विद्यानगरी, उद्योगनगरी म्हणून ओळखले जाणारे पुणे फलोत्पादन क्षेत्रातही अग्रेसर ठरत आहे. जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्र फळबाग लागवडीखाली आले आहे. येथील पुरंदर तालुका सीताफळाचे आगर म्हणून सुपरिचित आहे. दुष्काळग्रस्त म्हणून ओळखल्या जाणार्या या तालुक्यात सुमारे १२०० शेतकरी एकत्र येऊन खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाने आणि शासनाच्या कृषि विभागाच्या मदतीने सीताफळ गर उत्पादन प्रकल्प साकारत आहेत.
पुरंदर तालुक्यात बागायती क्षेत्र व सिंचनक्षेत्रही कमी आहे. फळ पिकाचे क्षेत्र ७ हजार ३५० हेक्टर असून यात प्रामुख्याने सीताफळ, अंजीर, चिक्कू व डाळींब ही प्रमुख फळपिके होतात. या भागात वाटाणा व टोमॅटो देखील मोठय़ा प्रमाणावर घेतले जाते. पुरंदर तालुक्यात केवळ सीताफळाखालील क्षेत्र २ हजार ५० हेक्टर आहे. बाजारात सीताफळाला मोठय़ा प्रमाणावर मागणी असूनही हे फळ लवकर खराब होत असल्यामुळे शेतकर्यांना हे फळ कमी दराने विकावे लागते. त्यामुळे त्यांना फायदाही कमी होतो. सीताफळाचा गर काढून त्यावर प्रक्रिया केल्यास वर्षभर टिकत असल्याने सीताफळाची थेट विक्री करण्यापेक्षा योग्यवेळी योग्य भावाने हा गर विकता येईल, या उद्देशातून येथे सीताफळ गर उत्पादन प्रकल्प साकारत आहे.
या तालुक्यातील विविध गावांतील सुमारे १२०० शेतकर्यांनी एकत्र येऊन २४ प्रकल्पांची उभारणी केली आहे. एका प्रकल्पामध्ये ३० ते ४० शेतकरी सहभागी झाले आहेत. त्यासाठी २५लाख रुपये खर्च अपेक्षित असून राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत ४० टक्के म्हणजेच ९ लाख ६० हजारांचे अनुदान देण्यात येणार आहे. या प्रकल्पातील २० प्रकल्प सहकारी तत्त्वावर तर ४ प्रकल्प खाजगी तत्वावरील आहेत. प्रत्येक प्रकल्पातून किमान ३० महिलांना रोजगार उपलब्ध होणार असून २४ प्रकल्पाद्वारे सुमारे ७५० महिलांना रोजगार उपलब्ध होईल.
या प्रकल्पासंदर्भात कृषि उपसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनिल बोरकर यांनी सांगितले की, डोंगराळ भाग असणार्या पुरंदर तालुक्याच्या विकासासाठी शेतकर्यांची प्रगती होणे गरजेचे आहे हे ध्यानात घेऊन खासदर सुप्रिया सुळे यांच्या प्रेरणेतून व तालुक्यातील शेतकर्यांच्या सहकार्यातून प्रकल्प उभारण्याचे ठरले व त्यादृष्टीने कामही सुरु झाले आहे. एक प्रकल्प १५०० चौ. फूट जागेत उभारण्यात येणार असून यात तयार झालेला माल मोठे उत्पादक, विक्रेत्यांना विक्री करता येईल. तसेच प्रकल्प सुरु झाल्यानंतर गावांचा एकत्रित संघ स्थापन करुन कॉमन ब्रॅण्ड व मार्केटिंग करण्याचाही विचार आहे. या प्रकल्पामध्ये साधारणपणे ५० टन सीताफळ पल्प, २० ते २५ टन टोमॅटो प्युरी, ५ ते १० टन पर्यंत इतर फळांचा पल्प व ३ ते ५ टनापर्यंत लोणच्यासाठी कैरीच्या फोडी करण्याचे काम होणार असल्याने वर्षभर या महिलांना रोजगार उपलब्ध होईल. याबरोबरच भाजीपाला पॉकिंग करण्यासारखे उद्योगही येथे केले जातील. सर्वसाधारणपणे जुलैमध्ये या प्रकल्पातून उत्पादन सुरु होण्यासाठी प्रयत्न सुरु असून त्यासाठी सर्व तयारी सुरु आहे.
भौगोलिकदृष्टय़ा दुष्काळी भागात मोडत असलेल्या पुरंदर तालुक्यात सीताफळ गर उत्पादन प्रकल्प उभारल्यास या भागातील शेतकर्यांना निश्चितच फायदा होऊन शेतकर्यांबरोबरच बचतगटातील महिलांनाही गावातच रोजगार निर्मिती होईल आणि तालुक्याचा आर्थिक विकासही घडेल हे निश्चित.!
No comments:
Post a Comment