Monday, May 30, 2011

सुप्त पाण्याच्या झ-याव्दारे ओंढेवाडीस मिळाले पाणी.
सर्वसामान्यांमध्ये एक प्रचलित उक्ती आहे गाव करी ते राव काय करी याप्रमाणे नाशिक जिल्हयातील सिन्नर तालुक्यातील औंढेवाडी या गावातील ग्रामस्थांनी ७० दिवस श्रमदान करुन स्वत: पुरुष , स्त्री मुले राबत राहून गावासाठी पूर्ण पाण्याचा स्त्रोत शोधला आणि आपल्या गावासाठी पाणी पुरवठा करण्याची योजना कार्यान्वीत केली. हे खरोखरच आदर्शवत काम आहे.


सिन्नर तालुक्यातील सिन्नर घोटी महामार्गापासून १२ किलोमीटर अंतरावर असलेले औंढेवाडी हे आदिवासी बहुल वस्तीचे गाव. पाटबंधारे विभाग, मेरी यांच्या सहकार्याने युवामित्र या समाजसेवी संस्थेच्या प्रयत्नाने येथील डोंगरावरील नैसर्गिक ढोल्या झ-याचे पाणी गावात पोहविण्याचे महत्वपूर्ण काम करुन गावास पाणी उपलब्ध करुन देण्यात आले.


औंढेवाडी हे ८०० लोकवस्तीचे गाव असून या प्रयत्नाने गावाची पाणी टंचाई दूर होणार असून ग्रामस्थांना पाण्यासाठी दीड ते दोन किलोमीटर पायपीट करण्याची गरज उरली नाही. औंढेवाडी जवळील डोंगरावर सुप्त पाण्याचा झरा होता. याची माहिती युवामित्र संस्थेचे प्रमुख सुनील पोटे व मनीषा पोटे यांना मिळाली. त्यांनी स्थानिक ग्रामस्थ, पाटबंधारे खात्याचे अभियंता अविनाश लोखंडे व मेरीचे कार्यकारी अभियंता डॉ. संजय बेलसरे यांच्या मदतीने या झ-याचा शोध घेतला. 


हा झरा खुप जुना असून त्यात बारामाही पाणी असते. मात्र या झ-याचा आवाज होऊन पाणी लुप्त होत असते. या पाण्याचा आवाज होत असल्याने त्याला ढोल्या झरा असे नाव पडले. या झ-याचा उपयोग करुन गावाची पाणी टंचाई दूर करता येईल. या विचाराने पोटे यांनी सर्व ग्रामस्थांना प्रेरित केले. पुण्याचे युवा उद्योजक सोमदत्त लाड यांनी या प्रकल्पासाठी एक लाख रुपये दिले तर पुण्यातील एचडीएफसी बँकेतील अधिकारी ज्युडा रॉड्डीज यांनी बँकेतील इतर कर्मचा-यांच्या सहकार्याने ७० हजार रुपये मदत मिळवून दिली. त्या आधारे पाईप, सिमेंट वाळू इत्यादीची जमवाजमव करुन ग्रामस्थांनी परिश्रम घेऊन एक महिन्यातच १२० मीटर उंचीवरुन हे पाणी गावात आणले.


या पाणी योजनेसाठी दररोज २० ग्रामस्थ व शेवटच्या काही दिवसात रोज ७० लहान थोर, स्त्री पुरुष गावकरी राबत होते. यामुळे गावास दररोज दीड लाख लिटर पाणी उपलब्ध होत आहे. गावाच्या गरजेच्या मानाने हे पाणी तिप्पट असून, जादा पाण्याचा वापर शेतीसाठीही करण्यात येणार आहे. 

सामूहिक प्रयत्नातून व ग्रामस्थांच्या प्रबळ इच्छाशक्तीमुळे गावासाठी पाणी योजनेचे मोठे यश उभे राहिले आहे तसेच रस्ते , वीज, आरोग्य विषयक , विविध कामे करुन ओंढेवाडी गाव आदर्श करण्याचा संकल्पही ग्रामस्थानी केला. यासाठी ग्रामस्थांचे कौतुकच करावयास हवे. 

आधुनिक कृषी तंत्रज्ञानाव्दारे भरघोस उत्पन्न.
उसाचे उत्पादन घेणार्‍या शेतकर्‍यांची संख्या काही कमी नाही. मात्र, कमी पाणी, कमी खर्चात जादा उत्पन्न घेणारे शेतकरी अभावानेच सापडतात. फलटण तालुक्यातील शिंदेवाडी येथील तरुण शेतकरी अभयसिंह वसंतराव जाधव यांनी सात एकर क्षेत्रावर कोईमतूर ८६०३२ या जातीचे उसाचे पीक घेतले आहे. हे पीक अवघ्या सात महिन्यांत १५ ते १६ कांडय़ावर आले असून या पिकापासून त्यांना एकरी १०० टनांपेक्षा जास्त उत्पन्नाची अपेक्षा आहे. 


मुळातच आजचा शिकलेला शहरी किंवा ग्रामीण भागातील तरुण शेती व्यवसायाकडे पाठ फिरविताना दिसत आहे. त्याला या व्यवसायात फारसा रस नाही. तो शेतीपेक्षा नोकरीकडे आकर्षित होताना दिसत आहे. मात्र, १९९६-१९९७ मध्ये कृषी पदवीधर झालेले अभयसिंह जाधव नोकरीच्या मागे न लागता फलटण-खुंटे रस्त्यालगत शिंदेवाडी हद्दीत असलेली आपली वडिलोपार्जित २५ एकर शेती पिकविण्यात धन्यता मानू लागले. पदवीच्या शिक्षणानंतर त्यांना सहज एखादी छोटी-मोठी नोकरी मिळाली असती, परंतु त्यापेक्षा त्यांनी शेती व्यवसाय करण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्या निर्णयाबद्दल ते आजअखेर समाधानी असल्याचे आवर्जून सांगतात. आज ते स्वत: लक्ष देऊन २५ एकर शेती पिकवीत आहेत. श्री. जाधव यांनी शेतीमध्ये आधुनिक कृषी तंत्रज्ञानाव्दारे शेतीची मशागत, पेरणी, पीकपध्दतीचा अवलंब करुन आधुनिक शेतीचा नवा आदर्श जोपासला आहे. शेती ते फक्त पिकवीत आहेत, असे नव्हे तर कमी खर्चात आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत भरघोस उत्पन्न घेण्याचा विक्रमही त्यांनी नोंदविला आहे.

