Pages

Friday, July 22, 2011

माळरानावर कुक्कुटपालन




सांगोला तालुका म्हटले की माण, म्हसवड या लगतच्या तालुक्यातील उजाड वैराण प्रदेश आठवतो. पाण्याचे सतत दुर्लक्ष असणा-या या तालुक्याने आता सिंचनाव्दारे हरितक्रांती केली. येथील भगवा आणि गणेश डाळींबाने सांगोल्याचा नावलौकिक सर्वदूर पसरविला आहे. दुष्काळाच्या छायेत सतत वावरणा-या येथील माणसांच्या मनात मात्र सतत आर्थिक प्रगतीचा हिरवा अंकूर फुलतो आहे. मौजे डिकसळ ता.सांगोला येथे राहणा-या अशाच एका गणेश गायकवाडची कथा खास महान्यूजच्या वाचकांसाठी.

केवळ पाचवीपर्यंतच शिक्षण घेऊन ट्रक चालकाची नोकरी करणा-या डिकसळ(ता.सांगोला) येथील गणेश गायकवाड या तरुणाने प्रारंभी वाहने चालवण्या मध्ये नशीब अजमाविण्याचा निर्णय घेतला. काही दिवस वाहने चालवली पण ,मात्र त्यामध्ये त्याचे लक्ष लागत नव्हते. नंतर त्याने कुक्कुट पालनाचा निर्णय घेतला त्यानुसार घराशेजारीच कुक्कुटपालन करुन देशी ५०० कोंबडयांचा सांभाळ केला आहे.


हंगिरगे येथील पाहुणे संजय सावंत यांच्या कुक्कुटपालनची पाहणी करुन त्यांच्या सल्ल्यानुसार घरासमोरील माळरानावर शेड उभा करुन टेंभुर्णी येथून कोंबडीच्या ५०० पिल्लांची खरेदी केली. यामध्ये सर्व देशी नर मादींचा समावेश आहे. कोणतेही पुर्व ज्ञान नसताना व घरातील सर्वजण अशिक्षित असतानाही त्यांचा हा फॉर्म बहरला आहे. हा उपक्रम सुरु करुन ७० दिवस झाले. कोंबडयांना दररोज चांगले खाद्य दिले जाते. त्यासाठी शेडमध्ये खाण्यापिण्यासाठी भांडी बसवली आहेत. आठवडयातून तीन दिवस यातील खाद्य व पाणी बदलले जाते.

माळरानांवर वीज नसल्याने त्यांनी गॅसबत्तीची सोय केली आहे. प्रारंभी ६ व २५ व्या दिवशी डोळयातून लसीकरण , ९ व ३५ व्या दिवशी चोच कापणी व ६० व्या दिवशी डोळयातून लसोटा लस दिलेली आहे. सध्या यातील कोंबडया पाऊण किलो वजनाच्या झाल्या असून २५ दिवसानंतर त्यांची परिपूर्ण वाढ होते आहे. नराचे वजन १ किलो ४०० ग्रॅम तर मादीचे वजन १ किलो २०० ग्रॅमपर्यंत भरते.

सरासरी १०५ ते ११५ रुपयांपर्यंत एक नग जात असून यासाठी जास्त कष्ट घ्यावे लागत नाहीत. घरबसल्या कुक्कुटपालन हा व्यवसाय उपयुक्त असून विक्रीसाठी बाजारपेठ शोधावी लागत नाही. आगामी काळात दोन हजार पक्षी पालनाचा गायकवाड यांचा मनोदय आहे. एकंदरित गणेशाचा महिमा तसा अगाधच आहे. त्यामुळे हा गणेश ही लवकरच दोन हजार पक्षी पालनाचा संकल्प तडीस नेईल यात अतिशोक्ती नाही तर दुर्दम्य आत्मविश्वास जाणवतो. त्याच्या या निरंतर धडपडीला व हातांना साथ देण्याची गरज आहे ती आर्थिक संस्थानी, या संस्थांनी साथ दिल्यास असे अनेक गणेश स्वत:च्या पायावर उभे राहतील.

No comments:

Post a Comment