Pages

Wednesday, February 23, 2011

वाळव्यातील कृषी प्रकल्प.





सांगली जिल्हा हा तसा दुष्काळी जिल्हा असला तरी येथील शेतकर्‍यांनी दुष्काळाचा कधी बाऊ केला नाही. आहे त्या परिस्थितीला तोंड देऊन शेतीत उत्पादन घेण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान वापरण्याचा येथील शेतकर्‍यांचा हातखंडा आहे. इथल्या कष्टाळू शेतकर्‍याची ही धडपड दिल्लीतील साहेबाच्या कानी गेली आणि मग काय केंद्र शासनाच्या कृषी मंत्रालयाचे अतिरिक्त आयुक्त एम. जे. चंद्रगौडा यांनी प्रत्यक्षात येऊन पहाणी करण्याचे ठरविले. नुकतेच श्री. चंद्रगौडा हे वाळवा येथील या कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन नियंत्रण यंत्रणेच्या कामाची पहाणी करण्यासाठी आले होते. त्यांनी येथील मधमाशा पालन, रेशीम उद्योग आणि केळी पिकाबाबतची माहिती घेऊन समाधान व्यक्त केले. येथील विविध योजनांचा आणि ज्ञानाचा लाभ जिल्ह्यातील इतर शेतकर्‍यांनी घ्यावा अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.


श्री. चंद्रगौडा यांनी कृषि विभागाच्या वतीने मधमाशा पालन व्यवसायाबाबतचे प्रशिक्षण घेतलेल्या ३५ महिलांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली. या महिलांचा उत्साह पाहून त्यांना अधिक प्रशिक्षण देण्याबाबत आपला मानस व्यक्त केला. रेशीम उद्योगाचे प्रशिक्षणही या महिलांना द्यावे, बचतगट स्थापन करून रेशीम उद्योग सुरू करावा, असेही त्यांनी सूचविले. बावची येथील सुमारे १५ शेतकर्‍यांना बेंगलोरला रेशीम उद्योगाच्या व्यावसायिक प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले आहे.

येथील एक शेतकरी शिवाजी सूर्यवंशी यांनी तुतीची नर्सरी तयार करून सुमारे २२५ हेक्टर क्षेत्र तुतीच्या लागवडीखाली आणले आहे. येथील एक होतकरू शेतकरी नुरमहम्मद मुल्ला यांच्या रेशमाच्या प्लॉटला भेट देऊन मोलाचा सल्ला त्यांनी श्री. मुल्ला यांना दिला. अहिरवाडी येथील काही शेतकर्‍यांनी ऊस पिकामध्ये आंतरपिक घेऊन आपले उत्पादन वाढविले आहे. या शेतकर्‍यांनी बटाटा, मिरची, रताळी आदी नगदी पिके घेऊन चांगलेच उत्पादन घेतले आहे. त्याचेही श्री. चंद्रगौडा यांनी कौतूक केले. येथील एक प्रगतशील शेतकरी शरद पवार यांनी कृषि विभागाच्या या योजनेचा वापर करून आपल्या कोरडवाहू जमिनीत ज्वारीचे विक्रमी उत्पादन घेतले आहे.

आत्मा योजनेंतर्गत कृषि क्षेत्रातील नवनव्या तंत्रज्ञानाची माहिती, पीक पद्धतीत बदल केल्यामुळेच हे साध्य होऊ शकले आहे. स्थानिक शेतकरी अशोक गुरव यांनीही यावेळी बदलती ऊसशेती, गांडुळखत उत्पादन आदीबाबतची माहिती सांगितली. त्यांच्या प्रकल्पाला श्री. चंद्रगौडा यांनी भेट देऊन समाधान व्यक्त केले. परिसरातील बचतगट नेहमीच येथे भेट देऊन विविध योजनांची माहिती घेऊन आपल्या शेतीत त्याचा वापर करत असतात. 






  • अविनाश सुखटणकर



  • महान्यूज.


  • No comments:

    Post a Comment