श्री. जाधव यांनी आपल्या २५ एकर बागायती क्षेत्रापैकी सात एकर क्षेत्रावर ऊस, सात एकर क्षेत्रावर गहू तर उरलेल्या क्षेत्रावर इतर पिके घेतली आहेत. या शेतीक्षेत्रापैकी सात एकर क्षेत्रावर कोईमतूर ८६०३२ या ऊस जातीची लागवड केली आहे. कोईमतूर जातीचे बियाणे त्यांनी बारामती येथील कृषी प्रतिष्ठान येथून आणून त्याची लागवड केली. टप्प्याटप्प्याने त्यांनी स्वत: बियाणे बनविण्याची माहिती घेऊन घरचे बियाणे तयार केले आहे. आज सात एकर क्षेत्रावर कोईमतूर जातीच्या उसाची लागवड करण्यात ते यशस्वी ठरले आहेत. कोईमतूर जातीच्या बियाणांची लागवड करण्याबरोबरच या पिकाची शास्त्रशुध्द पध्दतीने निगा राखून कमी खर्चात अधिक शेती उत्पादन करण्याचा इतिहास श्री. जाधव यांनी नोंदविला आहे. कृषि अधिकार्‍यांनीही त्यांच्या या प्रयोगशील शेतीचे मुक्तकंठाने कौतुक केले आहे.

कोईमतूर जातीचं पीक खरे तर सात महिन्यांत जेमतेम चार ते पाच कांडय़ांवर येत असते. मात्र, श्री. जाधव यांची ऊस शेती पिकविण्याची हातोटी व आजअखेरचा अनुभव आणि कृषीक्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञान येथे खर्‍या अर्थांने त्यांनी उपयोगात आणले आहे. हे पीक सात महिन्यांत १६ ते १७ कांडय़ांवर आणण्यात त्यांना यश आले असून, कमी कालावधीत या पिकाची एवढी जोमदार वाढ हा किमान फलटण तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील ऊस पिकासंबंधीचा एक विक्रमच म्हणावा लागेल.

श्री. जाधव यांनी आधुनिक शेतीची कास धरली असून शेतीक्षेत्रातील प्रगत ज्ञान, माहिती आणि अनुभवानुसार पीक पध्दती आणि शेती उत्पादनात त्यांनी पुढाकार घेतला आहे. सुरुवातीला ऊस लागवड करावयाच्या क्षेत्रात शेण खत वापरले, बियाणे प्रक्रिया करुन नऊ इंचावर डोळा ठेवून मग ऊस लागवड केली. त्यानंतर विद्यापीठाच्या शिफारशीनुसार संतुलित खतांचा वापर केला गेला. हे सर्व क्षेत्र विहीर व कालवा बागायती आहे, तरी सुध्दा या ऊस शेतीला साधारणपणे वातावरणानुसार १५ दिवसांनी पाणी देण्याची पध्दत अवलंबिण्यात आली आहे. जमिनीची मशागत, पिकांची लागवड आणि त्यांना आवश्यकतेनुसार खतांची आणि किटकनाशकांची मात्रा देण्याच्या शास्त्रशुध्द पध्दतीही जोपासली आहे. पाणी व खतांचा संतुलित वापर करण्यातही त्यांनी नियोजनपूर्वक काम केले आहे, तसेच लागवडीनंतर अवघ्या २० दिवसांनी व नंतर ७५ दिवसांनी त्यांनी तणनाशकाचा वापर करुन तणांवरचा मोठा खर्च कमी केला. यामुळे पिकातला तणांचा अडसर दूर होऊन पीकाची वाढही जोमदार झाली.

विभागीय कृषी अधिकारी रघुनाथ सरतापे, तालुका कृषी अधिकारी नितीन फुलसुंदर, मंडल कृषी अधिकारी पी. एस. बिचुकले, कृषी पर्यवेक्षक अजित जगताप, कृषी सहाय्यक यांचे वेळोवेळी मिळत गेलेल्या मार्गदर्शनामुळे आज ते या पिकाकडून मोठय़ा अपेक्षा बाळगून आहेत. जे पीक लागवडीपासून १२० दिवसांच्या आसपास बांधणीला येते, ते पीक अवघ्या ६५ दिवसांत बांधणीला आणण्यात श्री. जाधव यांना यश आल्याने या क्षेत्रातील तज्ज्ञांनाही अचंबित करुन सोडत आहे. त्यामुळे या पिकाकडून त्यांना एकरी १०० टनांपेक्षा जास्त उत्पन्नाची अपेक्षा आहे. 

ऊसपीक घेण्यापूर्वी श्री. जाधव यांनी आपल्या शेतात काकडी, कलिंगड, भेंडी या सारखी पिके घेऊन त्यामधून चांगले उत्पन्न घेण्यात यश मिळविले आहे. या पिकाबरोबरच त्यांनी आपल्या शेतातील उसापासून लोकांना दर्जेदार आणि आकर्षित करणार्‍या एक किलो गुळाच्या ढेपा तयार केल्या. श्री. जाधव यांनी तयार केलेल्या एक किलोच्या गुळाच्या ढेपांना परदेशातही मोठी मागणी लाभली. ऊस शेतीबरोबरच त्यांनी दूध व्यवसायावरही लक्ष केंद्रीत केले. सध्या त्यांच्याकडे १५ म्हैशी असून आगामी काळातही दुग्धव्यवसाय हा शेतीपूरक उद्योग म्हणून वाढविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. दुग्धव्यवसाय या शेतीपूरक उद्योगापासून आर्थिक लाभाबरोबरच मिळणार्‍या इतर फायद्यांमध्ये शेणखताचा मोठा फायदा आहे. शेणखताचा शेतीतील उत्पन्नवाढीसाठी चांगला फायदा होत आहे. सध्या प्रत्येक वर्षी पाच एकर क्षेत्राला पुरेल एवढे शेणखत त्यांना उपलब्ध होत आहे. आगामी काळात संपूर्ण शेती सेंद्रिय पध्दतीने करण्याचा त्यांचा मानस असून त्यादृष्टीने श्री. जाधव यांनी शेती आणि दुग्धव्यवसायाचे नियोजन चालविले आहे.

