासाठी करारानुसार प्रत्येक किलोमागे ३ रुपये २५ पैसे विश्वनाथला कमिशन मिळते. मागच्या खेपेला त्यांनी सर्व मिळून १८ टन वजनाच्या ९ हजार ८०० कोंबडय़ा विक्रीस पाठविल्या. त्यातून ६० हजाराचे उत्पन्न मिळाले. कोंबडीचे खाद्य आधुनिक पध्दतीने पुरविले जाते. पिण्याच्या पाण्यासाठी ड्रिकर यंत्राची सोय केली आहे. शेडमध्ये विष्ठेपासून खत बनविले जाते. यासाठी गव्हाळे, भाताचा तूस, शेंगाचे टरफले यांचे जमिनीवर आच्छादन केले जाते. ४५ दिवसानंतर कोंबडय़ांची विक्री झाल्यावर विष्ठेपासून मिळालेले खत गोळा करुन जमिनीवर पाण्याचा फवारा मारुन ते स्वच्छ केले जाते.

वर्षातून ४५ दिवसाचे असे पाच वेळा उत्पन्न मिळविता येते. प्रत्येक वेळी ८० किलो खाद्याच्या ४२५ गोण्या लागतात. विहिरीचे पाणी एका टाकीमध्ये भरुन ते ड्रींकरमार्फत कोंबडय़ांना पिण्यासाठी पुरविले जाते. कोंबडय़ांच्या देखभालीसाठी २ मजूर मासिक वेतनावर ठेवण्यात आले आहेत. वीजनियमित मिळावी म्हणून भारनियमनाच्या कालावधीत जनरेटरची सोय करण्यात आली आहे. दोन वर्षाच्या कालावधीत सध्या ९ हजार २०० कोंबडय़ांची ९ वी बॅच सुरु आहे. स्वत:च्या दीड एकर शेत जमिनीत इतर पिकेही घेतली जातात.

पोल्ट्री आणि शेतीमुळे विश्वनाथ आणि परिवाराला शेतीतून वर्षभर रोजगार मिळत आहे. बँकेचा दरमहा ११ हजार रुपयांचा कर्जाचा हप्ता नियमित भरला जात आहे. विश्वनाथची मित्र मंडळी पोल्ट्री फॉर्मला भेट देऊन प्रसंशा करतात. गाव परिसरात विश्वनाथकडून युवकांना रोजगाराची प्रेरणा मिळत आहे हे मात्र नक्की.

'महान्यूज'मधील मजकूर.

No comments:

Post a Comment