Pages

Wednesday, February 23, 2011

कराडात साकारला पहिला ऍग्रो टुरिझम प्रकल्प.


















निलेश मालेकर, अमित बुधकर, राहुल भोसले यांनी कृषि पर्यटनाची वेगळीच संकल्पना मांडून कृषि नवसंजीवनी पर्यटन प्रशिक्षण व संशोधन संस्थेची स्थापना करून त्यामार्फत शिवारची निर्मिती केली आहे. आजपर्यंत भल्या मोठय़ा रानात एखाद्या बागेतून पिकातून फिरणे आणि झाडाखाली जेवणे म्हणजे कृषि पर्यटन अशी संकल्पना होती. यातला मुख्य भाग करमणुकीचाच होता. पण या ठिकाणी कृषि पर्यटन म्हणजे कृषि क्षेत्रातल्या विविध प्रकल्पांची संपूर्ण माहिती होणे, विविध पिकांची ओळख होणे अशा संकल्पना प्रत्यक्षात साकारल्या आहेत.

नवीन पिढीला भुईमूगाचे झाड कसे दिसते, त्याला शेंगा कशा लागतात, केळीचा घड कसा पडतो. गवार, कोबी, ढबू मिरचीची झाडं कशी दिसतात यातलं काहीच माहित नाही. म्हणूनच या ठिकाणी होणारी कृषि क्षेत्राची किमान ओळख रोज आहार असणार्‍या भाज्यांची ओळख आणि विविध प्रकल्पांची संपूर्ण माहिती पर्यटकांना व विशेषत: मुलांना आवडत आहे.

शिवारमध्ये गोठा, गोबर गॅस प्रकल्प गांडूळ खत प्रकल्प, रेशीम उद्योग प्रकल्प, शेततळे व त्यात मत्स्यशेती, पॉलीथीन, मल्चमधील भुईमुग, देशी केळी. स्वीटकॉर्न, ऊस भाजीपाला, ग्लॅडीओलस आदींचे उत्पादन,बांबू प्रक्रिया व बांबू वस्तुनिर्मिती प्रकल्प, ठिंबक व तुषार सिंचन, रोपवाटिकेने सजविलेल्या बैलगाडीतून फेरफटका मारून आणला जातो.

५५ फूट लांबीच्या शेततळ्यावरील झूलता पूल पर्यटकांचे खास आकर्षण ठरला आहे. मुलांना खेळण्यासाठी ऍडव्हेंचर गेम्स, पाच हजार फुटाचे विस्तीर्ण लॉन, गरम हुरडा व मराठमोळ्या पध्दतीचे जेवण यामुळे शिवार संशोधन प्रशिक्षण व पर्यटन बनले आहे. २४ प्रकारचे विविध प्रशिक्षण, बागकाम प्रशिक्षण येथे उपलब्ध करून दिले आहे.

तीन महिन्यांपूर्वी शिवार प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. शहर व परिसरात वीक एन्डल फिरायला जाणार्‍यांची संख्या जास्त आहे. मे महिन्यात प्रकल्प सुरू झाल्यानंतर पहिल्या बीस दिवसांत हजारभर लोकांनी भेट दिली. कराड तालुकाच नव्हे, तर आसपासच्या तालुक्यातील लोकही. या प्रकल्पास भेट देण्यासाठी येत आहेत. शाळांच्या सहलीही येत आहेत. शहर व परिसरातील लोकांना सहकुटंब गावराण जेवणाचा आनंद निसर्गाच्या सानिध्यात घेण्याची संधी यामुळे निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे सहकुटुंब ग्राहक नजरेसमोर ठेवून येथे मांसाहारी जेवण दिले जात नाही. निव्वळ शाहाकारी गावरान पध्दतीचे जेवण दिले आहे. मद्यपानासही बंदी आहे. प्रकल्प पाहण्यासाठी शुल्क नाही.

साडेतीन एकर जागेत साकारलेला हा प्रकल्प म्हणजे ऍग्रो टुरिझमचा आविष्कार आहे. उच्चशिक्षित तरूणांनी शेतीतील नवा उपक्रम येथे राबवला आहे. तो अनेकांच्या कौतुकाचा विषय ठरला आहे. 

'महान्यूज

1 comment:

  1. या प्रकल्पामुळे लोकांची शेतीशी तुटलेली नाळ जुळायला मदत होईल

    ReplyDelete