Wednesday, May 25, 2011

आदिवासी शेतकर्‍यांची भेंडी व मिरची युरोपीयन बाजारपेठेत .

जिद्द, चिकाटी आणि अपार मेहनतीच्या जोरावर जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही, हे मोखाडय़ातील खोच या आदिवासींच्या गावाने दाखवून दिले आहे. मुंबईतील आरोहन या सामाजिक संस्थेने येथील आदिवासींना एकत्र करून साडेसात एकर जमिनीवर सेंद्रिय खताचा वापर करून भेंडी आणि मिरच्यांची लागवड केली. त्यासाठी त्यांनी आवश्यक ती सर्व काळजी घेऊन मेहनत केल्याने भेंडी आणि मिरचीचे चांगले उत्पादन आले. महत्त्वाचे म्हणजे त्याला इंग्लंडमधून चांगली मागणी असल्याने या शेतकर्‍यांना चांगले उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे गावातील बेरोजगारीचा प्रश्नही संपुष्टात आला आहे. 


ठाणे जिल्ह्यातील मोखाडा हा दुर्गम आदिवासींचा तालुका म्हणून ओळखला जातो. आदिवासींसाठी शासनाच्या अनेक योजना असून त्यांचा फायदा देखील आदिवासी घेतात. या योजनांचा लाभ घेऊन आदिवासींचे जीवनमान उंचावण्याच्या हेतूने आरोहन ही संस्था सातत्याने प्रयत्न करीत असते. 

या संस्थेने खोच गावातील लोकांना एकत्र करून साडेसात एकर जमिनीवर भेंडी आणि मिरच्यांची लागवड केली. त्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर करून युरोपमधील बाजारपेठ त्यासाठी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न केले. विशेष म्हणजे त्यात त्यांना यश आले. येथील भेंडीला इंग्लंडमधून मोठी मागणी असल्याने ती आता निर्यात केली जाते. यामुळे येथील शेतकर्‍यांना चांगला फायदा मिळत असल्याने त्यांचे राहणीमान उंचावण्यास तर मदत झाली आहेच, पण त्यांचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबले आहे. 

ही योजना राबवताना पाण्याची सोय असलेली साडेसात एकर जमीन निवडण्यात आली. ही जमीन ११ शेतकर्‍यांच्या मालकीची होती. त्यामुळे त्यांना एकत्र करून गटशेती तयार केली. या गावातील लोकांबरोबरच शेजारच्या गावांतीलही सुमारे १५० मजुरांना शेतीच्या कामासाठी घेण्यात आले. सेंद्रिय खताचा वापर केल्याने येथील भेंडी आणि मिरचीचा दर्जा उत्तम राहिला. त्यामुळेच या उत्पादनांना युरोपीयन बाजारपेठ मिळण्यात अडचण आली नाही. येथील शेतकर्‍यांना आता हमीभाव देणे आम्हाला शक्य झाले असल्याचे या संस्थेचे राहूल तिवरेकर यांनी सांगितले. 

शेतीची लागवड कशी करायची याची माहिती कृषितज्ञांनी दिल्यामुळे शेतकर्‍यांना आत्मविश्वास आला. येथे भेंडी आणि मिरचीच्या रोपांची लागवड केल्यानंतर ४५ दिवसांनंतर उत्पादन मिळण्यास सुरुवात होते. आम्ही सुमारे साडेतीन टन एवढं रिजंटा १५२ या जातीच्या भेंडीचे उत्पादन घेतले असून त्यातील अडीच टन भेंडी इंग्लंडला निर्यात केली. ही भेंडी शंभर टक्के नैसर्गिक वातावरणात वाढवली असल्यामुळे ती पौष्टिक असून तिची चवही खूपच चांगली आहे. त्यामुळे परदेशातून तिला चांगली मागणी आहे. येथील शेतकर्‍यांना या हंगामात प्रत्येकी ४५ हजार एवढे उत्पन्न मिळाले आहे. 
'महान्यूज'.

Sunday, May 22, 2011

ठिबक सिंचनाद्वारे वृक्ष लावा - वृक्ष जगवा.ठिबक सिंचनाच्या माध्यमातून ग्रामपंचायत क्षेत्रात विविध प्रजातीच्या झाडांना पाणी देऊन त्या द्वारे झाडे वाढविण्याचा उपक्रम अकोला जिल्हयातील धाबा ग्रामपंचायतीने हाती घेतला आहे.वृक्ष लावा -वृक्ष जगवा हे शासनाचे ब्रीदवाक्य खरे केले आहे.

विविध प्रजातीच्या असंख्य झाडांना ठिबंक सिंचनाद्वारे पाणी दिले जात असल्याने ती झाडे हिरवी दिसून येत आहेत. अवघ्या सहाशे लोकसंख्या असलेल्या धाबा ग्रामपंचायतीने गेल्या वर्षभरापूर्वी लोखंडी कठडयाच्या संरक्षणात नारळ,निलगिरी,कडूलिंब,अशोका या वृक्षासह काही शोभिवंत झाडे लावली आहेत. बाग,बगीचे ,नर्सरी व वनराईलाही हेवा वाटावा अशा ऐटीत सदर झाडे ग्रामपंचायत परिसरासह बस स्टॅड ,मुख्य रस्ते,व चौक ा-चौकात हिरवीगार उभी असल्याचे बोलके चित्र पाहावयास मिळते.

