Pages

Friday, January 14, 2011

जलसंधारणातून उन्नती साधली आहे मोरेगाव येथे कृषीधन पाणी वापर संस्थेने.



शेतीला पाणी मिळाले तर शेतकर्‍यांच्या जीवनात नंदनवन निर्माण होऊ शकते. पावसाचे पाणी वाहून गेले तर त्याचा काहीही उपयोग होत नाही. पावसाचे पाणी अडविण्यासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. या योजना यशस्वी होण्यासाठी लोकांचाही सहभाग आवश्यक असतो. 

परभणी जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील मोरेगाव येथे कृषीधन पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून दुधना नदीवरील कोल्हापूरी बंधार्‍यात दरवर्षी पाणी अडवून निस्वार्थ सेवा होत आहे. साठवलेल्या पाण्याचा शेतकरी शेतातील पिकासाठी वापर करतात. त्याच बरोबर या परिसरातील विहिरीच्या पाणी पातळीतही यामुळे वाढ झाली आहे.

जिल्हा परिषदेने मोरेगाव येथील दुधना नदीवरील १७२ दरवाज्याचा कोल्हापुरी बंधारा बांधून २००२ मध्ये मोरेगाव येथील कृषीधन पाणी वापर संस्थेकडे हस्तांतरित केला. तेव्हापासून ही संस्था प्रत्येक वर्षी सप्टेंबरमध्ये या बंधार्‍यात पाणी अडवित आहे. या पाण्याचा वापर मोरेगाव, ब्राम्हणगाव, वाघपिंपरी, घोडके पिंपरी, हादगाव येथील शेतकरी आपल्या शेतातील पिकांसाठी करतात. हे पाणी फेब्रुवारीपर्यंत राहत असल्यामुळे कापूस, तूर, ज्वारी, गहू या पिकांना या पाण्याचा लाभ मिळतो. 

परिसरातील गावांत असणार्‍या पाणीपुरवठय़ाच्या विहिरींची पाणी पातळी वाढली आहे. सेलू शहराला पाणीपुरवठा करणार्‍या वाघपिंपरी येथील विहिरीच्या पाणी पातळीत देखील वृध्दी झाली आहे. संस्थेचे अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण हे दरवर्षी पाणी अडवून पाणी वितरित करण्याची जबाबदारी पार पाडतात. यावर्षी सप्टेंबर २०१० मध्ये बंधार्‍यातील सर्व दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग होऊ नये म्हणून प्लॉस्टिक लावण्यात आले आहे. सध्या या बंधार्‍यात मोठय़ा प्रमाणात पाण्याचा साठा झाला आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी डी.डी. वळवी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी या बंधार्‍यास भेट देऊन जलपूजन केले. त्यावेळी श्री. वळवी यांनी या सातत्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले. या कामासाठी अध्यक्ष श्री. चव्हाळ, मोरेगावचे सरपंच किशोर चव्हाळ, ब्राम्हणगावचे सरपंच मदन डोईफोडे, डॉ. परमेश्वर लांडे, संतोष डोईफोडे, काशिनाथ मगर आदी परिश्रम घेत आहेत. हा उपक्रम इतर गावांसाठी आदर्श ठरत आहे. 

'महान्यूज'मधील मजकूर.

No comments:

Post a Comment