Pages

Tuesday, October 5, 2010

जीवनदायी शेततळे शेतकऱ्याला फायदेशीर.

परभणी जिल्ह्यात गेल्या २ वर्षात १५७ सामुहिक तर १८०० वैयक्तिक स्वरुपातील शेततळे घेण्यात आली आहेत. अनियमित पर्जन्यमानावर मात करण्यासाठी शेततळे फायद्याचे ठरले आहे. पिकांना योग्य वेळी पाणी देण्याबरोबरच मत्स्य व्यवसायासारखा जोड व्यवसायही करुन आपल्या उत्पन्नात भर घालता आली आहे.

कृषि विभागाच्या वतीने शेतकर्‍यांना वरदान ठरणारे शेततळे करण्यासाठी योजना कार्यान्वित असून याचा संपूर्ण खर्च शासन करते. परभणी जिल्हयात अनियमित पर्जन्यमान असल्यामुळे पाण्याअभावी अनेक भागातील पिके वाळून जातात. यावर मात करण्यासाठी ज्या शेतकर्‍यांनी शेततळे घेतले त्यांच्या शेतीतून मोठय़ा प्रमाणावर उत्पन्न निघाले आहे.

जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॉ. व्ही.सी. कुडमुलवार म्हणाले, शेततळ्याचे दोन प्रकार असून राष्ट्रीय फलोत्पादन योजनेअंतर्गत शेतकर्‍यांना संयुक्तरित्या तसेच राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत वैयक्तिक स्वरुपावर शेततळे घेता येतात. परभणी जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात १५७ सामुहिक तर १८०० वैयक्तिक स्वरुपातील शेततळे घेण्यात आली आहेत. या दोन योजनेसोबत महाराष्ट्र रोजगार हमी योजने अंतर्गत प्रत्येक तालुक्यात २०० याप्रमाणे जिल्ह्यात १८०० शेततळे घेण्यासंदर्भात उद्दिष्ट आहे.

सर्वसाधारणपणे ३० मीटर रुंद, ३० मीटर लांब व ३ मीटर खोलीचे शेततळे घेण्यात येते. यासाठी शासनाच्या वतीने ८२ हजार २६० रुपयांचे अनुदान देण्यात येते. प्रारंभी शेतकर्‍यांनी स्वत:च्या खर्चातून हे शेततळे पूर्ण करावयाचे आहे. शेततळे पूर्ण झाल्यानंतर कृषि विभागाच्या वतीने पाहणी करुन अनुदान धनादेशाद्वारे देण्यात येते. लहान शेतकर्‍यांनी संयुक्तरित्या या शेततळ्याचा लाभ घेतल्यास त्यांच्या जीवनात खर्‍या अर्थाने क्रांती घडेल. सेलू तालुक्यातील ढेंगळी पिंपळगाव येथील विष्णू सोळंके या शेतकर्‍याने स्वत:च्या शेतात शेततळे घेतले आणि या माध्यमातून मच्छीमारीही केली. अन्य शेतकर्‍यांसाठी हे एक चांगले उदाहरण म्हणावे लागेल.

परभणी जिल्ह्यात महाराष्ट्र रोजगार हमी योजने अंतर्गत १८०० शेततळ्याचे उद्दिष्ट असले तरीही लाभक्षेत्रामुळे पूर्णा, सोनपेठ, पाथरी, परभणी, गंगाखेड या तालुक्यात शेततळे घेण्यास मर्यादा पडत आहेत. लाभक्षेत्रामध्ये (कमांड एरियामध्ये) शेततळे घेऊ नयेत असे शासनाचे स्पष्ट आदेश आहेत. त्यामुळे नवीन शेततळे घेण्यास बर्‍याच मर्यादा पडत आहेत.

जिल्ह्यात गेल्या काही वर्षात पर्यावरणाचा मोठय़ा प्रमाणावर असमतोल झाल्यामुळे पर्जन्यमान अनियमित होत आहे. परिणामी अवर्षण परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे शेततळे त्यावर चांगला पर्याय ठरत आहे. शेततळे घेतलेल्या शेतकर्‍यांनी खरीप व रब्बीच्या पिकांना योग्यवेळी संरक्षित पाणी दिल्यास त्याचा त्यांना लाभ झाल्याचे दिसून आले.

संयुक्त शेततळे घेण्यासाठी ८ ते १० शेतकरी एकत्र आल्यास जमिनीची वरची बाजू लक्षात घेऊन त्या ठिकाणी ४४ मीटर रुंद, ४४ मीटर लांब आणि ५.२ मीटर उंची असलेले शेततळे सामुहिकरित्या घेण्यात येते. या संयुक्त शेततळ्याचा शेतकर्‍यांना चांगला लाभ झाला. राष्ट्रीय कृषि विकास योजने अंतर्गत सध्या ४६३ शेततळे प्रस्तावित असून त्यापैकी १९७ शेततळी पूर्ण झालेली आहेत. तसेच महाराष्ट्र रोजगार हमी योजने अंतर्गत १२०० पैकी ८९ शेततळे पूर्ण झाली आहेत. जीवनदायिनी शेततळ्याचा लाभ घेऊन शेतकर्‍यांनी आर्थिकदृष्टय़ा सक्षम होण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे.

'महान्यूज'मधील मजकूर.

No comments:

Post a Comment