Thursday, March 31, 2011

पुरंदर तालुक्यात साकारताहेत सीताफळ गर उत्पादन प्रकल्प.


विद्यानगरी, उद्योगनगरी म्ह‌णून ओळखले जाणारे पुणे फलोत्पादन क्षेत्रातही अग्रेसर ठरत आहे. जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्र फळबाग लागवडीखाली आले आहे. येथील पुरंदर तालुका सीताफळाचे आगर म्ह‌णून सुपरिचित आहे. दुष्काळग्रस्त म्हणून ओळखल्या जाणार्‍या या तालुक्यात सुमारे १२०० शेतकरी एकत्र येऊन खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाने आणि शासनाच्या कृषि विभागाच्या मदतीने सीताफळ गर उत्पादन प्रकल्प साकारत आहेत. 

पुरंदर तालुक्यात बागायती क्षेत्र व सिंचनक्षेत्रही कमी आहे. फळ पिकाचे क्षेत्र ७ हजार ३५० हेक्टर असून यात प्रामुख्याने सीताफळ, अंजीर, चिक्कू व डाळींब ही प्रमुख फळपिके होतात. या भागात वाटाणा व टोमॅटो देखील मोठय़ा प्रमाणावर घेतले जाते. पुरंदर तालुक्यात केवळ सीताफळाखालील क्षेत्र २ हजार ५० हेक्टर आहे. बाजारात सीताफळाला मोठय़ा प्रमा‌‌णावर मागणी असूनही हे फळ लवकर खराब होत असल्यामुळे शेतकर्‍यांना हे फळ कमी दराने विकावे लागते. त्यामुळे त्यांना फायदाही कमी होतो. सीताफळाचा गर काढून त्यावर प्रक्रिया केल्यास वर्षभर टिकत असल्याने सीताफळाची थेट विक्री करण्यापेक्षा योग्यवेळी योग्य भावाने हा गर विकता येईल, या उद्देशातून येथे सीताफळ गर उत्पादन प्रकल्प साकारत आहे. 

या तालुक्यातील विविध गावांतील सुमारे १२०० शेतकर्‍यांनी एकत्र येऊन २४ प्रकल्पांची उभार‌णी केली आहे. एका प्रकल्पामध्ये ३० ते ४० शेतकरी सहभागी झाले आहेत. त्यासाठी २५लाख रु‎पये खर्च अपेक्षित असून राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत ४० टक्के म्ह‌णजेच ९ लाख ६० हजारांचे अनुदान दे‌ण्यात येणार आहे. या प्रकल्पातील २० प्रकल्प सहकारी तत्त्वावर तर ४ प्रकल्प खाजगी तत्वावरील आहेत. प्रत्येक प्रकल्पातून किमान ३० महिलांना रोजगार उपलब्ध होणार असून २४ प्रकल्पाद्वारे सुमारे ७५० महिलांना रोजगार उपलब्ध होईल. 

या प्रकल्पासंदर्भात कृषि उपसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनिल बोरकर यांनी सांगितले की, डोंगराळ भाग असणार्‍या पुरंदर तालुक्याच्या विकासासाठी शेतकर्‍यांची प्रगती होणे गरजेचे आहे हे ध्यानात घेऊन खासदर सुप्रिया सुळे यांच्या प्रेरणेतून व तालुक्यातील शेतकर्‍यांच्या सहकार्यातून प्रकल्प उभारण्याचे ठरले व त्यादृष्टीने कामही सुरु झाले आहे. एक प्रकल्प १५०० चौ. फूट जागेत उभारण्यात ये‌णार असून यात तयार झालेला माल मोठे उत्पादक, विक्रेत्यांना विक्री करता येईल. तसेच प्रकल्प सुरु‎ झाल्यानंतर गावांचा एकत्रित संघ स्थापन करुन कॉमन ब्रॅ‌ण्ड व मार्केटिंग करण्याचाही विचार आहे‌. या प्रकल्पामध्ये साधारणपणे ५० टन सीताफळ पल्प, २० ते २५ टन टोमॅटो प्युरी, ५ ते १० टन पर्यंत इतर फळांचा पल्प व ३ ते ५ टनापर्यंत लोणच्यासाठी कैरीच्या फोडी करण्याचे काम होणार असल्याने वर्षभर या महिलांना रोजगार उपलब्ध होईल. याबरोबरच भाजीपाला पॉकिंग करण्यासारखे उद्योगही येथे केले जातील. सर्वसाधार‌‌णपणे जुलैमध्ये या प्रकल्पातून उत्पादन सुरु‎ होण्यासाठी प्रयत्न सुरु‎ असून त्यासाठी सर्व तयारी सुरु‎ आहे. 

भौगोलिकदृष्टय़ा दुष्काळी भागात मोडत असलेल्या पुरंदर तालुक्यात सीताफळ गर उत्पादन प्रकल्प उभारल्यास या भागातील शेतकर्‍यांना निश्चितच फायदा होऊन शेतकर्‍यांबरोबरच बचतगटातील महिलांनाही गावातच रोजगार निर्मिती होईल आणि तालुक्याचा आर्थिक विकासही घडेल हे निश्चित.! 


Tuesday, March 29, 2011

कृषी क्षेत्रात महिलांचा अधिक कार्यक्षम सहभाग योजना.


राष्ट्रीय कृषि धोरणात महिलांचा कृषि क्षेत्रामध्ये असलेला सहभाग अत्यंत महत्वूपर्ण घटक मानला आहे तसेच अल्प व अत्यल्प भूधारक शेतक-यांना आर्थिक दृष्टया सक्षम करण्यासाठी महिला शेतक-यांना 
तंत्रज्ञान आत्मसात करण्यास सहाय्य करणे असा उद्देश कृषि क्षेत्रातील त्यांचा सहभागाविषयी आहे.
सन २००३-०४ मध्ये राज्यात कृषि क्षेत्रात महिलांचा अधिक कार्यक्षम सहभाग योजनेविषयी अंमलबजावणी करण्यास प्रारंभ झाला त्यामुळे राज्याच्या प्रत्येक जिल्हयातील एका तालुक्यामध्ये २० शेतकरी महिलांचा एक गट याप्रमाणे प्रत्येकी २५ गट स्थापन करण्यास सुरुवात झाली व सन २००९-१० पर्यंत १४३ तालुक्यामध्ये ही योजना राबविण्याचे नियोजन करण्यात आले होते त्याप्रमाणे राज्यात ५ हजार ५७५ गटांकडून योजनेची अंमलबजावणी होऊन १ लाख ११ हजार पेक्षा अधिक शेतकरी महिलांचा प्रत्यक्ष सहभाग राहणार आहे.
ही योजना जिल्हास्तरावर राज्याच्या कृषि विभागाकडून जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचे पर्यवेक्षणाखाली राबविण्यात येत आहे. 
याप्रमाणे सन २००९-१० मध्ये १४३ तालुक्यात सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून कृषि अधीक्षक कृषि अधिकारी यांच्या पर्यवेक्षणाखाली तालुकास्तरावर एक समितीचे गठन केले जात आहे याच समित्या संस्थेची निवड करणार आहेत.
संस्था निवडीचे निकष : 

