Pages

Sunday, September 25, 2011

हिंगोलीत एक व्यक्ती दोन झाड उपक्रम


पर्यावरणाच्या संतुलनासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबविले जातात. पर्यावरण संतुलित ग्राम योजनेला प्रोत्साहन मिळावे यासाठी हिंगोली पंचायत समितीच्यावतीने एक व्यक्ती दोन झाड ही संकल्पना राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या मोहिमेचा प्रारंभ हिंगोली तालुक्यातील बोरी शिकारी येथे करण्यात आला. ग्रामस्थांनी या योजनेचे स्वागत करुन गावाला समृध्द करण्याचा निश्चय केला आहे.

हिंगोली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. विशाल राठोड यांनी गेल्या काही महिन्यांपासून एक व्यक्ती दोन झाड ही नाविण्यपूर्ण संकल्पना राबविण्यास सुरुवात केली आहे. मोहिमेचा प्रारंभ बोरी शिकारी येथे करण्यात आला. यावेळी गावातून वृक्षदिंडी काढण्यात आली. त्यानंतर जि. प. शाळेच्या प्रांगणात ग्रामसभा घेण्यात आली. एक व्यक्ती दोन झाड ही संकल्पना तालुक्यातील १११ ग्रामपंचायतीं मध्ये राबविण्यात येणार आहे. यावेळी ग्रामस्थांना आपल्या घरासमोर लावलेल्या झाडांचे संगोपन करण्याची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे डॉ. राठोड म्हणाले.

वृक्षरोपणासाठी तीन लाख झाडे लागणार आहेत. ही झाडे पंचायत समितीने तालुक्यातील पंधरा गावांमध्ये तयार केलेल्या रोपवाटीकेतून मोफत उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातून तालुक्यात दहा लाख रुपयांची बचत होणार आहे.असा उपक्रम राबविणारी हिंगोली पंचायत समिती राज्यातील बहुधा पहिलीच पंचायत समिती ठरणार आहे.

पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम योजनेमध्ये वृक्षारोपणाला महत्व देण्यात आले आहे. करवसुली, स्वच्छता अभियानासोबतच वृक्षारोपणाला महत्व दिले गेले आहे. मागील वर्षी या योजनेत तालुक्यातील ४९ गावे पात्र ठरली होती. या गावांना विकासकामांसाठी निधीही मिळू लागला आहे. हिंगोली पंचायत समितीला नुकतेच आयएसओचे प्रमाणपत्रही मिळाले आहे.

No comments:

Post a Comment