Pages

Friday, January 14, 2011

कुमठय़ात साकारली समूह शेती...



सातारा जिल्ह्याच्या कोरेगाव तालुक्यातील कुमठे येथील शेतकरी कुटुंबातील उच्च शिक्षित दहा तरुणांनी एकत्र येऊन एकविचाराने समूह शेती करण्याचा निर्णय घेतला आहे. समुह शेतीचा उपक्रम यशस्वीपणे राबवून कुमठे येथील तरुणांनी शेतकर्‍यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. हा उपक्रम अधिक फायदेशीर करुन शेतकर्‍यांना या प्रकल्पाकडे आकर्षित करण्यात हे तरुण यशस्वी ठरले आहेत. जिद्द आणि परिश्रमाव्दारे समूह शेतीतून आधुनिक कृषितंत्रज्ञानाव्दारे स्वावलंबी आणि आत्मनिर्भर करण्याचा नवा प्रयोग १० युवक शेतकर्‍यांनी करुन सार्‍या महाराष्ट्रासमोर समूहशेतीचा नवा पायंडा निर्माण केला आहे.

कोरेगाव तालुक्यातील कुमठे गाव हे तालुक्यात सर्व क्षेत्रात स्वकर्तुत्वाने लौकिक प्राप्त केला आहे. गावाला शैक्षणिक बाबतीत मोठा वारसा लाभला आहे. गावात सुशिक्षितांचे प्रमाणही चांगले आहे. पाण्याची सुविधा असल्यामुळे गावातील जवळपास सर्वच शेती बागायती झाली आहे. नोकरीनिमित्त येथील तरूण मुंबई, पुणे, सातारा या ठिकाणी आहेत. नोकरीच्या मागे न लागता उत्तम शेती करुन स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण बनण्याचा निर्धार करुन सचिन शिंदे यांनी आधुनिक शेतीचा मंत्र जोपासला.

कुमठे गावातील सॉफ्टवेअर इंजिनिअर सचिन शिंदे यांनी मुंबईतील चांगल्या पगाराची नोकरी सोडून कुमठे गावीच प्रगतीशील शेती करण्याचा निर्णय घेतला. उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी याप्रमाणे वाटचाल करण्याचा ठाम निर्णयही श्री. शिंदे यांनी घेतला. कुमठे गावात आल्यानंतर श्री. शिंदे यांनी प्रगतीशील आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शेती करण्याचा आपला विचार गावातील सहचारी मित्रांसमोर मांडला. मित्रांनीही त्यांच्या या विचाराला पुष्ठी दिली. 

यामध्ये श्री. शिंदे यांचे गावातील जीवलग दहा मित्र श्रीकांत कोरडे, सिद्धार्थ साबू, अनिल जाधव, युवराज निकम, रमेश जगदाळे, प्रकाश जगदाळे, सचिन जगदाळे, किरण चव्हाण, शंकर सणस व मंगेश शिंदे या सर्वांनी मिळून समूह शेती करण्याचा धाडसी निर्णय घेतला. यासाठी स्वत:च्या मालकीच्या शेतजमिनी त्यांनी वार्षिक खंडाने घेतल्या. भविष्यवेध ऍग्रो या संस्थेची सहकारी तत्त्वावर स्थापना करून कुमठे व मुंबई येथे कार्यालय सुरू केले. डिसेंबर २००८ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या भविष्यवेधने पाच एकर क्षेत्रात सुरूवातीस ढोबळी मिरचीचे आधुनिक पद्धतीने उत्पादन घेतले. सहा महिन्यात ढोबळी मिरचीचे १५३ टन उत्पादन त्यांनी घेतले. याच दरम्यान शेतातील सर्व प्रकारची कामे स्वत: सर्वांनी करायची ठरले. यामुळे मजुरीसाठी लागणार्‍या पैशांची बचत होऊ लागली. स्वत:चा माल ते स्वत: बाजारपेठेत मुंबई, पुणे येथे पाठवू लागले.

यंदाच्या हंगामामध्ये भविष्यवेधने बीट, कोबी, फ्लॉवर, आले, टोमॅटो, कारले, काकडी यासरखी पिके घेउन त्यांना मुंबईत मोठी बाजारपेठही मिळविली. आजपर्यंत या संस्थेने आधुनिक शेतीपध्दती आणि बाजारपेठेचा अंदाज घेऊन पैसे मिळवून देणारे शेती उत्पन्न घेतल्याने भविष्यवेध ऍग्रो या संस्थेची उलाढाल २५ लाखांपर्यंत झाली आहे.

भविष्यवेधचे सर्व आर्थिक व्यवहार पारदर्शकपणे होतात. संस्थेचा वार्षिक ताळेबंद केला जातो. आगामी काळात शेतीसाठी निगडीत उद्योगधंदे उभारणे, शेतकर्‍यांच्या शेतीसहली आयोजित करणे, युवकांना शेतीक्षेत्रातील तसेच रोजगार स्वयंरोजगाराचे मोफत मार्गदर्शन व प्रेरणा देण्यात पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकर्‍यांनी भविष्यवेध ऍग्रो संस्थेकडून मार्गदर्शन घेऊन शेतीमधून चांगले उत्पन्न मिळविले आहे.

नोकरीच्या मागे न लागता शेतीमधूनसुद्धा चांगले उत्पन्न मिळू शकते. कुमठेतील सचिन शिंदे आणि सहकारी मित्रांनी समूहशेतीचा प्रयोग यशस्वी केला असून हा प्रयोग जिल्ह्यातच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रात एक आदर्श उदाहरण ठरत आहे.

'महान्यूज'मधील मजकूर.

No comments:

Post a Comment