Pages

Tuesday, December 27, 2011

कोरडवाहू शेतकऱ्‍यांसाठी दहा हजार कोटींचा विशेष कार्यक्रम - मुख्यमंत्री


विदर्भातील कोरडवाहू शेतकऱ्यांचे जीवन सुसह्य व्हावे यासाठी पाच वर्षात सिंचनाच्या सुविधेमध्ये वाढ करण्यासोबतच कापूस प्रक्रिया उद्योगाला चालना देण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी दहा हजार कोटी रुपये खर्चाचा विशेष आराखडा तयार करण्यात येत असल्याचेही श्री.चव्हाण यांनी सांगितले.

शिक्षणमहर्षी डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या ११३ व्या जयंती उत्सवानिमित्त अमरावती येथे आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन श्री.चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी विशेष कार्यक्रम तयार करताना डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या शेतीविषयक विचारांचाही यात समावेश करुन हा कार्यक्रम अमरावती विभागात प्रभावीपणे राबविण्यात येईल, असेही ते म्हणाले.



शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष अँड.अरुणकुमार शेळके सांस्कृतिक कार्य मंत्री संजय देवतळे, महापौर अँड.किशोर शेळके, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख, आमदार रावसाहेब शेखावत, प्रा.विरेंद्र जगताप, अँड.यशोमती ठाकूर, वसंतराव खोटरे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, डॉ.पंजाबराव देशमुख यांनी प्रतिकूल परिस्थितीत उच्च शिक्षण घेऊन ग्रामीण भागातील अत्यंत गरीब व शेतकऱ्यांच्या मुलांपर्यंत शिक्षण पोहचविण्याचे महत्वपूर्ण कार्य केले. शेतकऱ्यांचे दु:ख, सिंचनाचा बॅकलॉग, कोरडवाहू शेतकऱ्यांची परिस्थिती आणि यावर मार्ग काढण्यासाठी डॉ.पंजाबराव देशमुख यांनी केलेले कार्य महत्वपूर्ण आहे. नैसर्गिक परिस्थितीमुळे सिंचनाच्या सुविधा निर्माण करताना जलसिंचनाच्या नवीन तत्वाचा वापर करुन उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा ठिंबक व तुषार पद्धतीने कसा जास्तीत जास्त वापर करता येईल याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकताही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

ते म्हणाले, अनियमित पावसामुळे विदर्भात सोयाबिन व कापसाच्या उत्पादनावर विपरित परिणाम झाला. त्यामुळे शासनाने दोन हजार कोटी रुपयाचे पॅकेज जाहीर करुन शेतकऱ्यांना मदतीचे धोरण स्वीकारले. या मदतीमुळे संपूर्ण नुकसान भरपाई होत नसली तरी सिंचन क्षमता वाढविणे तसेच शेतीला जोडधंदा निर्माण करण्यासाठी सहाय्य होणार आहे. पावसावर विसंबून असलेली शेती, चांगल्या बियाणांचा अभाव यासोबतच उत्पादन खर्च वाढत असताना शेती अधिक किफायतशीर व्हावी व शेतकरी अडचणीतून बाहेर यावा यासाठी डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या विचारांची पुनरावृत्ती करुन त्यांच्या शेती सुधारणेच्या संकल्पना स्वीकारण्याची आवश्यकता यावेळी त्यांनी व्यक्त केली.

विदर्भातील उद्योगाला चालना देऊन दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी तसेच विभागीय असमतोल दूर करण्याला प्राधान्य असल्याचे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले, विविध क्षेत्रातील असमतोलाचा अभ्यास करण्यासाठी डॉ.विजय केळकर यांची समिती नियुक्त करण्यात आली असून या समितीच्या शिफारशीनुसार असमतोल दूर करण्यात येईल. शेतकऱ्यांच्या मुलांनी केवळ शेतीवर विसंबून न राहता पूरक उद्योग सुरु करावेत तसेच व्यावसायिक शिक्षणाकडे वळावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. श्री शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांना संपूर्ण सहाय्य करण्यात येणार असून शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासोबत गुणवत्ता वाढीसाठी विशेष कार्यक्रम राबवावेत, असे आवाहनही श्री.चव्हाण यांनी यावेळी केले.

श्री.देवतळे यांनी, डॉ.पंजाबराव देशमुख यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी सुरु केलेल्या संस्थांमधून गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळत असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. विदर्भातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करुन त्यांच्यामध्ये असलेले नैराश्य दूर करण्यासाठी संस्थेने ग्रामीण भागात विशेष मोहीम राबवावी, अशी सूचना त्यांनी केली.

अँड.शेळके यांनी संस्थेतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी शासनाने मदत करण्याची मागणी केली.

यावेळी संस्थेच्या दैनंदिनीचे तसेच शिवसंस्था त्रैमासिकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन झाले. शैक्षणिक उपक्रमामध्ये उत्कृष्ट कार्य केलेले प्राचार्य डॉ.डी.के.गोडघाटे, उत्कृष्ट खेळाडू शितल धनंजय पोरे, शिक्षिका रेखा वानखडे, डॉ.ममता लांजेवार तसेच इतर गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.