नवनवीन उपक्रमा सोबत संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या माध्यमातून भिंतीवर लिहिलेले विविध सुविचार,घराच्या प्रवेशद्वाराजवळ पतीपत्नीचे नाव असलेलेले फलक,चौका-चौकात कचरा कुंडी व भारनियमनाच्यावेळी प्रकाशाकरिता लावण्यात आलेले सौर उर्जा दिवे आदी उपक्रमांसोबत ठिंबक सिंचनाद्वारे झाडांना पाणी देऊन झाडे वाढविण्याचा उपक्रमही ग्रामपंचयतीने हाती घेतला आहे.गावाचे सरपंच निताताई सुनिल धाबेकर यांच्यासह गावातील लोकप्रतीनिधी यांच्या सहकार्याने व देखरेखीमुळे गावातच वनराईचे स्वरुप प्राप्त झाले आहे.

Wednesday, May 18, 2011

मराठवाडा कृषी विद्यापीठास भेट.प्रत्‍येक जिल्‍ह्याचं आपलं स्‍वत:चं एक वैशिष्‍ट्य असतं, एक ओळख असते. परभणी म्‍हटलं म्‍हणजे मराठवाड्यातील सांस्‍कृतिक केंद्र आणि मराठवाडा कृषी विद्यापीठ या जमेच्‍या बाजू. परभणीला गेल्‍या वर्षी जुलैमध्‍ये जिल्‍हा माहिती अधिकारी म्‍हणून रुजू झाल्‍यावर कृषी महोत्‍सवाच्‍या निमित्‍तानं प्रथमच कृषी विद्यापीठात जाण्‍याचा योग आला. त्‍यानंतर अधूनमधून कार्यक्रमानिमित्‍त विद्यापीठात हजेरी लागली. तथापि या विद्यापीठात चालणारं संशोधन, विस्‍तार शिक्षण आणि माहिती देण्‍याचं काम प्रत्‍यक्ष पाहण्‍याची संधी नवनियुक्‍त कुलगुरु डॉ. के.पी.गोरे यांच्‍यामुळंच मिळाली.

पत्रकार नेहमीच निगेटीव्‍ह छापतात, त्‍यांना समाजात पॉझिटीव्‍ह चाललेलं दिसत नाही, अशी ओरड अनेकजण करतात. निगेटीव्‍ह छापून आलं तरी त्‍याचा वस्‍तुनिष्‍ठ खुलासा न करता, चालायचंच अशी मानसिकता अनेक अधिका-यांची दिसून येते. कुलगुरु डॉ. गोरे यांनी मात्र या गोष्‍टीला छेद दिला. विद्यापीठात चालणा-या उपक्रमांची माहिती सर्व पत्रकारांना द्यायची यासाठी त्‍यांनी विद्यापीठ भेटीचं आयोजन केलं. ऐकीव माहितीपेक्षा प्रत्‍यक्ष भेट देऊन, वस्‍तुस्‍थिती जाणून घेण्‍याची त्‍यांनी पत्रकारांना संधी दिली, परभणीच्‍या पत्रकारांनीही या संधीचा पुरेपूर लाभ घेतला.

शनिवार ७ मे रोजी सकाळी साडे नऊ ते दुपारी साडेतीन पर्यंत सुमारे सहा तास पत्रकारांनी विद्यापीठाच्‍या विविध विभागांना भेटी दिल्‍या. त्‍या-त्‍या विभागाचे प्रमुख आपल्‍या विभागामार्फत चालणा-या कामाची देत होते. विशेष म्‍हणजे स्‍वत: कुलगुरु डॉ. गोरे पत्रकारांसमवेत पूर्णवेळ उपस्‍थित होते. नकारात्‍मक छापून येतं म्‍हणून माहितीच द्यायची नाही किंवा लपवून ठेवायची या गोष्‍टींना फाटा देऊन त्‍यांनी एक सकारात्‍मक भूमिका घेतलेली दिसून आली. पत्रकारांनी अडचणीचे प्रश्‍न विचारले तरी कुलगुरुंनी वस्‍तुस्‍थिती लक्षात आणून दिल्‍यामुळं पत्रकारांचं समाधान झालेलं दिसलं. प्रत्‍येक विभागातील भेटीच्‍यावेळी विस्‍तार शिक्षणचे संचालक डॉ. रावसाहेब चोले, जनसंपर्क अधिकारी काळे हे ही पत्रकारांच्‍या शंकांचं निरसन करत होते. 

सकाळी साडेनऊपर्यंत सर्व पत्रकार विद्यापीठाच्‍या मुख्‍य प्रशासकीय इमारतीत पोहोचले. कुलगुरुंसमवेत चहापान झाल्‍यावर त्‍यांनी विद्यापीठ भेटीची रुपरेषा सांगितली. विद्यापीठाचा परिसर सुमारे ३ हजार हेक्‍टर क्षेत्राचा असल्‍यानं वाहनांची व्‍यवस्‍था करण्‍यात आली होती.

सर्वप्रथम कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्रास भेट देण्‍यात आली. केंद्राचे व्‍यवस्‍थापक डॉ. आनंद गोरे यांनी माहिती दिली. ते म्‍हणाले, १ जानेवारी २००० रोजी या केंद्राची स्‍थापना झाली. विद्यापीठात विकसित झालेलं तंत्रज्ञान, बी-बियाणं विक्री, रोपं व कलम विक्री, कृषी औजारं विक्री प्रशिक्षण, माती तपासणी, पशु आरोग्‍य तपासणी, पिकावरील कीड व रोग निदान व सल्‍ला सेवा यासारख्‍या सुविधा इथून दिल्‍या जातात. या शिवाय कृषी माहिती वाहीनी या उपक्रमाखाली दर शुक्रवारी सकाळी ९ ते ११ या वेळेत कृषी विषयतज्ञ ०२४५२-२२९००० या दूरध्‍वनी क्रमांकावर उपलब्‍ध असतात. शेतक-यांनी विचारलेल्‍या कृषी विषयक प्रश्‍नांना दूरध्‍वनीद्वारे उत्‍तरं दिली जातात.