• संस्था नोंदणीकृत असावी 
• मागील तीन वर्षाचे संस्थेचे लेखा परीक्षण अहवाल असावेत 
• ग्रामीण भागात प्रशिक्षण देण्यासाठी संस्थेकडे आवश्यक तेवढे मनुष्यबळा व्यतिरिक्त संगणक प्रशिक्षण हॉल, चांगले प्रशिक्षक, प्रशिक्षण साहित्य आदी सोयी सुविधा असाव्यात 
• जर संस्थेच्या कामकाजाबाबत लेखी तक्रार प्राप्त झाल्यास अशा संस्थेची पुन्हा निवड करताना योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे 
• अशा संस्थेची पुर्ननिवड करताना तिला ब्लॅक लिस्ट करणे जरुरीचे असल्यास त्यासंबधी तात्काळ 
कार्यवाही करावी तसेच उत्तम कार्य करणा-या संस्थेचीच निवड करावी 
• यापूर्वी संस्थेने स्वयंसहाय्यता गटाची निर्मिती केलेली असावी. 
• संस्थेची निवड झाल्यानंतर त्या संस्थेकडून योजना राबविण्यासंबंधी प्रकल्प अहवाल तयार करुन त्यास आत्मा योजनेच्या तालुका/जिल्हा स्तरावरील अस्तित्वात असलेल्या समितीची मान्यता घ्यावी.

महिला प्रवर्तिकेचे कार्य :

• सन २०११-१२ मध्ये ही योजना राबविण्यासाठी मुख्य महिला प्रवर्तिकेची निवड ज्या तालुक्यात योजना राबवायची आहे. 
• त्या प्रत्येक तालुक्यातील महिला प्रवर्तिकेने शेतकरी महिलांचे गटसंघटन, विस्तार कार्यक्रमांची अंमलबजावणी,बचतीची सवय व स्वयं सहाय्यतेकडे वाटचाल करणे आदी कार्ये करावयाची आहेत.

योजनेतील घटकनिहाय कार्यक्रम :

• सन २००९-१० या वर्षात १४३ तालुकयातील २५ महिला गटांना ३ हजार ५७५ रु.प्रती गट याप्रमाणे स्वयंरोजगारासाठी निधी देण्यात आला असून त्याप्रमाणेच यावर्षी ही देण्यात येईल. 
• तसेच प्रत्येक महिला बचत गटांनी कार्यवृत्त पुस्तिका, बचत व रजिस्टर, साप्ताहिक / मासिक रजिस्टर, नोंद वह्या योग्य प्रकारे ठेवणे आवश्यक आहे.
• या योजनेंतर्गत प्रत्येक गटास बाजार सर्वेक्षण करण्यासाठी आठशे रुपये अर्थसहाय्य उपलब्ध करण्यात आले आहे.
• बाजार सर्वेक्षण करताना बचत गटाच्या उत्पादनांना उत्तम भाव कोठे मिळतो व कोणते उत्पादन घ्यावे त्याची गुणवत्ता कशी असावी. मालाला ब्रँड नेम काय द्यावे तसेच पॅकेजींग व लेबलिंग कसे करावे आदी सर्व बाबींच्या विचार अशा सर्वेक्षणातून करावा.
• त्याप्रमाणेच गटांनी उत्पादित केलेल्या मालाची विक्रीसाठी वजनकाटा, पॉकिंग साहित्य, जाहिरात, हँगर आदी सामृग्री खरेदी करावी. 
• अशाप्रकारे राष्ट्रीय कृषि धोरणांमध्ये कृषि क्षेत्रात महिलांचा अधिक कार्यक्षमपणे सहभागाची आवश्यकता व्यक्त करुन अंमलबजावणीसाठी प्रत्येक राज्यांनी सुरुवात केली आहे. 
• याप्रमाणेच महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाने कृषिक्षेत्रात महिलांच्या सहभागासाठी शेतकरी महिला बचत गटाच्या स्थापनेस प्रोत्साहन दिले आहे.

• सन २००९-१० पर्यंत १४३ तालुक्यात ही योजना कार्यक्षमपणे राबविली जात असून कृषि विभागाच्या विविध योजनेतून अनुदानांचे वितरण करतांना अशा शेतकरी महिला बचत गटांना प्राधान्य दिले जात आहे. 

• तरी या योजनेचा अधिकाधिक लाभ घेण्यासाठी राज्यातील शेतकरी महिला वर्गाने पुढाकार घेऊन कृषि क्षेत्रातील त्यांचा सहभाग वाढवावा. महिला अणि कृषि क्षेत्र 

Friday, March 25, 2011

महाकृषी संचार सेवा शेतकर्‍यांना उपयुक्त ठरेल - मुख्यमंत्री
महाकृषि संचार सेवा शेतकर्‍यांना अतिशय उपयुक्त ठरेल. शेतकर्‍यांना या उपक्रमाचा शेतीच्या विकासासाठी करून घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. 

राज्य शासनाचा कृषी व पणन विभाग आणि भारत संचार निगम लिमीटेड यांच्या महाकृषी संचार सेवेचा गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे हा कार्यक्रम झाला.


मुख्यमंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, मोबाईलच्या तंत्रज्ञानामुळे अनेक बदल झाले आहेत. बँकिंगच्या क्षेत्रात मोबाईलमुळे बदल झाले आहेत. असेच बदल आता इतर क्षेत्रातही होतील. त्याची आज या महाकृषी संचार योजनेपासून सुरवात झाली आहे. या सेवेमुळे शेतकर्‍यांच्या जीवनात निश्चितच बदल होतील. मोबाईलच्या माध्यमातून शेतकर्‍यांचे एक महाकुटुंब निर्माण झाले आहे. शेतकर्‍यांच्या जीवनातील ही अतिशय महत्वाची बाब आहे.

कृषिमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, या सेवेमुळे विद्यापीठात सुरू असणारे संशोधन, शासनाचे विविध कार्यक्रम, योजना, बी-बियाणे यांची माहिती शेतकर्‍यांना मिळेल. आतापर्यंत पाच लाख शेतकरी या सेवेचे सदस्य झाले आहेत. आणखी अडीच लाख शेतकरी या सेवेत सहभागी होऊ इच्छितात. 

ग्राम विकास मंत्री जयंत पाटील, जलसंधारण मंत्री डॉ. नितीन राऊत, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय मंत्री मधुकरराव चव्हाण, कृषी राज्यमंत्री गुलाबराव देवकर, फलोत्पादन राज्यमंत्री राजेंद्र गावित, कृषी विभागाचे प्रधान सचिव डॉ. सुधीरकुमार गोयल आदी उपस्थित होते. कृषी आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी आभार मानले.

