Pages

Wednesday, June 8, 2011

सांडपाण्यावर पिकविला भाजीचा मळा.




माणगावपासून २५ कि.मी. अंतरावरील निसर्गाच्या कुशीत वसलेल्या गोवेले गावाची लोकसंख्या ४५० एवढी आहे. गावातील बरीचशी पुरुष मंडळी नोकरीनिमित्त मुंबईला असतात. गावातील लोकांचा शेती हाच मुख्य व्यवसाय असल्याने महिलांनीही पुरुषांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. याच गावातील वयस्कर असणाऱ्या हिराबाई राजाराम साळुंखे या महिलेने घरातील सांडपाण्यावर भाजीचा मळा तयार केला आहे. पायख्याचा (सांडपाण्याचा) उपयोग कसा करायचा हे दाखवून देऊन त्यांनी टॉमेटो, मिरची, घेवडा, वांगी इत्यादी भाज्यांचे उत्पादन घेतले आहे.

येथील शेतकऱ्यांना फक्त पावसाच्या पाण्यावरच शेती करावी लागते. उन्हाळी पाणी नसल्याने व डोंगराळ भाग असल्याने उन्हाळी शेती करता येत नाही. गावात पुरातन काळातील गणपती मंदिर तसेच भेरीचा मंदिर असल्याने गावातील वातावरण भक्तीमय आहे. गणेश जयंती दिवशी गावात सप्ताह सुरु होतो. अशा या निसर्गरम्य तसेच भक्तीमय गावात घरातील वाया जाणाऱ्या सांडपाण्याचा उपयोग करुन घेवडा, वांगी, टॉमेटो, मिरची, आळूची पाने इत्यादी प्रकारच्या भाजीबरोबरच अबोलींच्या फुलांची बागही तयार करण्यात आली आहे.

कोणत्याही प्रकारचे खत न वापरता फक्त शेणखत व पाण्याचा वापर करुन त्यांनी भाजीमळा पिकविला आहे. स्वत:च्या पोटापाण्याचा मार्ग स्वत:च शोधायचा असतो. उतारवयात देखील कष्ट करण्याची हिंमत उराशी बाळगून गोवेले गावातील हिराबाई साळुंखे यांनी भाजीपाला शेतीची कास धरुन रोजंदारीचा प्रश्नही सोडविला आहे. हाच आदर्श नोकरीसाठी फिरणाऱ्या तरुणांनी डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. यातूनच स्वयंरोजगार निर्माण होतो. शिवाय स्वत:च्या कुटुंबाबरोबर गावाचा विकासदेखील होतो. माणसाने कष्ट करण्याची तयारी ठेवली तर शेतीबरोबरच भाजी पाल्याचे पिकही उत्तम घेता येते, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

हिराबाई या स्वत:च्या कुंटुंबाला लागणारी भाजी उपयोगात आणून उरलेली भाजी विकून चार पैसेही कमावित आहेत, हेही नसे थोडके.

1 comment: