ग्लोबल वार्मिंगचे संकट संपूर्ण जगाला भेडसावत आहे. याचाच परिणाम म्हणून की काय, महाराष्ट्रातही जमिनीची धूप होत आहे. दरवर्षी उन्हाबरोबरच पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे. या सर्वांवर मात करण्यासाठी जमिनीत पाणी साठवून ठेवणे अत्यावश्यक झाले आहे. सिंचनाच्या सुविधा वाढवून शासन यासाठी प्रयत्न तर करीत आहेच त्याचबरोबर वृक्ष संवर्धनाच्या माध्यमातूनही याला हातभार लावला जात आहे. यादृष्टीने बुलढाणा जिल्ह्यात रोपट्यांच्या वाढीसाठी राबविला जाणारा ठिबक सिंचनाचा अभिनव प्रयोग सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
ठिबक सिंचनाचे महत्व ओळखून शेतकरी आता शेतामध्ये या प्रणालीचा सर्रास वापर करू लागले आहेत. बुलढाणा जिल्ह्यात सामाजिक वनीकरण विभागानेही, आता केवळ ‘पाणी वाचवा’ हा संदेश देऊन न थांबता ‘ठिबक’च्या एका अनोख्या उपक्रमातून वृक्षांची तहान भागवण्याला सुरूवात केली आहे.