महाकृषी संचार सेवेबाबत 

कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि शेतकर्‍यांना मोबाईल सीयूजी सेवा उपलब्ध करून देणार. यामुळे शेतकर्‍यांना कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्याशी कमी खर्चात संपर्कात राहणे सोयीचे होणार आहे. उपक्रमात सहभागी होणार्‍या शेतकर्‍यांना हवामानविषयक सल्ला, खते, बी-बियाणे यांची उपलब्धता, गुणवत्ता, कृषी विभागाच्या योजना इत्यादींच्या माहितीसाठी तत्काळ देणे सोयीचे होणार आहे. तसेच शेतकर्‍यांना एसएमएसव्दारे शेतीबाबत विनामुल्य सल्ला दिला जाणार आहे.

धान्य सडत असल्याची सरकारची कबुली.


धान्याचे विक्रमी उत्पादन होत असून गोदामांमधील साठवणुकीची क्षमता कमी पडत असल्यामुळे गोदामांमध्ये धान्य सडत असल्याची कबुली अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी राज्यसभेत दिली. गव्हाचे विक्रमी उत्पादन होत असून देश 'ग्रेन बॉम्ब'वर बसला आहे. धान्य साठवण्याची क्षमता वाढविण्याची आवश्यकता आहे, असे मुखर्जी म्हणाले. धान्य सडत असल्याची कबुली मी देतो. साठवणुकीची क्षमता वाढविण्यालाही मी सहमत आहे. शेतकऱ्यांच्या धान्याला योग्य भाव दिला जात असल्यामुळे अलीकडे धान्याचे उत्पादन वाढत आहे. गरजेनुसार अतिरिक्त क्षमता वाढवायला हवी, असे ते अर्थ विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना म्हणाले.
गोदामांमध्ये धान्य सडत असून आदिवासींना निकृष्ट धान्य पुरविले जात असल्याबद्दल माकपच्या वृंदा करात यांनी तीव्र चिता व्यक्त केली होती. शून्य तासाला मुद्दा उपस्थित करताना त्या म्हणाल्या की, सरकार अतिरिक्त धान्य गरिबांना पुरविण्याच्या मागणीकडे लक्ष देत नाही. 
धान्य सडू दिले जात आहे. त्यांनी सभागृहात सडलेले गहू आणि तांदूळ दाखविले. हे धान्य आदिवासी भागात पाठविले जात असून ते खाण्यायोग्य नाही. चांगल्या धान्याचा पुरवठा करावा. धान्याच्या दर्जावर नियंत्रण ठेवण्यासाठी निगराणी समिती स्थापन करावी अशी मागणीही त्यांनी केली. उपसभापती के. रहमान खान म्हणाले की, करात यांच्या भावनांशी संपूर्ण सभागृह सहमत आहे. सरकारने सदस्यांच्या भावनांची दखल घ्यावी. नामनियुक्त सदस्य ए.के. गांगुली म्हणाले की, धान्य उत्पादनाचा स्फोट होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. 
चांगल्या पावसामुळे यावर्षी ८.२ कोटी टन धान्याचे उत्पादन झाले. मात्र साठवणूक करण्याची क्षमता कमी आहे. देशाने आणखी दीड लाख टन धान्य वाढविण्याची क्षमता मिळविण्याची गरज आहे. काँग्रेसचे सदस्य माबेल रिबेलो यांनीधान्य उत्पादनवाढीमुळे येऊ घातलेल्या 'संकटा'बाबत सरकारने श्वेतपत्र जारी करावे अशी मागणी केली. 
आभार लोकमत.

परभणीतील कापूस प्रथमच परदेशात.परभणी जिल्ह्यातील बहुतांश भाग सपाट व नद्यांच्या खोर्‍यातील असून सुपीक आहे. या जिल्ह्यातून गोदावरी, पूर्णा व दुधना या प्रमुख नद्या वाहतात. खरीप हंगामात ज्वारी, मुग, उडीद, तूर, भुईमूग या पिकांसह कापसाचेही उत्पादन घेतले जाते. 

जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील बराच भाग जंगलाचा आहे. तथापि गेल्या काही वर्षांपासून तालुक्यात कापसाचे विक्रमी उत्पादन होत आहे. जिंतूर व बोरी बाजारपेठेत सुमारे दीड लाख क्विंटल कापसाची खरेदी झाली. खरेदीबरोबरच कापसाच्या गाठींची निर्मितीदेखील मोठय़ा प्रमाणात होत आहे. 

आत्तापर्यंत तालुक्यातील दहा जिनिंग व प्रेसिंगमधून प्रक्रिया झालेल्या कापसाच्या गाठी मुंबईसह मध्यप्रदेश, गुजरात या प्रांतात निर्यात होत होत्या. यावेळी त्या प्रथमच थेट देशाबाहेर निर्यात झाल्या आहेत. कापसाचे विक्रमी उत्पादन व गाठींची मोठय़ा प्रमाणातील निर्मिती या पार्श्वभूमीवर उद्योजक बी. आर. तोष्णीवाल यांनी पाच हजार गाठींच्या निर्यातीसाठी गेल्या वर्षापासून प्रयत्न सुरु केले होते. 

केंद्र सरकारच्या कॉटन एक्स्पोर्ट रजिस्ट्रेशन समितीने त्यांना जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात ५०० गाठी निर्यातीची परवानगी दिली. त्यापैकी अयोध्या जिनिंग व प्रेसिंगमधून ३०० गाठी मुंबई बंदरमार्गे हाँगकाँग येथे मे. हाँगकाँग ट्रेड सर्व्हिस कंपनीकडे रवाना झाल्या. जागतिक बाजारपेठेतील सध्याच्या भावानुसार (अमेरिकन डॉलरप्रमाणे) दळणवळणाचा खर्च वगळता कापसाच्या एका खंडीस (तीन क्विंटल ५६ किलो) ५५ हजार रुपये मिळू शकतात.

परभणी जिल्ह्यातून परदेशात कापसाच्या गाठी प्रथमच निर्यात झाल्याने भविष्यात कृषी प्रक्रिया उद्योगाला मोठा वाव मिळण्याची आशा आहे.

Tuesday, March 22, 2011

विदर्भात रुजतेय बटाटय़ाची शेती.


शेतीतील खर्च आणि उत्पन्न याचा ताळमेळ बसत नाही, म्हणून शेती फायद्याची नाही, असे म्हणून शेती करायचीच नाही असा नकारात्मकतेचा सूर सतत कानी पडत असतो. मात्र त्याच शेतीतून शेतकरी लखपती होऊ शकतो याचा आदर्श शेतकर्‍यांच्या आत्महत्येमुळे चर्चेत आलेल्या विदर्भातील शेतकर्‍यांसमोर ठेवला आहे.

पारंपरिक शेतीला विश्वनाथ गवई यांनी बटाटा, लसूण, अद्रक आणि हरितगृहात ढोबळ्या मिरचीचे भरघोस उत्पादन घेत कधीकाळी हजाराच्या घरात उत्पन्न देणार्‍या शेतीतून लाखोची कमाई केली आहे. अशा या कल्पक आणि हायटेक शेतकर्‍याची यशोगाथा विदर्भातील इतर शेतकर्‍यांना नवी प्रेरणा देणारी आहे. 

