Pages

Wednesday, October 12, 2011

बंधा-यात पाणी...... ग्रामस्थ समाधानी

पंढरपूर तालुक्यातील राजकीयदृष्टया संवेदनशील असणारे गाव म्हणून गादेगावचा उल्लेख होतो. गावाच्या विकासाबाबत येथील नागरिक सदैव जागरुक असतात. पंढरपूर तालुक्याच्या पश्च्चिमेला असणा-या व सुमारे १० हजार लोकसंख्या असलेल्या गादेगाव मध्ये प्रशासन व जनता एक विधायक कामासाठी एकत्र आली आणि त्यातून उभे राहिले एक सकारात्मक कार्य.

या गावाच्या पश्चिमेस ओढयावर बांधण्यात आलेल्या शिवकालीन पाणी साठवण बंधा-याच्या भिंतीतून पाण्याची गळती होत असल्याने तलावामध्ये पाणी साठवणूक होत नव्हती.यामुळे या गावातील पिण्याच्या पाण्यासाठी नागरीकांचे हाल होत होते. यावर सर्व ग्रामस्थांनी एकत्र येवून गळती दुरुस्त करण्याबाबत ग्रामपंचायतीला सुचविले. ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत ही गळती दुरुस्त करण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार सदरच्या बंधा-याच्या पाण्याची गळती ग्रामपंचायतीद्वारे थांबविण्यास नुकतेच यश आल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला असून आता पिण्याच्या पाण्याची गैरसोय होणार नसल्याने ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला धन्यवाद दिले आहेत. याच बंधा-यात पाणी अडविण्यात आल्याने येथून गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यात आला असून गावाला व वाडयावस्त्यांवर पिण्याचे पाणी पुरवठा करण्या कता बाजूलाच विहीर खोदण्यात आली असून या विहिरीतून गावासाठी व वाडयासाठी पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली आहे.या बंधा-याच्या पाणी साठवणुकीमुळे लगतच्या विहिरी तुडुंब भरल्या आहेत तसेच सिंचनाचे क्षेत्रही वाढले आहे.त्यामुळे येथील शेतकरी अर्थिक सुबत्ता बाळगून आहे.

सध्या या बंधा-याच्या भिंतीतून होणारी पाण्याची गळती थांबविण्यात आल्यामुळे बंधारा तुडुंब भरला आहे.यासाठी गादेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच विकास भोसले, उपसरपंच नागेश फाटे, जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बागल, ग्रामविकास अधिकारी आत्माराम कोळी यांनी प्रयत्न केले.मात्र ग्राम विकासाबाबत राजकारण न करता सर्व ग्रामस्थ एकत्र आले ही बाबही तितकीच प्रशंसनीय आहे.गादेगावच्या या घटनेची इतरत्र पुनरावृत्ती व्हायला काय हरकत आहे?

No comments:

Post a Comment