Pages

Friday, April 22, 2011

आदिवासींनी फुलवले भाजीचे मळे.






केंद्र सरकारने वन हक्क दाव्यांचा कायदा केला. त्यातून रायगड जिल्ह्यातील सुमारे साडेचार हजार आदिवासींना त्यांच्या हक्कांच्या जमिनी मिळाल्या आहेत. यापूर्वी थोडेसे दचकत शेती करणारे आदिवासी आता बिनधास्तपणे या व्यवसायात उतरले आहेत. रायगड जिल्ह्याच्या पेण तालुक्यातील वरप परिसरात आदिवासी आता आपल्या मालकी हक्कांच्या जमिनींवर भाजीचे मळे फुलवू लागले आहेत.

जिल्हाधिकारी सुभाष सोनवणे यांनी नुकताच या भागाचा दौरा केला. येथील आदिवासींनी वनराई बंधारे बांधून त्यात पाणी अडवून ठेवले आहे. साकव संस्थेने त्यांना पंप पुरविले आहेत. या पंपाने पाणी खेचून आदिवासी बांधव शेती-बागायती करीत आहेत. शिक्षणाचा फारसा प्रसार या भागात झाला नसला तरी शेतीच्या माध्यमातून त्यांची चांगल्या प्रकारे उपजीविका सुरु आहे. वांगी, टोमॅटो, मिरची, दुधी, कारली यासारख्या फळभाज्या पिकवून त्या नागोठणे बाजारात नेऊन विकायचा नित्यक्रम ठरुन गेला आहे. सरकारने जमिनी नावावर करुन दिल्याने या आदिवासींचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे

पिकविलेला भाजीपाला आम्ही डोक्यावर उचलून मुख्य रस्त्यापर्यंत घेऊन जातो. गावात यायला पूर्वी साधी पाऊलवाट होती. आता ग्रामस्थांनी श्रमदानाने बर्‍यापैकी रस्ता तयार केला आहे. जिल्हाधिकार्‍यांनी गावातील प्राथमिक शाळा, तसेच अंगणवाडीला भेट देऊन तेथील शैक्षणिक स्थितीची माहिती घेतली. अंगणवाडीतील सर्व मुलांना पूरक पोषण आहार द्या, अशी सूचना त्यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचार्‍यांना केली. त्यावेळी साकव सामाजिक संस्थेचे प्रमुख अरुण शिवकर यांनीही आदिवासींच्या समस्या जिल्हाधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिल्या.

गावातील एकही नागरिक यापुढे रोजगारापासून वंचित राहणार नाही, ज्याच्याकडे शेती आहे त्याला आणि शेती नाही त्यालाही पुरेसा रोजगार मिळेल, अशी आश्वासक स्थिती निर्माण करण्यात आली आहे. शेतीच्या माध्यमातून सुरु झालेला आर्थिक संपन्नतेचा मार्ग त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक प्रगतीपर्यंत पोहोचेल यात आता शंका वाटत नाही.


No comments:

Post a Comment