Pages

Tuesday, August 30, 2011

एका दिवसात शंभर वीज जोडणी


ग्रामीण भागातील वाढत्या वीज चोरीमुळे महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीला तोटा सहन करावा लागतो. त्याचबरोबर शेतकऱ्यांना वीज कनेक्शन देतानाही अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. ह्या सर्व बाबी विचारात घेऊन महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने नुकताच सांगली जिल्ह्यातील सावळज परिसरातील एकूण २६ गावांत मागेल त्याला वीज जोडणी देण्यासाठी महावितरण आपल्या दारी हा उपक्रम सुरु केला.

या उपक्रमांतर्गत ज्या शेतकऱ्यांना शेती पंपासाठी वीज हवी आहे अशा शेतकऱ्यांनी सातबारा उतारा व लागणारे किरकोळ शुल्क भरुन आपल्या नजिकच्या कार्यालयात मागणी करताच त्याच दिवशी त्याला शेतीपंपासाठी जोडणी देण्यात येईल असा हा उपक्रम आहे. पहिल्याच दिवशी १०० कनेक्शन देण्यात आली.

सावळज परिसरातील २६ गावांमधील ग्रामपंचायतीमार्फत शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यात आले आहे. प्रत्येक गरजू शेतकऱ्यांना रितसर वीज कनेक्शन मिळाल्यास आपसूकच वीज चोरीला आळा बसेल. वीज चोरी करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही या परिसरातील शेतकऱ्यांना सांगण्यात आले. शेतकऱ्यांना या उपक्रमाचा फायदा समजावून देण्यात आल्याने विद्युत कनेक्शन घेण्यास शेतकरी पुढे आले. जिल्हा परिषद सदस्य किशोर उनउने यांनीही या परिसरात फिरुन शेतकऱ्यांचे प्रबोधन केले.

शेतीपंपांना वीज कनेक्शन देताना होणाऱ्या विलंबामुळे वीजचोरी सुरु झाली. आकडा टाकून वीज चोरण्याच्या प्रकारात वाढ होऊन अपघाताचीही धास्ती वाढली होती. म्हणूनच महावितरणने सर्वंकष विचार करुन ही योजना हाती घेतली. यामुळे वीज चोरी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. ही महत्वाकांक्षी योजना राबवूनही जर वीज चोरीचे प्रकार आढळून आले तर संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

ज्या शेतकऱ्यांना तात्काळ वीज पुरवठा योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे त्यांनी बोअर नोंद असलेले सातबारा, पाटबंधारे विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र, जवळच्या शेतीपंपाच्या बिलाची प्रत आपल्या नजिकच्या कार्यालयात जमा करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात येत आहे.

या योजनेचे स्वागत सर्व थरातील शेतकऱ्यांनी केले आहे. तालुका तसेच जिल्ह्याला मारावे लागणारे हेलपाटे, अनावश्यक खर्च यामुळे वाचला आहे. शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष दारीच ही कनेक्शन देणारी मंडळी आल्यामुळे याचे कौतुक या साध्याभोळ्या शेतकऱ्यांना वाटत आहे. या स्त्युत्य उपक्रमाचे त्यांनी स्वागत केले असून जिल्ह्यात सर्वत्र या योजनेचा प्रसार व्हावा अशी अपेक्षाही शेतकरी मंडळी व्यक्त करीत आहेत.

No comments:

Post a Comment