Pages

Sunday, May 8, 2011

एक हजार हेक्टरवर आधुनिक शेती.



लोकसंख्या वाढत आहे आणि उत्पादन क्षेत्र कमी होत आहे. यामुळे उत्पादन वाढविण्यासाठी शासनाने विविध योजनांची अंमलबजावणी करणे सुरु केली आहे. याचाच एक भाग म्हणून आधुनिक शेती तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी कृषी विभागाने चंद्रपूर जिल्हयाच्या राजुरा विभागात एक हजार हेक्टर क्षेत्रावर आधुनिक पध्दतीचा अवलंब करुन जास्त उत्पादन घेण्याचा आदर्श प्रकल्प पुढील हंगामासाठी तयार केला आहे. या प्रयोगाची प्रथमच अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

पावसाची अनियमितता, पिकावरील रोग, प्रदुषण या सर्व बाबींमुळे दिवसेंदिवस शेतीच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. मात्र विपरीत परिस्थितीत शेतक-यांना दिलासा देण्यासाठी व आधुनिक शेतीचे तंत्र जनसामान्यांत पोचविण्यासाठी या प्रकल्पाचा फायदा होईल. या प्रकल्पासाठी एक हजार हेक्टर जमीनवर कापूस, तर एक हजार हेक्टर जमीनवर सोयाबीनकरिता राखीव ठेवण्यात आली आहे.

याअंतर्गत पीक लागवडीपुर्वी माती परीक्षण, मशागतीपासून सुधारित बियांची निवड, पेरा, जैविक खत, पाणी व्यवस्थापन, कीड व्यवस्थापन, जलसंधारण आदी बाबीवर शास्त्रीय मार्गदर्शन करुन पिके घेतली जाईल. येत्या काळात पिकांच्या वाढीच्या नोंदी, त्यावरील कीड व त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आखल्या जातील. कृषी विभागामार्फत शेतीशाळा, पीक प्रात्यक्षिकांवर भर देण्यात येत आहे. शेतीशाळेसाठी निवडक ३० शेतक-यांना प्रतिनिधिक स्वरुपात प्रशिक्षण देण्यात येत आहे. आठवडयातून एक दिवस, याप्रमाणे प्रत्येक विषयावर योग्य मार्गदर्शन दिल्यानंतर आपापल्या गावांत ते मार्गदर्शन करतील.

या योजनेअंतर्गत पिकावरील रोग नियंत्रणासाठी प्रलोभन सापळे लावण्यात येईल. यामुळे किडीचा मोठया प्रमाणावर बंदोबस्त होईल. एकंदरीत उत्पादनवाढीसाठी शास्त्रीय व आधुनिक शेतीचे तंत्रज्ञान सामान्य जनतेपर्यंत पोचण्यासाठी हा प्रकल्प राबविण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. यासाठी प्रायोगिक स्वरुपात राजूरा तालुक्यातील अहेरी, खामोना, मुठरा, पांढरपोवनी, चंदनवाही, रानवेली, सोंडो, सोनुर्ली, सिंदेश्वर, लक्कडकोट, खिर्डी या गावांतील जमिनीची निवड करण्यात आली असून येथे हा प्रकल्प राबविला जात आहे.

No comments:

Post a Comment