Pages

Friday, July 22, 2011

लातूर जिल्ह्यात निलक्रांती

जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाने गेल्या काही वर्षात सिंचन प्रकल्पातून गाळ उपशाचे , जलसंधारणचे काम मोठ्या प्रमाणात केल्यामुळे जिल्ह्यात उत्तम प्रकार जलसाठे निर्माण झाले आहेत. याप्रकारे जिल्ह्याला लाभलेल्या जलक्षेत्राची अनुकूलता पाहता इथे मत्स्य व्यवसायाचे भरण पोषण, उत्तम होऊ शकते . हे ओळखून जिल्हा प्रशासनाने मत्स्य व्यवसायाला गतीमान करण्याचं धोरण स्वीकारलं आहे . यातून मत्स्य व्यवसायिक तसेच सुशिक्षीत बेरोजगारांना शाश्वत उत्पन्नाचा मार्ग मिळाला आहे . 

लातूर जिल्ह्यात पूर्वी जलक्षेत्र जेमतेम तर मच्छिमार संस्था मोजक्या होत्या. विशेष म्हणजे जिल्हा निर्माण झाला, त्यावेळी मत्स्य व्यावसायिकांना कोलकत्याहून मत्स्यबीज आयात करावे लागत असे. व्यावसायिकांची होणारी दमछाक ओळखून शासनाने घरणी येथे मत्स्यबीज उत्पादन केंद्र सुरु केले . या केंद्रात येथील वातावरणाला पूरक असलेल्या कटला, रोहू, मृगल व सायप्रीनस या जातीच्या मत्स्यबीजाची निर्मिती होऊ लागली. वर्षाकाठी जवळपास तीन कोटी मत्स्यबीजांचे उत्पादन यातून मिळू लागले . पुढे तलाव आणि अन्य जलस्त्रोत वाढ झाली. 


जिल्ह्यात जलक्षेत्रात १३४१६ हेक्टर अशी वाढ झाली. स्थानिक पातळीवर मस्त्यबीज उपलब्ध झाल्याने व ते माफक दरात मिळत असल्यानं अनेकांनी हा व्यवसाय स्विकारला आहे. आजघडीस जिल्ह्यात तब्बल ७९ मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था आहेत . त्यांच्या २०६० सभासदांना यामुळं रोजगार उपलब्ध झाला आहे. या व्यवसायिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ दिला जात आहे.

पारंपरिक पध्दतीनं मासे न धरता शास्त्रीय पध्दतीने आणि धोक्याशिवाय ते कसे धरावेत यासाठी मत्स्य व्यवसायिकांना जिल्हा मत्स्य व्यवसाय कार्यालयातर्फे प्रशिक्षण दिलं जात आहे. विशेष म्हणजे अनुसूचित जाती , जमातीतील लाभार्थ्यांना प्रशिक्षण कालावधीत विद्यावेतनही दिलं जात आहे.

या लाभार्थ्यांना अनुदानावर जाळे पुरविण्यात येत आहेत. बिगर यांत्रिकी नौकेसाठी ५० टक्के अनुदान दिले जात आहे . पूर्वी पोत्यात अथवा टोपलीत मासे ठेवून ते इतर गावच्या बाजारात विक्रीसाठी नेले जात असत हे मासे घेवून बसमध्ये चढण्याचा प्रयत्न केला तर, माशांच्या उग्र वासामुळं या व्यवसायिकांना बसमध्ये घेतलं जातं नसे. परिणामी पायपीट करतच बाजार गाठावा लागे. यामुळं माशाचे नुकसान होऊन, मालाची प्रतवारी घसरायची, हे टाळण्यासाठी प्रशासनाच्यावतीने मत्स्य व्यवसायिकांना मोफत सायकली आणि शीतपेट्या पुरविण्यात आल्या आहेत. त्यामुळं ग्राहकांना ताजा आणि चांगला मासे मिळू लागली आहेत.

शीतपेटीमुळं बर्फात मासे ठेवण्याची सुविधा उपलब्ध झाला आहे. तसेच त्याला सायकलींची साथ लाभल्यानं बाजारपेठही लवकर गाठता येऊ लागली आहे. त्यामुळे मस्त्य व्यवसायिकांच्या उत्पन्नात वाढ तर झाली आहेच त्याचबरोबर या व्यवसायिकांच्या जीवनमानात वाढ झाली आहे. त्यांच्या परिवारसही त्याचा फायदा झाला आहे.

सध्या त्यामुळं व्यावसायिकांची मुलं उच्च शिक्षण घेत आहेत. कधीकाळी कुडा-मातीनं साकारलेल्या घरात राहणारे हे व्यावसायिक आता पक्क्या घरात राहत आहेत. त्यांची मत्स्य विक्री केवळ लातूर पुरती मर्यादीत न राहता नांदेड , सोलापूर आणि शेजारच्या आंध्रप्रदेशातही पोहचली आहे. एकंदरीत या निलक्रांतीनं या व्यवसायिकांत एक नवा उत्साह संचारला आहे.

1 comment:

  1. योजनाची माहिती दयावी

    ReplyDelete