‘शेतीसंबंधीचा नवा दृष्टिकोन, तंत्रज्ञान हे स्नातकांपर्यंतच मर्यादित न राहता ते पाझरत किंवा न पाझरता सरळ कालव्यासारखे वाहत वाहत शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे. पावसाच्या पाण्यासारखे हे ज्ञान सगळीकडे पसरले पाहिजे आणि कृषी विद्यापीठे ही या ज्ञानाची केंद्रे बनली पाहिजेत.’ महाराष्ट्राचे भाग्यविधाते स्व. यशवंतराव चव्हाण यांनी काढलेले वरील उद्गार आज महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या नेतृत्वाखाली सार्थ ठरवित आहेत. विद्यापीठीय संशोधनाचा आणि ज्ञानाचा हा प्रवाह अखंडपणे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचवून शेतीची आणि पर्यायाने शेतकऱ्यांची समृद्धी साधण्याचे महत्त्वाचे काम आज महाराष्ट्रातील शासकीय कृषी विद्यापीठे करीत आहेत.
महाराष्ट्रातील शेती ही मुख्यत: पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. पाऊस पडला तरच शेतं पिकतात आणि शेतकरी जगतात. पाऊस नाही पडला तर शेतकरी राजाला आकाशाकडे डोळे लावून आपले नशीब अजमावे लागते. पावसावर हवाला ठेवून जगणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात समृद्धीची स्वप्नं इथल्या कृषी विद्यापीठांनी सत्यात उतरविण्याचा प्रयत्न केला आहे, हे सत्य कोणीही नाकारू शकणार नाही.
देशातील अग्रणी कृषी विद्यापीठ
महात्मा फुले कृषी विद्यापीठ
१ जून १९६८ मध्ये या विद्यापीठाची स्थापना झाली. शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षण या ध्येयधोरणाच्या पूर्तीसाठी अविरतपणे काम करणारे अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे देशातील एक अग्रणी कृषी विद्यापीठ मानले जाते. अर्थात हा सन्मान मिळविण्यासाठी या विद्यापीठाने तितकीच मेहनत घेतली आहे. शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षण या क्षेत्रात या विद्यापीठाने भरीव असे काम केले आहे. या विद्यापीठामध्ये केले जाणारे संशोधन शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आहे, हे लक्षात घेऊन त्या संशोधनाचा बदलत्या शेती तंत्रज्ञानाशी कशी सांगड घालता येईल याचा ध्यास जसा येथील शिक्षकांना आहे तसाच येथे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही आहे. म्हणूनच या विभागातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी विद्यापीठाचे योगदान नक्कीच महत्त्वपूर्ण आहे.
No comments:
Post a Comment