Pages

Tuesday, July 19, 2011

मच्छिमार बांधवांसाठी उपयुक्त दॅट उपकरण




वल्हव रे नाखवा म्हणत समुद्रात खोलवर शिरण्यासाठी असणारे जिगर मच्छिमार बांधवांकडे असते. आम्ही डोलकर म्हणणारे हे दर्याचे राजेच जणू! आपला जीव धोक्यात घालण्याचे धाडस मच्छिमारांच्या रक्तात असते. पण, कधी कधी हे धाडस त्यांच्या जीवावर बेतू शकते. आता असे एक यंत्र आले आहे की ज्याच्यामुळे मच्छिमार बांधवांना धोक्याची सूचना देता येऊ शकते. . डिस्ट्रेस अलर्ट ट्रान्‍समीटर म्हणजेच दॅट असे या उपकरणाचे नाव आहे. 

ठाणे जिल्ह्‌यातील डहाणू व इतर काही तालुक्यातील मच्छिमारांना दॅट हे उपकरण विनामूल्य मिळणार आहे. या उपकरणामुळे मच्छिमारांना खोल समुद्रात आपत्कालीन स्थितीची माहिती मिळेल. यामुळे मासे पकडताना होणाऱ्या दुर्घटनेतून ते वाचू शकतात. याची निर्मिती भारतीय अंतराळ संशोधन संस्था ( इस्त्रो ) ने भारतीय तटरक्षकांसोबत मिळून केली आहे.

देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दॅट हे उपकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. समुद्रात अनोळखी किंवा अतिरेकी नौका दिसल्यास, बोटीत आग लागणे, बोट बुडत असल्यास त्याची माहिती यंत्राचे बटण दाबून देता येईल. तसेच, कोणी आजारी पडल्यास किंवा बोटीत असलेले कामगार समुद्रात पडणे किंवा तुफान वादळात बोट सापडने आदी वेगवेगळ्या धोक्यांची सूचना या यंत्राचे बटण दाबून देता येते. प्रत्येक आपत्तीकालीन स्थितीच्या संकेतासाठी वेगवेगळे बटण आहे. 


कोणत्याही आपत्कालिन स्थितीत मच्छिमारांना उचित बटण दाबावे लागेल. ज्यानंतर या उपकरणाने सिग्नल उपग्रहाद्वारे तटरक्षक व समुद्री बचाव समन्वय केंद्रापर्यत पोहोचते. यानंतर ज्या प्रकारचेही सिग्नल असेल, त्यानुरुप मच्छिमारांना मदत दिली जाईल. 

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या उपकरणाची किंमत ५०,००० रुपये आहे. परंतु शासनाच्या वतीने मच्छीमारांसाठी हे उपकरण अवघ्या १०,००० रुपयांमध्ये उपलब्ध करुन दिले जाणार आहे. प्रत्येक मच्छीमाराने स्वत:च्या तसेच देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून हे उपकरण जवळ बाळगल्यास ते सर्वांच्याच हिताचे ठरणार आहे.

परंतु, काही ठिकाणी मच्छिमारांना प्रायोगिक तत्वावर हे उपकरण नि:शुक्ल वितरीत केले जाणार आहे.डहाणू तालुक्यातील २६ मच्छिमारांना याचे नुकतेच वाटप करण्यात आले मान्सून व वादळी हवामान दरम्यान यामुळे मच्छिमारांना मदत मिळेल व त्यांचे संरक्षण होईल.

No comments:

Post a Comment