Pages

Sunday, October 2, 2011

तंत्रज्ञानाच्या माध्यमातून फुलविली पपई बाग


यवतमाळ जिल्ह्यातील पोफाळी (कारखाना) येथून चार किलोमिटर अंतरावर असलेल्या पळशी येथील प्रगतशिल शेतकरी गोविंद तासके यांनी परंपरागत शेती व पीक पध्दतीला फाटा देऊन नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून व शासनाच्या एन.एच.एम. अंतर्गत पपईची बाग फुलविली आहे.

अवघ्या आठ महिन्याच्या कालावधीत या शेतकऱ्याला पहिल्या तोड्यात १ लाख १० हजार रुपये तर दुसऱ्या तोड्यात ६० हजारांचे उत्पन्न मिळाले आहे. गोविंद तासके यांनी मागील वर्षी १८ नोव्हेंबर २०१० रोजी दोन हेक्टरमध्ये पपई पिकाची लागवड केली होती. पपईच्या दोन झाडातील अंतर त्यांनी ७ बाय ८ ठेवून ड्रीप तंत्रज्ञानाचा वापर केला. यामुळे सिंचन करणे सुलभ झाले. एका झाडाला ७० ते १०० पर्यंत पपया लागल्या आहेत. दोन हेक्टरमध्ये १ लाख ६० हजार रुपये खर्च आला. शेतात ३ हजार झाडे उभी असून येत्या काळात ६ लाखांचे उत्पन्न अपेक्षित असल्याचे तासके यांनी सांगितले.

एन.एच.एम. अंतर्गत पपई पिकासाठी हेक्टरी ३० हजार रुपये अनुदान मिळाले आहे. कृषी विभागाकडून पपईचे भरघोस उत्पादन घेण्यासाठी त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले. तालुका कृषी अधिकारी सी. एस. राठोड, मंडळ अधिकारी हामंद, पर्यवेक्षक शिवाजी परतवाड, कृषी सहाय्यक कागणे, प्रकाश इंगळे, प्रल्हाद बोईनवाड, महादेव पवार, कृषी सहाय्यक आर.यु. वाघमारे यांनी शेतीवर जाऊन वेळोवेळी पीकाची पाहणी केली व योग्य मार्गदर्शन केले.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये केला जात आहे. काही शेतकरी त्याही पुढे जाऊन कृषी तंत्रज्ञान आत्मसात करून लाखोंचे पिक घेत आहेत. त्यातील एक शेतकरी म्हणून तासके यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ते शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करीत असतात. यापुढे डाळींब व हळदीचा प्रयोग राबविणार असल्याचे श्री. तासके यांनी सांगितले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकऱ्यांनी शेतात नवनवीन प्रयोग केल्यास उत्पन्न व शेतकऱ्यांच्या परिस्थितीत नक्कीच फरक पडू शकतो, असे ते इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगतात.

No comments:

Post a Comment