Pages

Thursday, October 6, 2011

राज्यात हळव्या भाताची काढणी सुरु तर भुईमूग, तूर, कापूस पक्वतेच्या अवस्थेत


राज्यात चालू वर्षी खरीप पिकाच्या दृष्टीने चांगला पाऊस झाला असून हळव्या भाताची काढणी सुरु झाली आहे. निमगरवे भात दाणे भरण्याच्या अवस्थेत तसेच गरवे भात फुलोरा अवस्थेत आहे. ज्वारी दाणे भरण्याच्या अवस्थेत असून बाजरीची काढणी सुरु आहे. मूग, उडीद आणि सोयाबीन पिकाची काढणी सुरु झाली आहे. भुईमूग, तूर आणि कापूस पक्वतेच्या अवस्थेत आहेत.

राज्यात चालू वर्षी आतापर्यंत १,१६७.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

राज्यातील नाशिक जिल्ह्यातील देवळी, सातारा जिल्ह्यातील मान दहीवडी, सांगली जिल्ह्यातील जत, कवठेमहांकाळ, पलूस, कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम, नांदेड जिल्ह्यातील भोकर, बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा, आणि यवतमाळ जिल्ह्यातील झरीजामणी अशा एकूण ११ तालुक्यात ४० ते ६० टक्के एवढाच पाऊस झाला आहे.

राज्यातील खरीप पिकाचे सरासरी क्षेत्र १३२.३४ लाख हेक्टर आहे. आतापर्यंत १३६.८८ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

राज्यातील रब्बी पिकाखालील सरासरी क्षेत्र ५८.६० लाख हेक्टर असून आतापर्यंत ३.८९ लाख हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच सरासरी क्षेत्राची तुलना करता ७ टक्के क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. पुणे विभागात ज्वारी आणि करडईची पेरणी प्रगतीपथावर आहे.

राज्यात आतापर्यंत ३१,५३१ द.ल.घ.मी. पाणी साठा
राज्यात आतापर्यंत झालेल्या पावसाने मोठ्या, मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पांमध्ये ८६ टक्के म्हणजेच ३१,५३१ द.ल.घ.मी. पाणी साठा झाला आहे.

कोकणातील प्रकल्पांमध्ये ९३ टक्के, मराठवाडा ७८ टक्के, नागपूर ८८ टक्के, अमरावती ८० टक्के, नाशिक ७९ टक्के आणि पुणे ९० टक्के अशी पाणीसाठ्याची टक्केवारी आहे.

No comments:

Post a Comment