Pages

Monday, October 10, 2011

शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी कोरडवाहू शाश्वत शेती प्रकल्प - राधाकृष्ण विखे पाटील


राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत कोरडवाहू शाश्वत शेती प्रकल्प गोगलगाव येथे राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत संकरीत गाई, शेळीपालन, कुक्कुट पालन, शेततळे, ठिबक सिंचन आदी योजना एकत्रितपणे राबवून शेतकऱ्यांनी आर्थिक उन्नती साधावी असे प्रतिपादन कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी येथे केले.

राहाता तालुक्यातील गोगलगाव येथे पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या डाग पाझर तलावाचे भूमिपूजन व कोरडवाहू शाश्वत शेती प्रकल्पाचा शुभारंभ श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाला यावेळी ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक शांतीनाथ आहेर पाटील होते.

श्री.विखे पाटील म्हणाले की, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून डाग पाझर तलावात पाणी सोडल्याने ८० टक्के शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. राज्यात साखर कारखान्याच्यावतीने अशा प्रकारचा पाणी लिफ्ट करण्याचा पहिलाच उपक्रम आहे. कोरडवाहू शाश्वत शेती प्रकल्प गावामध्ये एकत्रितपणे राबविण्यात येत आहे. हा प्रकल्प महत्वाकांक्षी असून यामुळे गावात संकरित गाई, कुक्कुट पालन, शेततळे, ठिबक सिंचन, वैरण विकास, सुधारित औजारे वाटप, ग्राम बिजोत्पादन, धान्य साठवणूक गोडावून,पिक विमा, पाईप, इलेक्ट्रिक पाईप, आदी योजना राबविण्यात येणार आहेत. गावातील सर्व क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणणे, शेत तलावात पाणी आणून ठिबकद्वारे शेतीला पाणी देणे हा प्रकल्प राबविण्यात येणार असून यामुळे सर्वांना सारखे पाणी मिळणार आहे.

या समारंभास डॉ.भास्करराव खर्डे पाटील, उपाध्यक्ष रामभाऊ पाटील, काशिनाथ विखे पाटील, बन्सी तांबे पाटील, सुभाष गाडेकर, उप विभागीय अधिकारी पंडित लोणार, कर्मचारी ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

प्रारंभी गोगलगावचे सरपंच प्रभाकर मगर, उपसरपंच शांताराम कांदळकर यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

No comments:

Post a Comment