अकोला शहरापासून १८ कि. मी. अंतरावर असलेल्या कापशी तलाव या गावामध्ये विश्वनाथ वासुदेव गवई हे आपल्या आई व भावाच्या मदतीने शेती करतात. तीन भावांचे एकत्र कुटुंब असून एकनाथ गवई शासकीय सेवेत आहेत. विश्वनाथ यांचे शिक्षण १२ वी पर्यंत, तर दुसरा भाऊ प्रकाशचे शिक्षण बी.ए. पर्यंत
झाले आहे. गवई कुटुंबाकडे २२ एकर शेती आहे. सुरुवातीला आई वडिलांनी शेतमजुरी करुन १२ एकर शेती विकत घेतली व मुलांचे शिक्षण पूर्ण केले. तीन भावांच्या एकत्रित कुटुंबाने शेतीच्या भरवशावर पुन्हा १० एकर शेती विकत घेतली. पूर्वी एका विहिरीवर बागाईत शेती करुन २ एकरांमध्ये भाजीपाला लागवड केली जात असे. वडील वासुदेव गवई हे स्वत: शेजारील गावामध्ये आठवडी बाजारात भाजीपाला विक्री करायचे.
वडिलांच्या निधनानंतर शेतीची संपूर्ण जबाबदारी विश्वनाथ यांच्या खांद्यावर आली. विश्वनाथ गवई यांनी कृषी विभागाच्या रोजगार हमी योजनेतून ८ एकर आवळा लागवड केली असून, आवळ्याची बाग आता ६ वर्षांची झाली असून उत्पादन चालू झाले आहे. आवळा पिकामध्ये आंतरपीक म्हणून सीताफळाच्या ५०० झाडांची लागवड करण्यात आली असून २०१० पासून उत्पादन येण्यास सुरुवात झाली आहे. आवळ्यापासून आवळा लाडू, कॅन्डी, ज्युस असा प्रक्रिया उद्योग उभा करण्याचा गवई यांचा प्रयत्न आहे.
आपली शेती अधिक उत्पादनक्षम होण्यासाठी पाण्याची, सिंचनाची सोय होणे फार गरजेचे आहे. त्याशिवाय आपली प्रगती होणार नाही हे हेरुन विश्वनाथ यांनी वेगवेगळ्या ठिकाणी दरवर्षी १ याप्रमाणे ३ बोअरवेल खोदल्या. ठिबक सिंचनाच्या मदतीने संपूर्ण २२ एकर क्षेत्र ओलिताखाली आणले आहे. उन्हाळ्यामध्ये सिंचनाची सोय व्हावी यासाठी त्यांनी राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातून सामूहिक शेततळे घेतले आहे. त्यामुळे बोअरवेलचे पाणी शेततळ्यात साठवून ते पाणी ठिबक सिंचनाद्वारे फळशेती, कपाशी व भाजीपाला पिकांना देण्यात येत आहे. कृषि अधिकारी अजय पराते यांचे आपल्याला मार्गदर्शन मिळते, असे विश्वनाथ गवई सांगतात.
गवई यांनी तीन एकर क्षेत्रावर तैवान पपईच्या शेतीतून चांगले उत्पादन घेतले. उत्पादन खर्च कमीत कमी येण्यासाठी गांडुळखत, कंपोस्टखत, हिरवळीच्या खतांचा वापर केला. फवारणीसाठी त्यांनी गोमूत्र, दूध, बाजरीपावडर इत्यादीचा वापर करुन कीटकनाशके व बुरशीनाशकांचा खर्च कमी करण्यात यश मिळवले आहे. एकरी १ लाखापर्यंत उत्पन्न त्यांनी घेतले आहे. २० गुंठे क्षेत्रावर शेडनेट हाऊसची उभारणी केली असून त्यामध्ये ते ढोबळी मिरची हे प्रमुख पीक घेतात. ढोबळी मिरचीशिवाय काकडी, कोथिंबीर यासारखी हंगामी पीके त्यांनी यशस्वीपणे घेतली आहेत. दोन वर्षांपासून कारले या पिकाची एक एकर शेतीवर लागवड केली आहे. गांडुळखत, कंपोस्ट खत यासोबत निंबोळी अर्क अशा सेंद्रिय पध्दतीने उत्पादन खर्च कमी करुन एकरी ३५ ते ४० टन कारल्याचे उत्पादन घेतले जात आहे.
विदर्भातील शेतीत अशक्य वाटणार्‍या बटाटा पिकाची लागवड करुन त्यांनी ६० क्विंटल बटाटय़ाचे उत्पादन मिळवले आहे. एकरी ८० ते ९० क्विंटल उत्पादन त्यांनी यापूर्वी घेतले आहे. अवकाळी पाऊस व खराब वातावरणामुळे बटाटा पिकाचे उत्पादन कमी मिळाले आहे. सरासरी तीन महिन्याचे पिक असल्यामुळे बटाटा पिकाची लागवड रब्बी हंगामातही घेता येते. बटाटा पिकासोबत अद्रक, लसूण या पिकांचाही त्यांनी यशस्वी प्रयोग केला आहे.
शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसायही ते करतात. सामूहिक शेततळ्यात मत्स्यउत्पादन करीत त्यांनी मागील वर्षी २० हजार रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. यावर्षी मत्स्यविक्रीतून ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कमी खर्चात जास्त नफा या महामंत्राचा उपयोग करुन इतर शेतकर्‍यांना विश्वनाथ गवई मार्गदर्शन करीत असतात. शेती फायद्याची नाही म्हणून शेतीकडे दुर्लक्ष करणार्‍या शेतकर्‍यांना गवई यांची प्रयोगशील शेती नवी दिशा देणारी ठरत आहे.शेतीशाळेने वाढवली शेतकर्‍यांची सांघिक भावना.

जुन्या वैदिक ग्रथांमध्ये शेतीला उत्तम व्यवसाय म्हटले गेले आहे. परंतु हल्ली हा व्यवसाय अवकाळी पाउस,निसर्गाचा लहरीपणा यामुळे विस्कळीत होताना दिसत आहे. उत्पादन कमी आल्यामुळे बळीराजा देखील हाताश निराश होत आहे.अशा परिस्थितीत या बळीराजाला शासनही विविध योजनांच्या माध्यमातून बळ देत असते. नवनवीन प्रयोग,आधुनिक तत्रंज्ञानाचा उपयोग शेतीत करुन उत्पादन कसे वाढवावे याचे मार्गदर्शन शेतकर्‍यांना व्हावे म्हणून शासनाने शेतीशाळेसारखा प्रयोग आंमलात आणला आहे व हा प्रयोग यशस्वी झाल्याचे उत्तम उदाहरण सिन्नर तालुक्यात दिसत आहे. 


राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत सिन्नर तालुक्यातील मौजे खोपडी गावात गहू पिकाची शेतीशाळा २००९-१० मध्ये राबविण्यात आली. शेतीशाळेच्या माध्यमातून खोपडी येथील ३० शेतकर्‍यांची निवड करण्यात आली. रब्बी हंगामात एकूण्र २० आठवडे गहू या पिकावर मार्गदर्शन करण्यात आले. त्यामध्ये एकात्मिक पीक व्यवस्थापन शेतकरी अवलंब करीत असलेल्या शेतावर निरीक्षण घेण्यात आली. त्यामुळे प्रत्येक आठवडयातील शेत पिक परिस्थितीनुसार कीड रोग,तण, पाणी व्यवस्थापन, अन्न द्रव्ये व्यवस्थापन याविषयीच्या नोंदी करण्यात येत असत. निरीक्षणे घेतल्यानंतर निवड केलेल्या चारही गटांतर्गत चित्रीकरणे म्हणजे शेतात घेतलेल्या निरीक्षणांचे ड्राईंग शीट व त्याचे रेखाटन केले जात असे. निरीक्षणाव्दारे तयार केलेल्या चित्रीकरणाचे शेतकर्‍यांमधूनच सादरीकरण केले जात असे.

नाशिक जिल्यातील सिन्नर एक अंशत: आदिवासी तालुका असुन तालुक्यातील शेतकर्‍यांचे खरीप हंगामात भात,मका,सोयाबीन व नागली तर रब्बी हंगामात गहू,हरभरा ही मुख्य पिके आहेत. गहू व हरभरा पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी कृषि विभाग प्रयत्नशील आहे. शेतीशाळा हे कृषि विस्ताराचे प्रभावी माध्यम असल्याने तालुक्यात विविध योजने अंतर्गत ७ शेतीशाळेचे या रब्बी हंगामात आयोजन केलेले जाते . गहू पिकासाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत खोपडी या ठिकाणी आत्मा संस्थेअंतर्गत या शेतीशाळा घेण्यात आली आहे. या व्यतिरिक्त खरीप हंगामात गळित धान्य विकास कार्यक्रमांतर्गत सोयाबीन पिकासाठी नायगांव येथे शेतीशाळा घेण्यात येत आहेत. शेतीशाळेसाठी वरील सर्व ठिकाणी शेतकरी विशेषत: महिला शेतक र्‍यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. 

शेतीशाळेसाठी गावनिहाय वार निश्चित करुन देण्यात आला आहे व प्रत्येक शेतीशाळेस एक समन्वयक व एक मार्गदर्शक यांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्येक आठवडयाच्या ठरलेल्या दिवशी नेमणूक केलेले कर्मचारी शेतीशाळेत हजर राहून मार्गदर्शन करतात. प्रत्येक आठवडयाचा पिकनिहाय अभ्यासक्रम ठरवून देण्यात आलेला असून त्या आठवडयातील ऍग्रोवन अंकाचे वाचन करण्यात येते. स्थानिक गरजेनुसार प्रात्यक्षिक करुन दाखविण्यात येते. उदा. पिकात पक्षांसाठी लाकडी मचाण तयार करणे, निंबोळी अर्काची फवारणी करणे, गिरीपुष्पाची बांधावर लागवड, भात नियंत्रित अंतरावर लागवडीसाठी दोरी तयार करणे व लागवड करणे,बीजप्रक्रिया इ.प्रात्यक्षिकांचे आजपर्यंत आयोजन करण्यात आलेले आहे.

शेतीशाळेतील ३० शेतकर्‍यांचे ४-५ गट तयार करण्यात येतात. कृषि तंत्रज्ञानाव्यतिरिक्त स्थानिक गरजा लक्षात घेवून विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात येते. शेतकर्‍यांमध्ये सांघिक भावना वाढविण्यासाठी शेतीशाळेत सांघिक खेळाचे आयोजन करण्यात येते. 

या उपक्रमात तालुक्यातील आ.पी.बिन्नर, व्ही.पी.मेहरे या कृषि सहाय्यकांनी शेतीशाळा आयोजित केल्या आहेत. विविध योजनेतंर्गत शेतीशाळांचे उत्तमरित्या आयोजन करुन कृषि विभाग शेतकर्‍यांमध्ये एक प्रकारची जागृती निर्माण करणे व उभारी देण्याचे काम करीत आहे करण्याचे काम करत आहेत.

'महान्यूज.'

Friday, March 11, 2011

कल्पक शेतकर्‍याने भंगारातून केली ट्रक्टर निर्मिती.

आपल्या शेतीप्रधान देशात आधुनिक तंत्रज्ञानाचा, अवजारांचा तसेच ट्रक्टर-ट्रॉली यांचा वापर अपरिहार्य बनला आहे. मनुष्यबळाची म्हणा किंवा शेत मजुरांची कमतरता भासू लागल्याने यांत्रिकी मदत घ्यावीच लागते. पण अल्प भूधारक शेतकर्‍यांना हे जमतेच असे नाही. पण इच्छा शक्ती असेल तर कल्पक शेतकरी देखील काय करु शकतो हे आपल्याला कागल तालुक्यातील ढोणेवाडी येथील शेतकरी पिता-पुत्रांनी दाखवून दिले आहे.


पाच ते सहा लाख रुपये खर्चून ट्रक्टर घ्यावयाचा म्हणजे कर्ज आलेच. कर्ज फिटले नाही की नशिबाला दोष देत बसायचं, अशी सर्वसाधारण शेतकर्‍यांची गत असते. पण ढोणेवाडीतील शिवाजी माळी व मारुती शिवाजी माळी या पिता-पुत्रांनी निरिक्षणातून व थोडे डोके चालवून काही लोखंडी वस्तू व इंजिनपासून सुमारे लाख-सव्वालाखात ट्रक्टर व ट्रॉली बनवली आहे. याबरोबरच त्याच्या जोडीला मळणी मशीनचा आधार घेत वर्षात जवळजवळ ५० हजारांचे उत्पन्न मिळविले आहे.

पंढरपूरच्या वारीला जात असताना शिवाजी माळी यांना डिझेल इंजिन जोडलेला ट्रक्टर दिसला. शेतकरी असल्याने त्याने कुतुहलापोटी ट्रक्टरची बारकाईने पाहणी केली. हुपरीच्या फैय्याज मेस्त्री यांच्याकडील भंगारमधील जीपची चेस २६ हजारात खरेदी केली. मेस्त्रीच्या अनुभवाचा व आपल्या कल्पनेचा आधार घेत फिटर डिझेल इंजिनवर चालणारा ट्रक्टर तयार केला. यासाठी भंगारमधीलच कमांडर जीपचा गीअर बॉक्स व इतर साहित्याचा वापर केला. १० हजार हॉर्स पॉवरचे जुने डिझेल इंजिन वापरले आहे. किरकोळ अँगल, बेअरिंगसाठी सुमारे १८ हजार रुपये तसेच या ट्रक्टरवर ट्रॉली व मळणी मशीन बसविण्यासाठी १० हजार रुपये खर्च केले. अँगल फ्रेम ५ फूट ५ इंचला नटबोल्टच्या सहाय्याने ट्रॉली किंवा मळणी यंत्र जोडता येते. विशेष बाब म्हणजे गिअर बॉक्स व इंजिन चाकासाठी कोणत्याही प्रकारचा बेल्ट वापरलेला नाही. या इंजिनाद्वारे एक लिटर डिझेलमध्ये २० ते २५ कि. मी. पर्यंत ट्रक्टर चालविता येतो. तसेच एक टनापर्यंतची वाहतूक करण्याची क्षमता या ट्रक्टरची आहे. ताशी ३० ते ४० कि. मी. वेगाची क्षमताही या ट्रक्टरची आहे. 

