Pages

Friday, January 14, 2011

ऊस बेने निर्मिती ठरली फायदेशीर...

सोलापूर जिल्ह्यात माळशिरस तालुक्यातील श्रीपूरच्या पूर्वेला असणार्‍या नेवरे येथे उध्दव शिंदे यांची वडिलोपार्जित अडीच एकर शेती आहे. त्यांनी १९९५ ला दहावीतून शाळा सोडली आणि ते शेतीकडे वळले. अर्थात लहानपणापासूनच असलेली शेतीची आवड त्या दिशेला घेऊन गेली. त्यांची शेती तशी नावालाच बागायती होती. मात्र चढ-उतार, दगड-गोटय़ांनी भरलेली जमिनीच्या मशागतीचे संकट होते. त्यात राबून सर्वप्रथम ही जमीन त्यांनी एकसमान केली. काही ठिकाणी पाणी साचत होते, तेथे दगडाच्या ताली बांधल्या. आवश्यक तेथे बांधबंदिस्ती केली. अजूनही ही जमीन एकसमान झालेली नाही पण त्यांनी त्यातूनही कौशल्याने ठराविक टप्पे पाडून जमीन कसण्यायोग्य करुन घेतली आहे.

सुरुवातीला ज्वारी, बाजरी अशी पारंपरिक पिके घेत श्री. शिंदे ऊस शेतीकडे वळले. या शेतातच विहीर आहे, पण त्याला हंगामी पाणी असते. त्या भरवशावरच आता दोन एकर ऊस आणि अर्धा एकर डाळिंब केले आहे. सातत्याने नवे प्रयोग करण्याची उध्दव यांची वृत्ती आहे. त्यामुळेच सेंद्रिय पध्दतीच्या शेतीसाठी गांडूळ खत, कंपोस्ट खताची निर्मिती असो की सेंद्रिय आणि रासायनिक दोन्हींचा मेळ असो, असे अनेकविध प्रयत्न त्यांनी केले आहेत. या प्रयत्नातून ऊस बियाणे निर्मितीचा मार्ग त्यांना सापडला. 

मागील वर्षी त्यांनी ६७१, तर यंदा ८६०३२ या जातीच्या बियाणांचा मळा तयार केला आहे. अकलूजच्या सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील साखर कारखान्याचे श्री. शिंदे सभासद आहेत. या कारखान्याच्या धोरणानुसारच ऊस लागवडीचे नियोजन केले आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये तीन फूट सरी व दोन डोळे पध्दतीने लागवडीचे नियोजन केले. यंदा चार फूट सरी व एक डोळा पध्दतीचा वापर केला आहे. लागवडीपूर्वी कार्बेन्डाझिम अधिक मॅलॉथियॉन यांची बियाणे क्रिया केली. लागवडीनंतर अडीच-तीन महिन्यांनी प्रथम उगवलेल्या कोंबाची जमिनीलगत कापणी करुन घेतली. नंतर आलेले सर्व फुटवे एकसारखे येऊन त्यांची वाढ चांगली झाली.

श्री. शिंदे म्हणाले, तीन वर्षांतून एकदा माती परीक्षण करुन घेतो. त्यानुसार तसेच पूर्वानुभव व कारखान्याच्या शेती अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनानुसार खतांचे व्यवस्थापन केले. पुढच्या काही महिन्यांतच ऊस चांगला वाढला. दहाव्या महिन्यात तो काढणीस आला, शिवाय उसातील एका कांडीची लांबीही नऊ इंचापर्यंत आली. 

उसाला ठिबकसिंचन पध्दतीने पाणी दिले. आवश्यकतेनुसार ठिबकव्दारे विद्राव्य खतांचाही डोस दिला. वेळच्या वेळी झालेली कामे, पाणी आणि खतांचे योग्य नियोजन यामुळे पिकांची वाढ चांगली झाली. त्यासाठी साखर कारखान्याचे मुख्य कृषी अधिकारी ए. सी. कुमठेकर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. उसाची गुणवत्ता पाहून साखर कारखान्याने शेतकर्‍यांना बियाण्यासाठी या उसाची शिफारस केली. अलिकडेच पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूट संस्थेतील शास्त्रज्ञ डॉ. जे. एन. रेपाळे यांनी भेट देऊन उसाची पाहणी केली. आज श्री. शिंदे यांच्याकडून अनेक शेतकर्‍यांनी बियाणे नेले आहे.

प्रति गुंठा पाच हजार रुपये याप्रमाणे बियाणेमळा दिला असून, त्यातून सुमारे दोन लाखांचे उत्पन्न त्यांना मिळाले आहे. बियाणे निर्मितीसाठीचा एकरी अंदाजे खर्च असा असतो. बियाणे खर्च तीन हजार रुपये, मजूरी खर्च (नांगरण-सरी पाडणे खुरपणीसह) ८ हजार ५०० रुपये, खते १५ हजार रुपये तर अन्य ३ हजार ५०० रुपये मिळून एकूण ३० हजार रुपये खर्च आला आहे. हा खर्च वजा जाता सुमारे पावणेदोन लाखांचे उत्पन्न या शेतीतून मिळाले आहे.

'महान्यूज'मधील मजकूर.

No comments:

Post a Comment