Pages

Thursday, July 7, 2011

कृषि विकासाचा ठाणे पॅटर्न




वैधतेने नटलेल्या ठाणे जिल्ह्यातील पाणी, हवामान, जमीन हे घटक शेती व्यवसायास अनुकूल आहेत. परंतु पावसाच्या लहरीपणावर अवलंबून असणारी शेती बिनभरोशाची ठरते. बहुतांशी आदिवासी भाग असणाऱ्या या क्षेत्रात पारंपरिक शेती व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबांची संख्याही अधिक आहे. या भागात किफायतशीर ठरणाऱ्या नवीन पीक पध्दतीचे येथील आदिवासी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले तर या पध्दतीचा अवलंब करून ते आर्थिक उन्नती साधू शकतील, या विचारधारेतून जिल्हा प्रशासनाने कृषि विभागाच्या वतीने कृषि विकासाचे नाविण्यपूर्ण उपक्रम हाती घेतले आहेत. त्यामधील शेडनेट हाऊस उभारणीतून जागृती पष्टे यांनी फुले, भाजीपाला घेऊन आर्थिक प्रगती साधली आहे.

राज्यात प्रगत भागात शेडनेट हाऊस उभारणी मोठ्या प्रमाणावर केली जाते. फुले, भाजीपाला यासारख्या पिकांचे अधिक उत्पादन घेण्यासाठी शेडनेट हाऊस अत्यंत उपयुक्त ठरली असल्याची उदाहरणे राज्यात दिसून येतात. १० गुंठ्यांचे शेडनेट हाऊस उभारणीसाठी २ लाख ७२ हजार रुपये खर्च येतो. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत खर्चाच्या ५० टक्के अथवा १ लाख ३६ हजार रुपयाचे अनुदानही लाभार्थ्यांना मिळते. त्यामुळे या योजनेकडे आदिवासी शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी प्रकल्प उभारण्याची तयारी असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी चर्चासत्र आयोजित केले जाते. तळेगाव दाभाडे येथील फलोत्पादन प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण आणि उभारणी ते विक्री व्यवस्थापनापर्यंत मार्गदर्शनही येथे केले जाते. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात ३१ शेडनेट हाऊसची उभारणी झाली. त्यापैकी २२ आदिवासी शेतकरी आहेत हे विशेष. या योजनेची व्याप्ती वाढविण्यासाठी सन २०११-१२ मध्ये १०० शेडनेट हाऊस उभारणीचे उद्दीष्ट ठरविण्यात आले आहे. 

शेती व्यवसायातून शाश्वत उत्पादन देणाऱ्या योजनेचा लाभ वाडा तालुक्यातील निचोळ गावातील जागृती पष्टे यांनी घेतला. स्वत: शेतजमिनीतील १० गुंठे जागेवर शेडनेट हाऊसची उभारणी करुन त्यात झेंडूची लागवड केली. त्यातून त्यांना ४० हजार रुपयांचे उत्पादन मिळाले. यानंतर ढोबळी मिरचीची लागवड केली. हे पिकही या हाऊसमध्ये उत्तमरित्या आले असून त्यातूनही त्यांना चांगला फायदा अपेक्षित आहे. 

मेहनत, जिद्द, कष्ट करण्याची तयारी असेल तर कोणत्याही संकटावर मात करणे शक्य होते. निश्चित ध्येय समोर ठेऊन नवनवीन करण्याची प्रबळ इच्छाशक्ती असेल आणि योग्य मार्गदर्शनासह सहकार्य लाभले तर, प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणे शक्य होते. जिल्हा प्रशासनाने कृषि विभागाच्या वतीने हाती घेतलेल्या विकासाच्या या पर्वात सौ. पष्टे यांच्यासारखे शेतकरी सहभागी झाले तर कृषी उत्पन्नात निश्चित वाढ होणार आहे. 

No comments:

Post a Comment