भंगारमधील स्क्रपचा उपयोग करुन कमीत कमी खर्चात हा ट्रक्टर बनविला असून मळणी व वाहतुकीतून ५० हजार रुपये मिळविले आहेत. कर्जाला फाटा देऊन भंगारातील वस्तूपासून अवघ्या लाख-सव्वालाखात ट्रक्टर बनविला असल्याने कर्जाचे ओझेही डोक्यावर नाही. शिवाय बर्‍यापैकी उत्पन्नही मिळू लागल्याने काम करण्यास उत्साह येत असल्याचे उद्गार मारुती माळी यांनी काढले. 


येत्या वर्षभरात याच उत्साहातून ट्रक्टरसाठी झालेला खर्च पूर्णत: फिटेल असा विश्वासही व्यक्त करायला मारुती माळी विसरले नाहीत. काही तरी नवीन करण्याची इच्छा, धडपड, कल्पकता व श्रमाची जोड दिल्यास आपणही नवनिर्मिती करु शकतो, हे या पिता-पुत्रांनी सिध्द करुन दाखविले आहे.

बालाघाटच्या डोंगरात फुलली द्राक्षबाग.तुळजापूरच्या आसपासचा बालाघाटचा डोंगर म्हणजे कधीकाळी उघडा बोडका असा डोंगर होता. डोंगरावर असणार्‍यांची शेती म्हणजे केवळ नावालाच! जिकडे तिकडे कुसळंच दिसायची. मात्र याच ठिकाणी अहोरात्र मेहनत, जिद्द आणि चिकाटीने सत्यवान सुरवसे या शेतकर्‍याने माळरानावर द्राक्षाची बाग फुलवली. केवळ मराठवाडय़ातीलच नव्हे तर राज्याच्या इतर भागातून तसेच कर्नाटक, आंध्र प्रदेशातील द्राक्ष विक्रेते सुरवसे यांच्या बागेत येऊन द्राक्ष खरेदी करत आहेत. तुळजापूरपासून जवळच असणार्‍या होर्टी या छोटय़ाशा गावातील सत्यवान सुरवसे यांनी स्वकष्टातून आणि योग्य मार्गदर्शनामुळे साधलेली ही किमया अनेकांना प्रेरणा देणारी आहे! 

पारंपरिक शेती करणार्‍या कुटुंबातील सुरवसे यांनी आपल्या भावांच्या मदतीने डोंगराळ माळरानावर अक्षरश: नंदनवन फुलवले. केवळ दहावी पास असतानाही प्रागतिक शेतीचा मार्ग त्यांनी चोखाळला. सुरुवातीला बँकेमार्फत कर्ज घेऊन ही द्राक्ष बाग उभी केली. स्वत: मेहनत घेऊन बाग फुलवली. विंधन विहिरीचे पाणी ठिबक सिंचनाद्वारे प्रत्येक झाडाला देण्याची व्यवस्था त्यांनी केली. रासायनिक खतांऐवजी त्यांनी सेंद्रीय खताचा वापर केला. त्यामुळे उत्पादनात चांगलाच फरक पडला. 

उत्पादन वाढीसाठी पश्चिम महाराष्ट्रात जाऊन त्यांनी तेथील द्राक्ष उत्पादकांचे मार्गदर्शन घेतले. या मार्गदर्शनाचा त्यांना खूपच उपयोग झाला. द्राक्षांपासून मिळालेल्या उत्पादनातून त्यांनी अधिक जमीन विकत घेतली. त्या ठिकाणीही द्राक्ष बाग लावली. गेल्या वर्षी त्यांनी आपल्या ५५ एकरात तब्बल ४०० टन द्राक्ष उत्पादन घेतले. याशिवाय आपल्या प्रमाणेच परिसरातील इतर शेतकर्‍यांनाही फायदा व्हावा या हेतूने त्यांनी बेदाणा उद्योग सुरु केला. यामुळे या शेतकर्‍यांचाही फायदा झाला. 

सुरवसे त्यांच्या या आर्थिक समृद्धीचे सार नेमक्या शब्दांत मांडतात, शेती करायचे म्हटले तर शेतकर्‍यांनी स्वत: काम केले पाहिजे. शेती करताना जिद्द व चिकाटी आवश्यक आहे. स्वकष्टाशिवाय पर्याय नाही. शेतात स्वत: राबल्याशिवाय यश दिसत नाही. 

सुरवसे यांच्या या कष्टाची फळे त्यांना आता चाखता येत आहेत. विविध राज्यातील व्यापारी स्वत: बागेत येऊन द्राक्षांची खरेदी करीत आहेत. वाहतूक खर्चातील बचत म्हणजे नफ्यात वाढ असे गणित ते मांडतात. एवढी मोठी बाग जोपासताना औषध फवारणी व मजुरीचा येणारा मोठा खर्च लक्षात घेऊन त्यांनी घरच्या पशुधनाचा वापर सेंद्रीय खत म्हणून केला. त्यांच्या या प्रयोगाला यश आले. त्यामुळे इतर शेतकरीही आता त्यांची बाग पाहण्यासाठी रांगा लावत आहेत. सुरवसे यांच्या कष्टाला मिळालेली ती पावतीच आहे! 

लावली तूर...उत्पन्न भरपूर.

नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्यातील मांडवी गावापासून अंबाडी घाटाकडे निघाल्यावर उजव्या बाजूस असलेले हिरवेगार शेत लक्ष आकर्षित करते. शेतात साधारण ५ फूट उंचीची तुरीचे रोपे वाढलेली आहेत. एकसारखी छाटणी करण्यात आल्याने शेतातील ते सौंदर्यही नजरेत भरते. सोबत कोवळी लाल-पिवळी फुले सूर्यप्रकाशात छान चमकतात. हे सौंदर्य समाधानाने नजरेत साठविताना शेतमालक माधव चव्हाण यांना होणारा आनंद चेहर्‍यावर स्पष्ट दिसतो. 

