Pages

Saturday, January 22, 2011

तूरडाळ १०० रुपयांवर जाणार,घाऊक बाजार ७० रुपये किलो झाला .

तूरडाळीचा दर आता गेल्या वर्षां प्रमाणेच दिवसागणिक वाढत असून आता ते १०० रुपये किलोवर जाऊन पोहोचतील, असा अंदाज घाऊक व किरकोळ व्यापाऱ्यांना वाटतो आहे. आज मुंबईतील घाऊक बाजारात तूरडाळीचे दर क्विंटलमागे ४०० रुपयांनी वाढले आणि कालपर्यंत ६८ रुपये किलो असलेली तूरडाळ आज ७० रुपये किलोवर जाऊन पोचली. त्यामुळे किरकोळ बाजारात आता तूरडाळीचे दर ८० ते ८५ रुपये होणार असल्याचा अंदाज आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये तूरडाळीचे दर क्विंटलमागे २००० रुपयांनी वाढले आहेत. मात्र अद्याप तूरडाळीच्या भरमसाठ किमतवाढीबाबत राज्य तसेच केंद्र सरकारने कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत. विदर्भात आलेल्या प्रचंड थंडीच्या लाटेमुळे तुरीचे काहीप्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे वायदेबाजारातील सटोडियांनी तुरीचे भाव मोठय़ा प्रमाणावर वाढविण्यास सुरूवात केल्याने तुरीच्या दरात व त्यामुळेच तूरडाळीच्या दरात मोठी वाढ झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. भारतात सुमारे २० दशलक्ष टन कडधान्यांची गरज असते. भारतात सुमारे १४.५ दशलक्ष टन कडधान्यांचे उत्पादन होते. तर ६.५ दशलक्ष टन कडधान्य हे आपण आयात करतो. मात्र भारतातील प्रथिनांची गरज ही प्रामुख्याने कडधान्यांद्वारेच भागविली जाते. असे असतानाही गेल्या १० ते १२ वर्षांमध्ये कडधान्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी यासाठी केंद्रीय कृषी खात्याने कोणत्याही विशेष योजना न आखल्यानेच दर वर्षी कडधान्ये व डाळींच्या किमतीत भरमसाठ वाढीचा बोजा सामान्य जनतेवर पडत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

No comments:

Post a Comment