Pages

Friday, March 25, 2011

परभणीतील कापूस प्रथमच परदेशात.



परभणी जिल्ह्यातील बहुतांश भाग सपाट व नद्यांच्या खोर्‍यातील असून सुपीक आहे. या जिल्ह्यातून गोदावरी, पूर्णा व दुधना या प्रमुख नद्या वाहतात. खरीप हंगामात ज्वारी, मुग, उडीद, तूर, भुईमूग या पिकांसह कापसाचेही उत्पादन घेतले जाते. 

जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील बराच भाग जंगलाचा आहे. तथापि गेल्या काही वर्षांपासून तालुक्यात कापसाचे विक्रमी उत्पादन होत आहे. जिंतूर व बोरी बाजारपेठेत सुमारे दीड लाख क्विंटल कापसाची खरेदी झाली. खरेदीबरोबरच कापसाच्या गाठींची निर्मितीदेखील मोठय़ा प्रमाणात होत आहे. 

आत्तापर्यंत तालुक्यातील दहा जिनिंग व प्रेसिंगमधून प्रक्रिया झालेल्या कापसाच्या गाठी मुंबईसह मध्यप्रदेश, गुजरात या प्रांतात निर्यात होत होत्या. यावेळी त्या प्रथमच थेट देशाबाहेर निर्यात झाल्या आहेत. कापसाचे विक्रमी उत्पादन व गाठींची मोठय़ा प्रमाणातील निर्मिती या पार्श्वभूमीवर उद्योजक बी. आर. तोष्णीवाल यांनी पाच हजार गाठींच्या निर्यातीसाठी गेल्या वर्षापासून प्रयत्न सुरु केले होते. 

केंद्र सरकारच्या कॉटन एक्स्पोर्ट रजिस्ट्रेशन समितीने त्यांना जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात ५०० गाठी निर्यातीची परवानगी दिली. त्यापैकी अयोध्या जिनिंग व प्रेसिंगमधून ३०० गाठी मुंबई बंदरमार्गे हाँगकाँग येथे मे. हाँगकाँग ट्रेड सर्व्हिस कंपनीकडे रवाना झाल्या. जागतिक बाजारपेठेतील सध्याच्या भावानुसार (अमेरिकन डॉलरप्रमाणे) दळणवळणाचा खर्च वगळता कापसाच्या एका खंडीस (तीन क्विंटल ५६ किलो) ५५ हजार रुपये मिळू शकतात.

परभणी जिल्ह्यातून परदेशात कापसाच्या गाठी प्रथमच निर्यात झाल्याने भविष्यात कृषी प्रक्रिया उद्योगाला मोठा वाव मिळण्याची आशा आहे.

No comments:

Post a Comment