याशिवाय एसएमएस सुविधाही उपलब्‍ध करुन देण्‍यात आली आहे. शेतक-यांना पीकनिहाय खत, पाण्‍याचं नियोजन, किडीचं व्‍यवस्‍थापन अशी उपयुक्‍त माहिती एसेमेसद्वारे पाठविली जाते. जानेवारीपासून आतापर्यंत २९ हजार एसेमेस पाठविण्‍यात आल्‍याचं त्‍यांनी सांगितलं. याच केंद्रात टचस्‍क्रीन (स्‍पर्शपटल) सुविधा उपलब्‍ध असून कृषीविषयक माहिती केवळ एका स्‍पर्शावर उपलब्‍ध होऊ शकते. या केंद्रात दररोज दहा-पंधरा शेतकरी भेट देऊन माहिती घेत असल्‍याचंही त्‍यांनी सांगितलं.

त्‍यानंतर पैदासकार बीजोत्‍पादन प्रक्षेत्रास भेट देण्‍यात आली. प्रवेशद्वाराजवळच गॉड या इंग्रजी शब्‍दाचा अर्थ स्‍पष्‍ट करण्‍यात आला होता. जी म्‍हणजे जनरेशन ऑफ आयडियाज, ओ म्‍हणजे ऑपरेशन ऑफ प्‍लॅनिंग आणि डी म्‍हणजे डेव्‍हलपमेंट ऑफ नेशन. एकंदरीत राष्‍ट्रविकासाचा व्‍यापक दृष्‍टिकोन इथंही पहावयास मिळाला. इथलं बियाणं केंद्र सरकार अन् महाराष्‍ट्र शासनाला पुरविलं जातं, अशी माहिती सहयोगी संचालक (बियाणे) संजय देवकुळे यांनी दिली.

प्रक्षेत्र भेटीनंतर पत्रकारांची वाहनं वळाली पिंगळगड नाल्‍याकडं. गंगाखेड रस्‍त्‍याजवळून येणारा हा नाला विद्यापीठ परिसरातून वाहत जाऊन पुढं पूर्णा नदीला मिळतो. नाव जरी नाला असलं तरी ती एक छोटी नदीच आहे. तथापि अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिल्‍यामुळं यात गाळ साचलेला होता, काटेरी झुडूपं, बाभळी वाढल्‍या होत्‍या. पात्र उथळ झाल्‍यामुळं पावसाळयात हे पाणी प्रक्षेत्रात पसरायचं. त्‍यामुळं सुमारे ६०० हेक्‍टर क्षेत्राचं नुकसान व्‍हायचं.

या नाल्‍याच्‍या विस्‍तारीकरणाचं काम हाती घेण्‍यात आलं. काटेरी झुडूपं, बाभळी तोडण्‍यात आल्‍या. त्‍याचा फायदा म्‍हणजे पाणी साचण्‍याचा प्रश्‍न दूर झाला. परिसरात घेण्‍यात आलेल्‍या ५ विहिरींना चांगलं पाणी लागलं. पाणी साचल्‍यामुळं लागवडीसाठी वापर होऊ न शकणा-या जमिनीचा बीजोत्‍पादनासाठी वापर करता येणार आहे. या नाल्‍याचा पूर्णपणे विकास झाल्‍यानंतर या परिसरात अॉग्रो टुरिझम प्रकल्‍प राबविण्‍याचा मनोदय कुलगुरु डॉ. गोरे यांनी व्‍यक्‍त केला.

रेशीम संशोधन केंद्र, ऊती संवर्धन केंद्र, सिंचन व तंत्रज्ञान उद्यान, अपारंपरिक ऊर्जा उद्यान, फळे व भाजीपाला प्रक्रिया केंद्र, गृह विज्ञान महाविद्यालयाचा अन्‍न व पोषण विभाग, कौटुंबिक साधन व संपत्‍ती विभाग, मानव विकास व कौटुंबिक अभ्‍यास विभाग, वस्‍त्रशास्‍त्र विभाग, बीज प्रक्रिया केंद्र आदी विभागांनाही भेटी देण्‍यात आल्‍या. प्रत्‍येक विभागाचं कार्य म्‍हणजे स्‍वतंत्र लेखाचा विषय होऊ शकतो, एवढी मोठी त्‍याची व्‍याप्‍ती असल्‍याचं लक्षात आलं. रखरखीत ऊन असतांनाही पत्रकारांनी उत्‍साहानं सर्व माहिती जाणून घेतली, हे विशेष.

भेटीनंतर झालेल्‍या पत्रकार परिषदेमध्‍ये कुलगुरु डॉ. गोरे यांनी भविष्‍यकालीन नियोजनाची माहिती दिली. बदलत्‍या हवामानानुसार संशोधन, जैव तंत्रज्ञानाचा पीक वाण निर्मितीसाठी वापर, नैसर्गिक साधनसंपत्‍तीचं व्‍यवस्‍थापन, एकात्मिक पीक व्‍यवस्‍थापन, पाणलोट क्षेत्र व्‍यवस्‍थापन, कृषी यांत्रिकीकरण व काढणीपश्‍चात तंत्रज्ञान व प्रक्रिया असं संशोधन कार्य हाती घेण्‍यात येणार आहे. कृषी शिक्षणामध्‍ये कालानुरुप अभ्‍यासक्रम, कृषी व्‍यवसायपुरक शिक्षण, व्‍यवस्‍थापकीय कौशल्‍य, बौध्‍दीक संपदा अधिकार, मनुष्‍यबळ देवाण-घेवाण, सेवा सल्‍ला व समुपदेशन आदी योजना राबविण्‍यात येणार असल्‍याचं त्‍यांनी सांगितलं.

शेतकरी हा कृषी विद्यापीठाचा केंद्र असून शेती ही केवळ उपजीविकेचं साधन न राहता सर्वांगीण विकासाचं माध्‍यम व्‍हावं, अशी संशोधकांची तळमळ इथल्‍या भेटीवरुन लक्षात आली. शेती आणि शेतकरी यांच्‍या विकासासाठी कार्यरत विद्यापीठातील संशोधनकार्य पाहून समाधान वाटलं.

Sunday, May 8, 2011

फळ संशोधनातील आदर्श - वेंगुर्ले.डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्या सुवर्ण मुकुटामध्ये एक मानाचा तुरा असणार्‍या प्रादेशिक फळ संशोधन केंद्राची स्थापना दक्षिण कोकणातील वेंगुर्ले येथे १९५७ साली झाली. या केंद्राकडून शेतकरी - बागायतदारांसाठी नवनवीन संशोधन केले जात असून, केंद्रावरील संशोधनाचा फायदा शेतकरी बागायतदारांना होत आहे. 

