Pages

Thursday, November 10, 2011

सागवान आपल्या दारी

केवळ शेतीच्या भरवशावर न राहता शेतकऱ्यांनी कृषी आधारित इतर उत्पन्नाची साधने निर्माण करावी, यासाठी शासन नेहमीच शेतकऱ्यांना पाठबळ देत आले आहे. त्यामुळेच अनेक शेतकरी दुग्धव्यवसायासह अनेक प्रकारचे जोडधंदे करू लागले आहे. शेतकऱ्यांना जोडधंदा उपलब्ध करून देण्यासाठी असाच एक नाविन्यपूर्ण उपक्रम सामाजिक वनीकरण विभागाने यवतमाळ जिल्ह्यात राबविला आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेताच्या धुऱ्यावर, बंधाऱ्यावर तसेच अनुत्पादनक क्षेत्रांवर सागवानाची लागवड केल्यास त्यातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते, असा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून ‘सागजडी आपल्या दारी’ हा नाविण्यपूर्ण उपक्रम राबविला जात आहे.

या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना साधारणपणे दीड रुपया किंमतीत एक सागजडी सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने उपलब्ध करुन देण्यात येत आहे. एखाद्या गावात जड्यांची मागणी असल्यास सामाजिक वनीकरण विभाग त्या गावापर्यंत सागजडी पोहोचवून देणार आहे. सागजडी लागवडीबद्दल तांत्रिक मार्गदर्शनही विभागातर्फे उपलब्ध करून दिले जात आहे. कोणत्याही प्रजातीच्या झाडासाठी खड्डा खोदावा लागतो, परंतू सागाच्या लागवडीसाठी खड्डा खोदण्याची आवश्यकता नसते. सुमारे सहा इंच खोल व दोन इंच व्यासाचा खड्डा केल्यास सागवान लागवड केली जावू शकते. सागजडीच्या लागवडीनंतर १५ ते २० वर्षांनी निश्चित उत्पन्न प्राप्त होते. या झाडाची लागवड करुन शेतकऱ्यांनी आपले भविष्यातील उत्पन्न वाढवावे, यासाठी सामाजिक वनीकरण विभाग व्यापकपणे हा उपक्रम राबवित आहे.

शेतकऱ्यांनी आपल्या शेतात या उपक्रमांतर्गत सागवानाची लागवड केल्यास येत्या काळात मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या लागवडी संदर्भात अधिक माहितीसाठी सामाजिक वनीकरण विभागचे उपसंचालक आणि तालुका स्तरावरील लागवड अधिकारीऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.