Pages

Sunday, May 8, 2011

मिरची कटाई केंद्रामुळे रोजगार निर्मिती.



शहरी भागात मोठय़ा प्रमाणात नवनवे उद्योगधंदे उभारले जात असल्यामुळे रोजगाराच्या संधी शोधत खेडय़ातील लोकांनी शहराकडे चला असा मोर्चा वळविला आहे. मात्र नागपूर जिल्ह्यातील भिवापुरात असा कोणताही मोठा वा लहान उद्योग नसतानाही केवळ मिरची कटाई केंद्राच्या माध्यमातून शेकडो घरी चुली पेटत आहेत.

सध्या भिवापूर शहरात आठ मिरची कटाई केंद्र सुरू असून यात शहरातील जवळपास दोन हजार मजुरांच्या हाती काम मिळाले आहे. पूर्वीपासूनच मिरची कटाई हे येथील मजूर वर्गाचे मुख्य काम असून त्यामुळे या मजुरांना मिरची कटाईची खास कला अवगत झाली आहे. मिरची कटाई केंद्रावर कार्यरत मजूर मिरचीची दांडी (मिरचीची मुखी) कट करतात. मिरची कटाई हे एकमेव भिवापूरकरांचे उदरनिर्वाहाचे माध्यम असल्याने बेरोजगारीच्या सावटात हे केंद्र मजुरांसाठी संजीवनी ठरले आहेत.

ब्लॅक सीड मिरची जी भिवापुरी मिरची या नावाने ओळखली जाते, ती दिसायला लालभडक, खायला तिखट आणि चविष्ट असते. या मिरचीला देश-विदेशात चांगली मागणी आहे. मध्यंतरी या भिवापुरी मिरचीची ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, चीन आदी ठिकाणी निर्यात होत होती. मात्र कालांतराने बारा महिने मेहनत करून येथील शेतकर्‍यांच्या मिरचीला पाहिजे तसा भाव मिळत नसल्याने तालुक्यात मिरचीचे लागवड क्षेत्र कमी झाले. तसेच उत्पादन कमी झाल्याने मिरची कटाई केंद्रांची संख्याही मंदावली. 

पूर्वी शहरात बाहेरील व्यापार्‍यांसह येथील शेतकर्‍यांचे एकूण २० ते २५ केंद्र, सातरे असायचे व यातून शहरातील तीन ते चार हजार मजुरांना हाती काम मिळायचे. मागील काही वर्षांपासून इतर राज्यातील मिरची सुध्दा भिवापुरात कटाईकरिता येते. यात आंध्र प्रदेशातील गुंटूर, खमम व आसाम, नांदुरा, खामगाव या ठिकाणाहून तेजा, लवंगी, ३/३४, आयबर्ड या जातीच्या मिरचीचा समावेश आहे.

भिवापुरात सध्या आठ मिरची कटाई केंद्र सुरू आहेत. यात हिरालाल जनबंधू (भिवापूर), यामीनभाई, रसीदभाई दिल्लीवाले, कारानी चिलीज (नागपूर), सुभानभाई (भिवापूर), मन्नान सेठ नांदुरा, सलीमभाई दिल्लीवाले, या व्यापार्‍यांच्या मिरची कटाई केंद्राचा समावेश आहे. एका केंद्रावर २०० ते २५० मजूर काम करीत असल्याने शहरातील जवळपास दोन हजार मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे. सध्या मिरचीची आवक कमी झाल्याने येथे काम करणार्‍या मजुरांना प्रती पोता कटाई मागे ८० ते १०० रुपये प्राप्त करता येत आहेत.

No comments:

Post a Comment