हा संपूर्ण परिसर तसा माळरानाचा मात्र चव्हाण यांच्या बाजूला असलेल्या जमिनीचा पोत जरा चांगला आहे. आपल्या १५ एकर शेतात प्रामाणिकपणे कष्ट करून हातात येईल ते उत्पन्न घेण्याकडे त्यांचा कल होता. मात्र तालुका कृषि अधिकारी पी. आर. देशमुख आणि त्यांचे सहकारी राठोड यांच्याशी परिचय झाल्यानंतर शेतीत नवे प्रयोग करण्याचा विचार त्यांच्या मनात आला. 

पूर्वी पारंपरिक पध्दतीने कापूस आणि सोयाबीनसारखी पिके घेतली जायची. बर्‍याचदा मर्यादित पाण्यामुळे उत्पन्न कमी यायचे. राठोड यांच्या सल्ल्यानुसार चव्हाण यांनी १ लाख २५ हजार रूपये खर्च करून ठिबक सिंचनाची सोय करून घेतली. त्यामुळे त्यांना चांगला फायदा झाला. कापसाचे उत्पन्न वाढले. अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी त्यांनी यंदाच्या मोसमात तुरीची लागवड केली. तुरीचे पहिले पीक हातात आल्यानंतर त्यांनी बियाणे कंपनीच्या सल्ल्यानुसार दुहेरी उत्पन्नासाठी रोपांची एकसारखी कटिंग केली. त्याचा फायदा त्यांना झाला आहे. शेतातील प्रत्येक रोपांवर मुळाच्या अगदी वरच्या भागापासून शेंगा लागण्यास सुरूवात झाली आहे. 

पहिल्या तोडणीनंतर त्यांनी पिकाला डिएपी व युरिया दिले. दुसर्‍या पिकाची वाढ जोमाने सुरू झाली असून प्रत्येक रोपावर शेंगांचा बहर आला आहे. एकूण १०० क्विंटल तूर मिळण्याचा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला. दोन रोपांच्यामध्ये त्यांनी उन्हाळी पीक म्हणून टरबूज आणि काकडीची लागवड केली आहे. त्यापासून त्यांना अधिकचे उत्पन्न मिळणार आहे. ठिबक सिंचनाचा या पिकांनादेखील लाभ होणार आहे. 

पारंपरिक पीक पध्दतीत अभ्यासाअंती केलेल्या बदलामुळे चव्हाण यांचे शेत बहरले आहे. पुढच्या हंगामात नगदी पिकांकडे अधिक लक्ष देण्याचा विचार त्यांनी बोलून दाखविला. त्यांच्या प्रयत्नांना कृषि विभागाच्या सहकार्यामुळे बळ मिळाले आहे. असे प्रयत्न आदिवासी भागातील इतर शेतकर्‍यांना मार्गदर्शक ठरणार आहेत. 

आंबोलीत स्ट्रॉबेरीने धरले बाळसे.

माजी सैनिक असलेल्या चौकुळा येथील बापू सोमा गावडे यांनी अभ्यासूपणे स्ट्रॉबेरी शेती केली आहे. त्याची फळेही त्यांना आता मिळायला सुरुवात झाली आहे. मळलेली वाट सोडून नवीन वाटेने जायचे म्हणजे जो त्रास होतो तो गावडे यांनी अनुभवला आहे. तरीही गावडेंनी यशस्वीरित्या स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. 

महाबळेश्वर येथूनच तांत्रिक माहिती आणि स्वीट चार्ली व ईटरडॉन या जातींची रोपे आणून त्यांनी लागवड केली आहे. वाफ्यावर ४५ सेमी अंतरावर दोन रांगेत लागवड झाली आहे. या रोपांना ठिबक सिंचन पध्दतीने पाणी देण्यात येत आहे. ही रोपे आता फळ धरायला लागली आहेत. स्ट्रॉबेरीची चमक चांगली आहे आणि तिची चवही उत्तम आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली हे नामांकित पर्यटनस्थळ आहे. येथे विक्रिसाठी खास प्रयत्न करावे लागणार नाहीत. त्यामुळे गावडे यांच्या स्ट्रॉबेरी शेतीचे अनुकरण व्हायला हवे. त्यामुळे आसपासच्या गावातील शेतकर्‍यांना एक वेगळी दिशा मिळेल. या शेतीतून त्यांची आर्थिक उन्नती देखील होईल. 

कोकणात प्रयोगशील शेतकर्‍यांची कमतरता नाही. मात्र प्रयोग करणे ही खर्चिक बाब आहे. त्यामुळे या प्रयोगशील शेतकर्‍यांची उमेद कायम राखण्यासाठी कृषी विभाग कार्यरत आहे. शेतकर्‍यांनी आवड दाखविल्यास कृषी विद्यापीठ देखील या प्रयोगांचा अभ्यास करुन संबंधित शेतकर्‍यांना सखोल मार्गदर्शन करु शकेल. यामुळे कोकणातील पिकांची विविधता वाढेल आणि ती जिल्ह्याच्या विकासाला चालना देणारी ठरेल.


माळरानावरील बहर.

नांदेड जिल्ह्याच्या सीमेवरील मांडवी गाव....सभोवती संपूर्ण डोंगराळ माळरान....नांगर टाकला तिथे खडक....अशा परिस्थितीत शेती करणे हे मोठय़ा जिकरीचे काम आहे. कष्ट जास्त आणि उत्पन्नाची खात्री नाही....मात्र फेब्रुवारी महिन्यातही या माळरानाच्या एका बाजूला टेकडीवर हिरवा बहर दिसतो. प्रगतीशील शेतकरी मधुकर राठोड यांनी परिश्रम आणि नियोजनाच्या आधारे याच बहरातून लाखोंमध्ये उत्पन्न घेतले आहे. 

राठोड १९७३ मध्ये पीयुसीची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि त्यानंतर शेतीकडे वळले. वडिलोपार्जित शेतीत उडीद, ज्वारी, कापूस आदी पिके व्हायची. हवामान आणि दरातील अनिश्चिततेमुळे शेती बर्‍याचदा तोटय़ात जायची. राठोड यांनी शेतीत नवे प्रयोग करण्यास सुरूवात केली आणि कापसाचे एकरी १४ क्विंटल पर्यंत उत्पन्न नेले. ८० च्या दशकात म्हैसूर येथे शेती सहलीला गेल्यानंतर त्यांनी शेतीच्या बांधावर तुतीची लागवड करून रेशीम उत्पादन केले. मात्र चांगला भाव न मिळाल्याने ते इतर पिकांकडे वळले. 

कृषि विभागाचे मार्गदर्शन आणि आर्थिक सहकार्यातून त्यांनी आदिवासी दुर्गम भागात ठिबक सिंचनाचा पहिला प्रयोग केला. त्यात त्यांना चांगले यश आले. पहिल्याच वर्षी कापसाचे उत्पादन एकरी २५ क्विंटल झाले आणि मिश्र पिक म्हणून एक गुंठय़ात लावलेल्या रोशनी मिरचीचे एक क्विंटल उत्पादन घेता आले. पुढे मिश्र पिक म्हणून त्यांनी तुरूची लागवड केली. त्यात एकरी १० क्विंटल उत्पादन घेतले. 