येथे आंबा, काजू, आवळा, कोकम, फणस, करवंद तसेच जायफळ या पिकांवर संशोधन सुरु आहे. केंद्राच्या गौरवशाली इतिहासात आंब्याच्या चार जाती, काजूच्या आठ जाती तसेच फणस, करवंद, जांभुळ आणि जायफळ यांची प्रत्येकी एक जात अशा एकूण सोळा जाती विकसित करुन त्या शेतकर्‍यांपर्यंत पोहचविल्या आहेत. त्याचबरोबर केंद्राच्या स्थापनेपासून आजपर्यंत विविध विषयावरील संशोधनाअंती तज्ज्ञांनी १०२ शिफारशी केल्या आहेत. 

या वेंगुर्ले केंद्रामध्ये केंद्र व राज्य पुरस्कृत अशा मिळून एकूण १० योजना कार्यरत आहेत. या केंद्राला आणि येथील अधिकार्‍यांना प्रतिष्ठेचे असे कृषी भुषण पुरस्कार, काजू रोपवाटिकेकरिता राष्ट्रीय पुरस्कार, गिरीधारीलाल चढ्ढा पुरस्कार, फाय फौऊंडेशन पुरस्कार, जे. एस. पटेल पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. 

या फळसंशोधन केंद्राने केलेल्या संशोधनात्मक, विस्तार आणि विकासात्मक कार्याची दखल घेऊन भारत सरकारतर्फे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे हे एकमेव जैविक केंद्र आहे. देशपातळीवर डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत वेंगुर्ले फळसंशोधन केंद्र हे फळपिकांच्या जातीवंत कलमांची निर्मिती करणारे प्रमुख केंद्र म्हणून मान्यताप्राप्त ठरले आहे. या केंद्राने आतापर्यंत विविध फळ झाडांची सुमारे ३५ लाख रोपे (कलमे) निर्माण करुन त्यांचा शेतकर्‍यांना पुरवठा केला आहे. 

केंद्रातील आंबा संशोधन केंद्रावर आजपर्यंत देशी तसेच परदेशी एकूण २६८ आंबा जातीचा संग्रह करण्यात आला असून सन १९७२ पासून संकरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. सन १९९६ अखेर एकूण १३ हजार ६२२ संकर करुन त्यातील १७९ संकराचा अभ्यास पूर्ण केला आहे. 

सन १९८३ साली रत्ना, सन १९९२ साली सिंधु, सन १९९९ साली कोकण रुची ह्या आंब्यांच्या संकरित जाती विकसित केल्या आहेत. तर सन २००२ मध्ये हापूस ९०० या वाणाची नोंदणी करण्यात आली आहे. या संशोधनाबरोबरच १५ वर्षानंतरच्या संशोधनाअंती सुवर्णा ही आंब्याची नवीन जात प्रसारित करण्यात आली आहे. या जातीची फळे घडाने धरत असून, एका फळाचे सरासरी वजन २८२ ग्रॅम असते. कोकणातील आंबा बागायतदारांना खास निर्यात करण्यासाठी आंब्याची ही जात उपयुक्त ठरली आहे. 

आतापर्यंत या केंद्रावर २९२ हून अधिक काजूवाण गोळा करण्यात आले असून, त्यापैकी ७४ वाण टपोर्‍या बियांचे आहेत. १९९२ मध्ये वेंगुर्ले- ७ तर १९९७ मध्ये वेंगुर्ले- ८ या काजू जाती लागवडीसाठी प्रसारित करण्यात आल्या. काजू कलमाची लागवड केल्यानंतर पहिल्यावर्षी काजू कलमांना हिवाळ्यात १५ दिवसांनी तर उन्हाळ्यात ८ दिवसांनी १५ लिटर पाणी प्रत्येक कलमांना देण्याची आवश्यकता आहे.

वेंगुर्ले फळ संशोधन केंद्रावर फळपिकावरील संशोधन सुरु असून त्याचा फायदा सिंधुदुर्गाबरोबरच महाराष्ट्रालाही होत आहे. अलिकडे माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनेक नवीन बाबींवर संशोधन सुरु असून कमी दिवसात आंबापिकावर संशोधन सुरु आहे. जागतिक हवामानाचा परिणाम पिकांवर होतोय, त्यावर मात करण्यासाठी आणि कोकणातील फळ निर्मिती वाढविण्यासाठी या केंद्राचे प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद असे आहेत हे विशेष होय.

एक हजार हेक्टरवर आधुनिक शेती.लोकसंख्या वाढत आहे आणि उत्पादन क्षेत्र कमी होत आहे. यामुळे उत्पादन वाढविण्यासाठी शासनाने विविध योजनांची अंमलबजावणी करणे सुरु केली आहे. याचाच एक भाग म्हणून आधुनिक शेती तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी कृषी विभागाने चंद्रपूर जिल्हयाच्या राजुरा विभागात एक हजार हेक्टर क्षेत्रावर आधुनिक पध्दतीचा अवलंब करुन जास्त उत्पादन घेण्याचा आदर्श प्रकल्प पुढील हंगामासाठी तयार केला आहे. या प्रयोगाची प्रथमच अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

पावसाची अनियमितता, पिकावरील रोग, प्रदुषण या सर्व बाबींमुळे दिवसेंदिवस शेतीच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. मात्र विपरीत परिस्थितीत शेतक-यांना दिलासा देण्यासाठी व आधुनिक शेतीचे तंत्र जनसामान्यांत पोचविण्यासाठी या प्रकल्पाचा फायदा होईल. या प्रकल्पासाठी एक हजार हेक्टर जमीनवर कापूस, तर एक हजार हेक्टर जमीनवर सोयाबीनकरिता राखीव ठेवण्यात आली आहे.

