Pages

Friday, December 10, 2010

काश्मिरी केशराची मराठी कहाणी / The story of Keshar production in Kashmir.


नागपूर येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. विधान भवन परिसरात पुस्तकांपासून ते फळांच्या रसांपर्यंत विविध प्रकारची दालने लागली आहेत. त्यातील एक दालन लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.

या दालनात मिळते चक्क काश्मिरी केशर! 

एकेक ग्राम वजनाच्या छोटय़ा छोटय़ा डब्या तयार करण्यात आल्या आहेत. एक ग्राम केशराची किंमत आहे ५०० रूपये. म्हणजे एक किलो केशराचा भाव झाला पाच लाख रूपये. प्रथमदर्शनी आश्चर्याचा धक्का देणारा हा व्यवसाय नेमका आहे तरी कसा, असा प्रश्न पडला. 

जगात केशराचे उत्पादन होते ते फक्त तीन ठिकाणी. स्पेन, इराण आणि काश्मीर. केशराच्या पिकासाठी भुसभुशीत जमीन आणि बर्फाचा पाऊस अत्यावश्यक. तो केवळ या ठिकाणीच होत असल्यामुळे त्या पलिकडे अन्य कोठेही हे पीक घेता येत नाही. 

काश्मिरातही श्रीनगर हायवे जवळ असणार्‍या पामपूर लगत ५० ते ६० किलोमीटर परिसरातच हे पीक घेतले जाते. 

केशराचे कंद जमिनीचे वाफे तयार करून त्यात लावले जातात. वर्षातून एकदा म्हणजे ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये फुले उमलतात. ती घरी नेऊन त्यातून अतिशय कौशल्याने हाताने केशर काढण्याचे काम शेतकरी करतात. 

केशराचे फूल जांभळ्या रंगाचे तर आतील केशर लाल रंगाचा. एका फुलात फक्त तीन केशर. अडीच लाख फुले काढावी तर त्यातून मिळते जेमतेम एक किलो केशर. 

फूल थेट जमिनीतूनच वर येते, त्याला कोणताही पर्णसंभार नसतो. एकदा लावलेले कंद हळूहळू वाढत जातात. हे नवे कंद अन्यत्र लावता येतात. बर्फाचा पाऊस मात्र आवश्यक, अन्यथा हे पीक येणे दुरापास्त. 

हेक्टरी उत्पन्न एक किलो. मागणी मात्र प्रचंड. काश्मिरी केशराला तर उभ्या जगात मागणी. त्याच्यातील औषधी गुणधर्मामुळे त्याचे मोल सोन्याहूनही अधिक. चरक आणि सुश्रुत संहितेमध्ये केशरावर आणि त्याच्या औषधी गुणधर्मांवर विशेष प्रकरणे आली आहेत.

आपण केशर वापरतो ते श्रीखंडात, बासुंदीत, खिरीत. केशराची एक काडी जरी टाकली तरी त्याचा सोनेरी रंग आणि अनोखा स्वाद आपले खाद्यविश्व प्रमुदित करून टाकते. गरोदर स्त्रियांसाठी आणि लहान मुलांच्या गुटीमध्ये केशराचा वापर आवर्जून केला जातो. कांतीमान त्वचेसाठी आणि मोहक रंगासाठी त्याची मागणी अधिक. 

केशर हे उष्ण. त्यामुळे बाधक गुणधर्म नाहिसे करण्यासाठी त्याचा वापर अटळ. रोगप्रतिकारक शक्ती देणारं, दृष्टी दोषावर जालीम आणि मेंदूचं टॉनिक म्हणून त्याला मागणी. एक उत्तम शक्तीवर्धक म्हणूनही हजारो वर्षांपासून माणसाला त्याची ओळख आहे. ही ओळख महाराष्ट्राला अधिक सोपेपणाने करून देण्यासाठी मॅग्नम फाऊंडेशन ही संस्था पुढे आली आहे. संस्थेच्या महासचिव ऍड.पुष्पा शिंदे २०-२२ वेळा काश्मिरात जाऊन आल्या. तेथील शेतकर्‍यांशी त्यांनी निर्भेळ ऋणानुबंध निर्माण केले आणि त्यामुळे काश्मिरातील केशर आता दरवर्षी शुद्ध स्वरूपात महाराष्ट्रात येऊन पोहोचते. 

पुष्पा शिंदे यांना लहानपणापासून समाजकार्याची आवड. त्याला पोषक असा त्यांचा वकिलीचा व्यवसाय. मुंबई आणि नागपूर येथील उच्च न्यायालयात वकिली करता करता त्या समाजकार्यही करतात. 

मॅग्नम फाऊंडेशन ही राष्ट्रीय पातळीवरची आणि निवडक मान्यवरांचा आधार असणारी ख्यातनाम स्वयंसेवी संस्था. राज्यातून बाहेर काश्मिरात जाऊन काम करणारी देशातील एकमेव संस्था. संत गोगले महाराजांनी १९३५ साली सुरू केलेली आणि आता ऍड.सुरेश ढोले यांच्या नेतृत्वाखाली समर्थपणे काम करणारी! जमिनीचा कस वाढविणे, शेतकर्‍यांचे हित आणि पर्यावरणाचे रक्षण यासाठी काम करणारी ही संस्था दुधातील केशराच्या काडीसारखीच कल्याणकारी समाजाच्या निर्मितीमध्ये विरघळून गेली आहे. 

पत्ता : मॅग्नम फाऊंडेशन, ९०९, नववा माळा, ए विंग, लोकमत भवन, नागपूर. दूरध्वनी- ०७१२-२४२०७८२/ ९४२२१०४७५१.

महान्यूज पथक,
शिबीर कार्यालय, नागपूर


'महान्यूज'मधील मजकूर

No comments:

Post a Comment