Pages

Friday, May 25, 2012

रोपट्यांची तहान भागविणारा ठिबक सिंचनाचा अभिनव उपक्रम

ग्लोबल वार्मिंगचे संकट संपूर्ण जगाला भेडसावत आहे. याचाच परिणाम म्हणून की काय, महाराष्ट्रातही जमिनीची धूप होत आहे. दरवर्षी उन्हाबरोबरच पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे. या सर्वांवर मात करण्यासाठी जमिनीत पाणी साठवून ठेवणे अत्यावश्यक झाले आहे. सिंचनाच्या सुविधा वाढवून शासन यासाठी प्रयत्न तर करीत आहेच त्याचबरोबर वृक्ष संवर्धनाच्या माध्यमातूनही याला हातभार लावला जात आहे. यादृष्टीने बुलढाणा जिल्ह्यात रोपट्यांच्या वाढीसाठी राबविला जाणारा ठिबक सिंचनाचा अभिनव प्रयोग सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. 

ठिबक सिंचनाचे महत्व ओळखून शेतकरी आता शेतामध्ये या प्रणालीचा सर्रास वापर करू लागले आहेत. बुलढाणा जिल्ह्यात सामाजिक वनीकरण विभागानेही, आता केवळ ‘पाणी वाचवा’ हा संदेश देऊन न थांबता ‘ठिबक’च्या एका अनोख्या उपक्रमातून वृक्षांची तहान भागवण्याला सुरूवात केली आहे.
वृक्ष लागवडीचे अनेक फायदे आहेत. तसा तो पाण्याच्या संकटावर मात करण्यासाठी देखील होतो. यासाठी शासन दरवर्षी वृक्ष लागवडीसाठी विविध योजना राबवित आहे. या अंतर्गत सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पुढाकाराने बुलढाणा जिल्ह्याच्या मोताळा तालुक्यात विविध मार्गांवर दुतर्फा शेकडो रोपट्यांची लागवड करण्यात आली आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये या रोपट्यांना पाणीरूपी मातृत्वाची थाप आवश्यक असते, ही बाब लक्षात घेता तालुक्याचे लागवड अधिकारी श्री.महाजन यांनी या रोपट्यांची तहान भागविण्यासाठी तसेच त्यांना ‘ताठ’ मानेने जगता यावे यासाठी, ठिबक सिंचनाचा अभिनव उपक्रम राबवण्यास सुरूवात केली आहे. 

तालुक्याच्या कोथळी या गावापासून पिंपळगाव नाथ मार्गावर असलेल्या रोपट्यांना ठिबकच्या माध्यमातून पाणी देण्यात येत आहे. यासाठी श्री.महाजन यांनी भंगार मधून प्लास्टिकच्या बाटल्या विकत घेतल्या. या बाटल्या त्यांनी रोपट्याच्या बुंध्याजवळ जमिनीत रोवल्या. त्यामध्ये दर तिसऱ्या दिवशी पाणी भरले जाते. बाटलीला खालच्या बाजूने छिद्रे पाडण्यात आली आहेत. त्यामुळे या वृक्षांना थेट मूळाजवळ पाणी मिळत आहे. या बाटलीमध्ये पाणी भरण्यासाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत सात मजूर लावण्यात आले आहेत. या उपक्रमामुळे रोपट्यांना पाणी तर मिळतेच, शिवाय मजूरांच्या हातांना कामही मिळाले आहे. 

मोताळा तालुक्यातील सामाजिक वनीकरणाच्या ठिबक सिंचनाच्या या साध्या, सोप्या परंतु वेगळ्या उपक्रमामुळे रोपट्यांना पाणी, त्यांचे संवर्धन, पाण्याची बचत, मजूरांच्या हाताला काम असे अनेक फायदे होत आहेत. यामुळे उन्हाळ्याच्या कडाक्यातही हा उपक्रम लाभदायी ठरत आहे.

No comments:

Post a Comment