याअंतर्गत पीक लागवडीपुर्वी माती परीक्षण, मशागतीपासून सुधारित बियांची निवड, पेरा, जैविक खत, पाणी व्यवस्थापन, कीड व्यवस्थापन, जलसंधारण आदी बाबीवर शास्त्रीय मार्गदर्शन करुन पिके घेतली जाईल. येत्या काळात पिकांच्या वाढीच्या नोंदी, त्यावरील कीड व त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आखल्या जातील. कृषी विभागामार्फत शेतीशाळा, पीक प्रात्यक्षिकांवर भर देण्यात येत आहे. शेतीशाळेसाठी निवडक ३० शेतक-यांना प्रतिनिधिक स्वरुपात प्रशिक्षण देण्यात येत आहे. आठवडयातून एक दिवस, याप्रमाणे प्रत्येक विषयावर योग्य मार्गदर्शन दिल्यानंतर आपापल्या गावांत ते मार्गदर्शन करतील.

या योजनेअंतर्गत पिकावरील रोग नियंत्रणासाठी प्रलोभन सापळे लावण्यात येईल. यामुळे किडीचा मोठया प्रमाणावर बंदोबस्त होईल. एकंदरीत उत्पादनवाढीसाठी शास्त्रीय व आधुनिक शेतीचे तंत्रज्ञान सामान्य जनतेपर्यंत पोचण्यासाठी हा प्रकल्प राबविण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. यासाठी प्रायोगिक स्वरुपात राजूरा तालुक्यातील अहेरी, खामोना, मुठरा, पांढरपोवनी, चंदनवाही, रानवेली, सोंडो, सोनुर्ली, सिंदेश्वर, लक्कडकोट, खिर्डी या गावांतील जमिनीची निवड करण्यात आली असून येथे हा प्रकल्प राबविला जात आहे.

मिरची कटाई केंद्रामुळे रोजगार निर्मिती.शहरी भागात मोठय़ा प्रमाणात नवनवे उद्योगधंदे उभारले जात असल्यामुळे रोजगाराच्या संधी शोधत खेडय़ातील लोकांनी शहराकडे चला असा मोर्चा वळविला आहे. मात्र नागपूर जिल्ह्यातील भिवापुरात असा कोणताही मोठा वा लहान उद्योग नसतानाही केवळ मिरची कटाई केंद्राच्या माध्यमातून शेकडो घरी चुली पेटत आहेत.

सध्या भिवापूर शहरात आठ मिरची कटाई केंद्र सुरू असून यात शहरातील जवळपास दोन हजार मजुरांच्या हाती काम मिळाले आहे. पूर्वीपासूनच मिरची कटाई हे येथील मजूर वर्गाचे मुख्य काम असून त्यामुळे या मजुरांना मिरची कटाईची खास कला अवगत झाली आहे. मिरची कटाई केंद्रावर कार्यरत मजूर मिरचीची दांडी (मिरचीची मुखी) कट करतात. मिरची कटाई हे एकमेव भिवापूरकरांचे उदरनिर्वाहाचे माध्यम असल्याने बेरोजगारीच्या सावटात हे केंद्र मजुरांसाठी संजीवनी ठरले आहेत.

ब्लॅक सीड मिरची जी भिवापुरी मिरची या नावाने ओळखली जाते, ती दिसायला लालभडक, खायला तिखट आणि चविष्ट असते. या मिरचीला देश-विदेशात चांगली मागणी आहे. मध्यंतरी या भिवापुरी मिरचीची ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, चीन आदी ठिकाणी निर्यात होत होती. मात्र कालांतराने बारा महिने मेहनत करून येथील शेतकर्‍यांच्या मिरचीला पाहिजे तसा भाव मिळत नसल्याने तालुक्यात मिरचीचे लागवड क्षेत्र कमी झाले. तसेच उत्पादन कमी झाल्याने मिरची कटाई केंद्रांची संख्याही मंदावली. 

पूर्वी शहरात बाहेरील व्यापार्‍यांसह येथील शेतकर्‍यांचे एकूण २० ते २५ केंद्र, सातरे असायचे व यातून शहरातील तीन ते चार हजार मजुरांना हाती काम मिळायचे. मागील काही वर्षांपासून इतर राज्यातील मिरची सुध्दा भिवापुरात कटाईकरिता येते. यात आंध्र प्रदेशातील गुंटूर, खमम व आसाम, नांदुरा, खामगाव या ठिकाणाहून तेजा, लवंगी, ३/३४, आयबर्ड या जातीच्या मिरचीचा समावेश आहे.

भिवापुरात सध्या आठ मिरची कटाई केंद्र सुरू आहेत. यात हिरालाल जनबंधू (भिवापूर), यामीनभाई, रसीदभाई दिल्लीवाले, कारानी चिलीज (नागपूर), सुभानभाई (भिवापूर), मन्नान सेठ नांदुरा, सलीमभाई दिल्लीवाले, या व्यापार्‍यांच्या मिरची कटाई केंद्राचा समावेश आहे. एका केंद्रावर २०० ते २५० मजूर काम करीत असल्याने शहरातील जवळपास दोन हजार मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे. सध्या मिरचीची आवक कमी झाल्याने येथे काम करणार्‍या मजुरांना प्रती पोता कटाई मागे ८० ते १०० रुपये प्राप्त करता येत आहेत.

Friday, May 6, 2011

जत बाजार समितीचे पालटले रुप.सांगली जिल्हा हा एक सकारात्मक कार्य करणारा 'सहकार जिल्हा' म्हणून ओळखला जातो. सहकाराची शंभरी साजरी करत असताना सांगली जिल्ह्यात बर्‍याच संस्था आज आदर्श कार्यप्रणालीमुळे राज्यात आपला ठसा उमटवित आहेत. सांगलीतील जत तालुका एक दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. याच जत तालुक्यातील शेतकर्‍यांनी आपल्या आर्थिक प्रगतीबरोबर सांगली बाजार समितीची प्रगती केली आहे. दोन वर्षापूर्वी केवळ १५ हजार रुपयांपर्यंत उत्पन्न असणार्‍या बाजार समितीचे उत्पन्न आज २५ लाखाच्यावर गेले आहे. सहकारामुळेच ही किमया साधली आहे.

