Pages

Friday, January 14, 2011

स्ट्रॉबेरी उत्पादक आता प्रक्रिया उद्योगात उतरणार...


महाबळेश्वर तालुक्यातील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी आता स्वत:च प्रक्रिया उद्योगाकडे वळले आहेत. यंदाच्या स्ट्रॉबेरी महोत्सवात स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकर्‍यांनी आपल्या उत्पादनाव्दारे स्ट्रॉबेरीची चमक नागरिकांना विशेषत: पर्यटकांना दाखविली आहे. स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी आता स्वत:च प्रक्रिया उद्योगाकडे वळल्याने स्ट्रॉबेरीचा आस्वाद सर्वसामान्य ग्राहकांना घेता येणार आहे.

अलिकडील काही वर्षांपासू¬न महाबळेश्वर तालुक्यातील शेतकर्‍यांचा स्ट्रॉबेरी उत्पाद
नाकडे कल वाढला आहे. तसेच तरूणवर्ग स्ट्रॉबेरी शेतीकडे मोठय़ा प्रमाणावर आकर्षित झाला आहे. यंदा या पिकासाठी हवामान पोषक राहिल्याने उत्पादन चांगले आले आहे. भविष्यातही हे उत्पादन वाढण्याची शक्यता असल्याने येथील शेतकरी आतापासूनच प्रक्रियेच्या रूपाने स्ट्रॉबेरी उत्पादनासाठी बाजारपेठ मिळविण्याच्या तयारीला लागला आहे. 

स्ट्रॉबेरीचा प्रसार व्हावा यासाठी गेल्या तीन वर्षांपासून महाबळेश्वर येथे स्ट्रॉबेरी महोत्सवाचे मोठय़ा उत्साहाने आयोजन करण्यात येथील शेतकर्‍यांनी पुढाकार घेतला आहे. अखिल भारतीय स्ट्रॉबेरी उत्पादन संघ आणि मॅप्रो फुड्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होणार्‍या या महोत्सवासाठी वर्षागणिक पर्यटकांची संख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे शेतकर्‍याला स्थानिक पातळीवरच काही प्रमाणात बाजारपेठा उपलब्ध होत आहेत. या महोत्सवाची लोकप्रियता आणि पर्यटकांची संख्या यांना डोळ्यासमोर ठेवून स्ट्रॉबेरी उत्पादक संघातर्फे या महोत्सवात प्रक्रियायुक्त पदार्थ बनवून विक्रीला ठेवले जातात. 

स्ट्रॉबेरी प्रक्रिया उद्योगाकडे अलीकडे शेतकर्‍यांबरोबरच स्थानिक बचतगटांनीही मोठा सहभाग घेतला आहे. मनुक्याप्रमाणेच स्ट्रॉबेरी ज्यूस, स्ट्रॉबेरी पोळी, स्ट्रॉबेरी चमचम असे विविध प्रक्रियायुक्त पदार्थ शेतकर्‍यांनी तयार केले आहेत. त्यासाठी स्थानिक बचतगटांतील महिलांना सहभागी करून घेण्यात आले आहे. भविष्यात शेतकर्‍यांबरोबरच बचतगटांतील महिलांनाही अन्नप्रक्रिया परवाना घ्यायला लावून त्यांच्यामार्फत विविध स्ट्रॉबेरी उत्पादने बनविण्याचा मानस आहे. त्यामुळे महिलांनाही बचतगटाच्या माध्यमातून हक्काचा रोजगार मिळू लागला आहे. 

आतापर्यंत देशातील विविध बाजारपेठांत स्ट्रॉबेरी फळांची विक्री करण्याबरोबरच येथील शेतकरी स्थानिक प्रक्रिया उद्योगांनाही स्ट्रॉबेरी पुरवू लागला आहे. पण आता त्याच्याही पुढे एक पाऊल टाकत शेतकरी स्वत:च प्रक्रिया उद्योगाकडे वळल्याने अतिरिक्त स्ट्रॉबेरी उत्पादनापासून प्रक्रियेद्वारे पदार्थ तयार होऊन शेतकर्‍यांना आर्थिक लाभ मिळण्याबरोबरच स्ट्रॉबेरी प्रक्रिया उद्योगामध्ये त्यांची खास ओळखही निर्माण होणार आहे. 

स्ट्रॉबेरी उत्पादनावर प्रक्रिया करून ते विविध स्वादांत आणि प्रकारांत ग्राहकांसमोर ठेवले, तर ते ग्राहकांना नक्कीच आवडणार, नेमके हेच सूत्र हेरून येथील शेतकर्‍यांनी प्रथमच स्ट्रॉबेरी मनुका तयार केला आहे. ज्याप्रमाणे द्राक्षापासून तयार होणारा मनुका वर्षभर टिकतो आणि खाणार्‍याला कोणत्याही हंगामात द्राक्षाच्या स्वादाची आठवण करून देतो, त्याचप्रमाणे स्ट्रॉबेरीपासून तयार झालेला मनुकाही वर्षभर टिकाणारा आहे. त्यामुळे कोणत्याही हंगामात स्ट्रॉबेरीप्रेमींना स्ट्रॉबेरीचा स्वाद चाखता येईल. 

स्ट्रॉबेरीच्या फळात पाण्याचे प्रमाण जास्त असते आणि शर्करेचे प्रमाण कमी असते. यामुळे द्राक्षाच्या तुलनेत स्ट्रॉबेरी मनुका तयार करायला अधिक काळ लागतो. साधारण ५२ तासांची ही प्रक्रिया असून त्यासाठी पुण्याच्या तज्ञांचे मार्गदर्शन मिळाले आहे. मनुका तयार करण्यासाठी स्ट्रॉबेरीची प्रतवारी आवश्यक असते. विशेष म्हणजे ही प्रक्रिया पूर्णपणे रसायनविरहित अशी आहे. साडेतीन किलो स्ट्रॉबेरीपासून साधारणत: एक किलो मनुका मिळतो. सध्या प्राथमिक अवस्थेत असलेली मनुका निर्मिती पुढील काळात वाढविण्यात येणार असल्याची माहिती स्ट्रॉबेरी उत्पादक नितीन भिलारे यांनी दिली.

'महान्यूज'मधील मजकूर

No comments:

Post a Comment