Pages

Sunday, February 27, 2011

माणिकगड पहाडावरील हरितक्रांती.




केंद्र शासन पुरस्कृत एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत सन २०१०-११ या वर्षासाठी राज्यात १६३ पाणलोट प्रकल्प मंजूर केले आहे. तर चंद्रपूर जिल्हयात तीन पाणलोट प्रकल्पांना हिरवी झेंडी मिळाली आहे. हे तीनही पाणलोट प्रकल्प आदिवासी बहुल जिवती तालुक्यात होत असून साडेबारा हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचा मानस आहे. त्यामुळे जिवती तालुका हरित क्रांतीच्या दिशेने वाटचाल करण्याची शक्यता बळावली आहे.

एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत राज्याच्या ग्राम विकास व जलसंधारण विभागाने ३७० पाणलोट प्रकल्पांना मान्यता प्रदान केली जाणार होती व दोन हजार तेवीस कोटी सोळा लक्ष रुपये खर्च करण्याचा प्राथमिक आराखडा तयार केला. मात्र त्यातील १६३ पाणलोट प्रकल्पांना मान्यता मिळाली असून त्यासाठी आठशे एकोण्णवद कोटी एकोणवीस लाख रुपये खर्च होणार आहे. 

चंद्रपूर जिल्हयातील जिवती तालुक्यात तीनही प्रकल्प मंजूर झाले आहेत. यात ५३ सूक्ष्म पाणलोटांची संख्या असून १२ हजार ४६६ हेक्टर क्षेत्रफळ समाविष्ट केले जाणार आहे. यासाठी १४ कोटी ९५ लाख ९० हजाराचा खर्च अपेक्षित आहे. शासनाने जिवती तालुक्यातील आंबेझरी, नंदप्पा, मरकोंदी, शेणगाव, बोईसापूर, सोदेकसा, पिट्टीगुडा-१, पिट्टीगुडा-२ या आठ आदिवासी ग्राम पंचायती अंतर्गत येणा-या ११ गावांना एका प्रकल्पाचा फायदा होणार आहे. यात ५ हजार १९ हेक्टर क्षेत्रफळ समाविष्ठ आहे. तर बाबापूर, शेडवाही, भारी, राहापल्ली बु. मराई पाटन, राहापल्ली खू. हिमायतनगर आणि टेकामांडवा या आठ ग्रामपंचायतीमधील ४ हजार १३६ हेक्टर शेती सिंचनाखाली येणार आहे. 

तिस-या प्रकल्पात ३ ग्रामपंचायती अंतर्गत येणारे ८ गावे समाविष्ठ असून त्यात चिखली, पाठण, खडकी, हिरापूर यासोबतच जनकापूर टाटाकोहाड, टिरवी, डोंगरगाव, गोविंदपूर या गावांचा समावेश आहे. या गावांसाठी ३ कोटी ९७ लाख ३४ हजार रुपये उपलब्ध केले असून ३ हजार ३११ हे क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या तीनही प्रकल्पासाठी पाणलोट विकास कार्यक्रमांत १४ कोटी ९५ लक्ष ९० हजाराचा निधी शासनाने मंजूर केला आहे. या प्रकल्पामुळे डोंगराळ जिवती तालुका हिरवाकंच बनेल आणि त्यामुळे आदिवासी बांधवाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
'महान्यूज'

No comments:

Post a Comment