पुण्या-मुंबईमध्ये असणार्‍या इमारतीसारखी भव्य अशी वास्तू या बाजारसमितीला लाभली आहे. अडीच कोटी रुपये या इमारतीच्या निर्मितीस खर्च करण्यात आले आहेत. इमारतीची लांबी सलग अशी पाऊण किलोमीटर एवढी आहे. मोठय़ा शहरातील चाळीप्रमाणे पत्र्याची ५० दुकाने येथे होती. तेथे आज सुसज्ज असे १०४ गाळे निर्माण करण्यात आले आहेत. केवळ ८ हजार २०० रुपये इतके भाडे यापूर्वी मिळायचे. कुठल्याही प्राथमिक सुविधा येथे उपलब्ध नव्हत्या, अशा या बाजार समितीत सर्व अत्याधुनिक सुविधा आज उपलब्ध आहेत.

या बाजार समितीचे रुप पालटले आहे. या दुमजली इमारतीत पहिल्या मजल्यावर ५२ आणि तळमजल्यावर ५२ अशी या गाळ्यांची उभारणी आहे. स्वतंत्र पार्किंग व्यवस्था, पिण्याचे पाणी, विजेची सोय, सुलभ शौचालय आदी सुविधा येथे आहेत. भविष्यात कुठलीही उणिव राहू नये याची दक्षता बाजार समितीने घेतलेली आहे, याचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. ग्रामीण भागातील शेतकरी आपला माल विकण्यास येथे येतो. माल विकेपर्यंत त्याला तेथे थांबावे लागते. या कालावधीत आपल्या प्राथमिक गरजांसाठी अन्यत्र कोठेही जावे लागू नये याची दक्षता येथे घेण्यात आली आहे, अशी माहिती बाजार समितीचे सभापती प्रकाश जमदाडे यांनी सांगितली. 

शेतकरी हा केंद्रबिंदू मानून या बाजार समितीचे कामकाज चालते. जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, मंगळवेढय़ाचा परिसर म्हणजे शाळू (ज्वारी), बाजरी आणि हरभरा यासाठी फारच प्रसिद्ध आहे. येथील धान्याला कर्नाटकात फारच मागणी असते. या सर्व बाबी लक्षात घेऊन शेतकर्‍यांना चांगला भाव मिळावा म्हणून जत येथे धान्य चाळणी प्रकल्पही उभारण्यात येत आहे. यासाठी ५५ लाखांची तरतूद करुन देण्यात आली असल्याची माहिती श्री. जमदाडे यांनी दिली.

सांगलीची हळद सुप्रसिद्ध आहे. शेतकर्‍याच्या हळदीला चांगला भाव मिळावा म्हणून हळद प्रक्रिया प्रकल्पही समितीने हाती घेतला आहे. त्या प्रकल्पात हळद वाळवून त्याची पावडर तयार करणे आणि १०० ते ५०० ग्रॅमपर्यंत पाकिटे तयार करण्याचा या प्रकल्पात समावेश आहे. हा प्रकल्पही कार्यान्वित होत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. शेतकर्‍यांचे हित लक्षात घेऊन बाजार समिती या विविध उपाययोजना राबवित असून त्यास परिसरातील शेतकर्‍यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Sunday, May 1, 2011

राज्याचे दरडोई उत्पन्न चौपट करण्याचा प्रयत्न - मुख्यमंत्री

राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वच क्षेत्रांतील वैचारिक नेतृत्त्वाकडून योगदान आवश्यक आहे. सन २०२० पर्यंत राज्याचे दरडोई उत्पन्न चौपट करण्याच्या दिशेने राज्य शासनाचे प्रयत्न आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

'स्टार माझा' वाहिनीने परळ येथील ग्रँड मराठा हॉटेलमध्ये आयोजित केलेल्या 'माझा महाराष्ट्र २०२०' कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या सत्रात मुख्यमंत्री बोलत होते.

श्री.चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात क्षमता आहे. राज्याने स्वातंत्र्यानंतर देशाला वैचारिक नेतृत्व दिले. राज्यात सहकार चळवळीच्या माध्यमातून विकास झाला. रोजगार हमी योजना, महिला धोरण आणि माहितीच्या अधिकाराचा कायदा ही राज्याने केलेली विशेष कामगिरी आहे. पण याचबरोबर कला, क्रीडा, साहित्य, सांस्कृतिक या क्षेत्रांतही भरीव कामगिरी होण्याची आवश्यकता आहे.

भारत आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, देशाला महासत्ता व्हायचे असेल तर ज्ञानाधारित समाजरचना हवी. त्यासाठी शिक्षणाचा दर्जा उंचवावा लागणार आहे. शिक्षणाचा दर्जा सुधारण्याबरोबरच मनुष्यबळ विकास कसा करता येईल, याचाही विचार करण्याची आवश्यकता भासणार आहे.

शेतीवरचा भार कमी करण्याबरोबरच सेवा आणि उत्पादन क्षेत्राचा वाटा ढोबळ उत्पादनात वाढत असताना त्यासाठी आवश्यक असणार्‍या सर्व पायाभूत सुविधा यांचाही विचार करावा लागणार आहे. शासन त्यादृष्टीने धोरणे आखत आहे, त्याची अंमलबजावणी करीत आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

नागरिकरणाचे भविष्यात मोठे आव्हान असणार आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, नागरिकरणामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. पण यावर उपाययोजना करण्याचे शासन प्रयत्न करीत आहे. तथापि, सर्वच शासनाने करावे, अशी भूमिका उपयोगाची नाही. त्यासाठी समाजाच्या सर्वच क्षेत्रातील वैचारिक नेतृत्त्वाने योगदान देण्याची आवश्यकता आहे.

यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, ज्येष्ठ पत्रकार 'दिव्यमराठी'चे संपादक कुमार केतकर, संशोधक, लेखक डॉ.बाळ फोंडके यांनीही आपले विचार मांडले. 'स्टार माझा'चे संपादक राजीव खांडेकर यांनी प्रास्ताविक आणि निलेश खरे यांनी सूत्रसंचलन केले.

Popular Keywords

“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद