Pages

Thursday, January 12, 2012

मत्स्यबीजोत्पादनात सातारा आघाडीवर..


सातारा जिल्ह्याने मत्स्यबीजोत्पादनात पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये आघाडी घेतली आहे. मार्च अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात ३ कोटी १२ लाख मत्स्यबीजांचे उत्पादन केवळ सातारा जिल्हयात झाले असून, ३०० मे. टन मत्स्योत्पादन करण्यात आले आहे. मत्स्योत्पादनामुळे १९ लाख ६० हजार ६२८ रुपयांचा महसूल जिल्ह्याला मिळाला आहे.

पावसाळ्यात जून-जूलै महिना माशांच्या प्रजोत्पादनाचा (ब्रिडिंग) हंगाम आहे. जिल्ह्यातील धोम मत्स्यबीज केंद्रात मत्स्य विभागाच्या वतीने माशांना इंजेक्शन देण्यात येते. त्यानंतर हे मासे अंडी घालतात व त्यापासून तयार होणारी मत्स्यबीजे धरून ती धोम तलावात साठवून त्यापासून बोटुकली व मत्स्योत्पादन घेतले जाते.
धोम धरणाजवळील या मत्स्यबीज केंद्रात वर्षभरात ३ कोटी १२ लाख मत्स्यबीजांचे उत्पादन झाले असून, १० लाख ५७ हजार ९३८ रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. सन २००९-१० मध्ये ८ लाख ६६ हजार एवढा महसूल मिळाला होता. जिल्ह्यातील तलावाच्या ठेक्याद्वारे ८ लाख ६२ हजार ७२१ रूपये, मोसमारी परवान्याद्वारे २८०० रूपये व इतर ३६ हजार रूपये असे मिळून एकूण १९ लाख ६० हजार ६२८ इतका महसूल वर्षभरात प्राप्त झाला.

जिल्ह्यात मत्स्यसंवर्धनास योग्य असलेल्या जलक्षेत्रात मत्स्यशेती करून गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादन वाढविण्यासाठी मत्स्य व्यवसाय विभागाकडून जलद वाढणाऱ्या जातीचे मत्स्यबीज धोम केंद्रात स्थानीकरित्या निर्माण करण्यात येते व ते मत्स्यसंवर्धकांना पुरविण्यात येते. या ठिकाणी मत्स्यबीजाबरोबरच कोळंबी बीजही संचयन करण्यात येते. वर्षभरात ३ हजार रुपये खर्च करून ३०० मे.टन मत्स्योत्पादन व १ लाख ४२ हजार मत्स्यबीज संचयन करण्यात आले आहे. खटाव तालुक्यातील राजेवाडी मत्स्यबीज संवर्धन केंद्रामध्ये १० संवर्धन तळी तयार करण्यात आली असून, धोम मत्स्यबीज उत्पादन केंद्रातील प्रमुख कार्य मत्स्यजिरे खरेदी करून त्याचे या ठिकाणी संवर्धन करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे.

राजेवाडी तलावात सन २००९-१० मध्ये ३० लाख मत्स्यजिरे संवर्धन करून ४ लाख २१ हजार अर्धबोटुकली प्राप्त झाली. त्याद्वारे ८४ हजार ४१० रुपयांचा महसूल मिळाला. ही अर्धबोटुकली ११ पाटबंधारे तलावातील मत्स्योत्पादनासाठी १० मच्छीमार सहकारी संस्थांना वितरित करण्यात आली. सन २०१०-११ मध्ये ३० लाख मत्स्यजिरे धोम व उजनी केंद्र येथून आणून त्याचे संवर्धन करण्यात आले व ९ लाख २० हजार मत्स्यबीज पुरवठा करण्यात आला. त्याद्वारे १ लाख ४० हजार ४०० रुपयांचा महसूल जमा झाला आहे. मच्छीमारांना किफायतशीर मासेमारी व्यवसायासाठी चांगली जाळी तयार करण्यासाठी २ हजार ७०३ किलो नायलॉन सूत खरेदीसाठी सर्वसाधारण योजना व विशेष घटक योजनांद्वारे ४ लाखांचा अर्थपुरवठा करण्यात आला आहे. जिल्ह्यात ६६ सहकारी मच्छीमार संस्था व एक मच्छीमार सहकारी संघ कार्यरत आहे.