Pages

Saturday, June 11, 2011

धवलक्रांतीतून उन्नती.




सिंधुदुर्ग जिल्हयातील गोवरी येथील सत्पुरूष महिला बचत गटाने खाद्यपदार्थ , हॉटेल व्यवसाय , भाजीपाला दुग्धव्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक उन्नती साधली आहे. सत्पुरूष महिला बचत गटांची स्थापना ५ एप्रिल २००३ मध्ये करण्यात आली.गोवरी स्थळकरवाडीतील महिलांनी व पुरूषांनी एकत्ररित्या गृहपयोगी खाद्यपदार्थ , भाजीपाला, हॉटेल व्यवसाय दुग्धव्यवसाय निवडले.

बँक ऑफ बडोदा, शाखा कुडाळ तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व गोमुखच्या सहकार्याने प्रथम २००५ साली २० हजार रूपये, खेळते भांडवल देण्यात आले.या निधीतून गटातील महिलांनी आणि पुरूषांनी एकत्रित रित्या गृहपयोगी खाद्यपदार्थ भाजीपाला , हॉटेल व्यवसाय सुरू केला. व्यवसायाच्या माध्यमातून २००५ साली देण्यात आलेले २० हजार रू एका वर्षात व्याजासहित फेडण्यात यशस्वी ठरल्या.

गटाच्या प्रगतीचा वाढता आलेख पाहून २७ एप्रिल २००८ रोजी बँक ऑफ बडोदा, शाखा कुडाळ यांचेकडून २ लाख ५० हजार रू.दुग्धव्यवसायाकरिता मंजूर करण्यात आले.सदर गटातील महिला व पुरूष यांनी मिळून सुमारे १३ म्हशी खरेदी करून दुग्धव्यवसायाच्या माध्यमातून आपल्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढवत आहेत.

या गटातील सर्व सदस्य शेतकरी कुटुंबातील असून भाजीपाला व शेतीच्या माध्यमातून म्हशी पालनाचे काम सहजपणे करू शकतात. शेतात असलेला हिरवा चारा, सुका चारा सहज उपलब्ध होऊ शकतो.त्यामुळे दुग्धव्यवसाय करणे किफायतशीर ठरत असल्याने स्थानिक ग्राहकांना परिसरातील व कुडाळ बाजारपेठमध्ये दुध विक्री करण्यास मिळेल.अशा गोष्टींचा विचार विनिमय करून या गटाने अडीच लाख रू.मधून १३ म्हशी खरेदी करून दुग्धव्यवसायाच्या माध्यमातून आपल्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढवत आहेत

केवळ चूल आणि मूल एवढया पुरते मर्यादीत न राहता बचत गटाच्या माध्यमातून सत्पुरूष महिला बचत गटातील महिलांनी व पुरूषांनी एकत्रितरित्या व्यवसाय करून इतर बचत गटापुढे आदर्श निर्माण केला आहे.

या दुग्धव्यवसायाला जोडधंदा म्हणून तूप, लोणी, ताक असे विविध प्रकारचे दुधापासून बनविण्यात येणारे पदार्थ तयार करून विक्रीसाठी नेत असतात.दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून दर महिन्याला सुमारे चार ते पाच हजार रूपयांचा फायदा होत असतो. या गटाला १३ म्हशीकडून रोज मिळणारे दूध गोबरी परिसरातील स्थानिक लोकांना कुडाळ शहरात फिरती करून विक्री करण्याचे काम गावेरी येथील लक्ष्मण गावडे यशस्वीरित्या करतात.दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून बॅकेतून घेतलेले २ लाख ५० हजार मधून १ लाख ९५ हजार व्याजासहित फेड केले आहेत.

सत्पुरूष महिला बचत गटातील सर्व सदस्य दारिद्रयरेषेखाली असून दर महिन्याच्या १ तारखेला सभा लावण्यात येते. मासिक बचत ३० रूपये प्रमाणे ३९० रू जमा करण्यात येते.या गटाच्या प्रत्येक बैठकीत गटातील समस्या सोडविण्याचा व गटाची उत्तरोत्तर प्रगती साधण्यासाठी गटाचे उपाध्यक्ष यशस्वी प्रयत्न करीत असतात.

सत्पुरूष महिला बचत गटाचा सन २००८-०९ मध्ये तालुकास्तरीय तृतीय क्रमांकाचा राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार प्रदान करून गटातील सर्व सदस्यांचा शासनाच्या वतीने गौरव करून प्रशस्तीपत्रक व ट्रॉफी देवून सन्मानित करण्यात आले आहे.

या गटाने दुग्ध व्यवसायाबरोबर भाजीपाला उत्पादनातून लालभाजी, मुळा भाजी, दोडकी, वांगी, मिरच्या, चिबूड, काकडी अशा विविध प्रकारची भाजीपाला लागवड केली, उत्पादीत केलेली भाजी, गोवरी, वाडीवरवडे, पिंगुळी, कुडाळ, वालावल, आदी ठिकाणच्या बाजारपेठा विक्रीसाठी काबीज केल्या आहेत.


No comments:

Post a Comment