राठोड यांच्या वडिलोपार्जित शेतातली अर्धी जमीन तलावात गेली. उरलेली ७ एकर जमीन खडकाळ होती. त्यामुळे उत्पादनाचा प्रश्न निर्माण झाला. कष्टही भरपूर करावे लागायचे. चार-पाच वर्षे अशीच गेल्यानंतर त्यांनी एक यशस्वी प्रयोग केला. दोन महिन्यासाठी केवळ ५० रूपये रॉयल्टी भरून तलावातून गाळ काढण्याची रितसर परवानगी घेतली. माळरानावरील जमीन समतल करण्यासाठी ७५० ट्रक्टर गाळ त्यावर टाकला. तो वाहू नये म्हणून चारही बाजूला बांधबंदिस्ती केली. या प्रयोगात त्यांना यश आले. शिवाय तलावातील पाण्याची पातळी देखील वाढली. 

कृषि विभागाच्या सहकार्याने राठोड यांनी शेततळे तयार केले. त्याला ८० हजार रूपयांचे अनुदान मिळाले. पठारावर बोअर केला व पाण्याची व्यवस्था केली. गाळाची जमीन उत्तम प्रतीची असल्याने आणि पाण्याची व्यवस्था झाल्याने उत्पादनात लक्षणीय वाढ झाली. गाळाच्या जमिनीमुळे ३ वर्ष तण वाढण्याची चिंता नसल्याचे राठोड यांनी सांगितले. पारंपरिक पिकांबरोबर त्यांनी हंगामाच्या मागणीनुसार पीक घेण्यास सुरूवात केली. दसर्‍याच्या पूर्वी साडेतीन महिने झेंडूची लागवड करून २५ हजारांचे उत्पन्न घेतले. ११ गुंठे जमिनीवर काकडीपासून ४० हजाराचे उत्पन्न मिळाले. आदिलाबाद येथील बाजारात काकडी आणि फुलांना खूप मागणी आहे. १० गुंठय़ात लावलेल्या मिरचीपासून त्यांना ४० हजार रूपये मिळाले. या पिकांना कापसापेक्षा कमी मेहनत लागत असल्याचे ते सांगतात. संक्रांतीला गाजर, मुळे आणि इतरवेळी कोथिंबीर सारखी पिके मुख्य पिकांच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत घेऊन त्यांनी उत्पन्न वाढविले आहे. 

आदिवासी भागात शेती करताना दाखविलेल्या प्रयोगशीलतेमुळे मधुकररावांची शेती साधारण वर्षभर हिरवी दिसते. 'सिझनल' पिकांची कल्पना ते शेतीला भेट देणार्‍या प्रत्येकाला पटवून देतात. माळरानावर मिरचीने लगडलेली रोपटी ते अभिमानाने दाखवितात अर्थात या अभिमानामागे त्यांची प्रचंड मेहनत आणि सातत्यपूर्ण प्रयत्न आहेत. 

Friday, March 4, 2011

आणि कात लाल झाला...

सिंधुदुर्गच्या ग्रामीण भागातील जंगलामध्ये आता कातभट्टय़ा पेटू लागल्या आहेत. रंग, पानमसाल्यासाठी वापरल्या जाणार्‍या काताची मागणी देशभरातून वाढू लागल्याने प्रतिकिलोमागे ३०० रुपये इतका दर वाढला आहे. कात ज्यापासून उत्पादित केला जातो, त्या खैराची झाडे विकणारे शेतकरी आणि कात भट्टय़ातून कात उत्पादन करणार्‍या व्यावसायिकांना त्यामुळे पूर्वीपेक्षा अधिक फायदा मिळू लागला आहे.

जिल्ह्यातील बहुतांशी तालुक्यांमध्ये जंगलात खैराची नैसर्गिक झाडे आहेत. पूर्वीपासूनच कातभट्टय़ा या जंगलांच्या परिसरात पेटविल्या जातात. आता काताची मागणीही वाढली आहे. त्यामुळे भट्टयांचे कामही वाढले आहे. देवगड तालुक्यातील फणसगाव परिसरात दरवर्षी कोटय़ावधी रुपयांची उलाढाल करणार्‍या कातभट्टया सध्या सुरु आहेत. परिसरातील शेतकर्‍यांची खैर तोडणी मोठय़ा प्रमाणात सुरु झाली आहे. फणसगाव परिसरात नाद, गवाणे, वाघिवरे, वेळगिवे, बुरंबावडे, उंडील, कुणकवण, पोंभुर्ले, धालवली, कोर्ले, महाळुंगे आदी भागातील शेतकरी खैराची तोड करीत असतात.

खैराची तोड करताना शेतकरी खैराचे झाड मुळापासून खोदून काढतो. त्यामुळे त्या झाडावर नवीन झाड उगवत नाही. या झाडाचे पडणारे बी जंगली भागात रुजून येऊन अशी झाडे नव्याने तयार होतात. तोडल्यानंतर त्याची पूर्ण साल काढली जाते. यानंतर आत असणार्‍या साडीव भाग वेगळा करुन तो कातभट्टीवर नेऊन विकला जातो. या साडीव भागाचे वजन करताना मण हे प्रमाण मानले जाते. एक मण म्हणजे चाळीस किलो वजन धरण्यात येते. एका मणाला सध्या नऊशे ते एक हजार रुपयाचा चढता भाव मिळतो आहे. त्यामुळे येथील शेतकरी खैराच्या झाडांची काळजी घेतो. या झाडांना वाढीसाठी कोणतेही खतपाणी दिले जात नाही. ती नैसर्गिक वाढत जातात आणि शेतकर्‍यांना लाखो रुपये मिळवून देतात. फणसगाव परिसरात सात ते आठ कातभट्टय़ा सध्या पेटत आहेत. रात्रंदिवस हे काम सुरु असते. कातभट्टय़ा चालवणारे बहुतांशी व्यावसायिक हे सावंतवाडी तालुक्यातील तळवडे गावाच्या परिसरातील आहेत. या भट्टय़ा दरवर्षी त्या-त्या जागेवरच शासनाची परवानगी घेऊन चालविल्या जातात.

कातभट्टयांमुळे त्या त्या भागातील ग्रामपंचायतींनाही कर मिळतो. दरवर्षी काताचे भाव वाढत चालल्याने व्यावसायिक आणि शेतकर्‍यांच्या उत्पन्नातही वाढ होत आहे. फणसगाव परिसरात प्रशांत कोरगावकर, सुरेश वराडकर, विलास परब, प्रकाश परब, थॉमस फर्नांडीस या व्यावसायिकांच्या कातभट्टया आहेत.

पारंपरिक शेतीबरोबरच कोकणातील शेतकर्‍यांनी जर खैराच्या झाडांचे व्यवस्थित संगोपन करुन त्यात नवनविन प्रयोगाद्वारे सुधारणा केल्यास त्यांना आर्थिक उत्पान्नाचे नवे दालनच उघडे होईल.

  • 'महान्यूज

  • Popular Keywords

    “पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद