सिंधुदुर्गच्या ग्रामीण भागातील जंगलामध्ये आता कातभट्टय़ा पेटू लागल्या आहेत. रंग, पानमसाल्यासाठी वापरल्या जाणार्या काताची मागणी देशभरातून वाढू लागल्याने प्रतिकिलोमागे ३०० रुपये इतका दर वाढला आहे. कात ज्यापासून उत्पादित केला जातो, त्या खैराची झाडे विकणारे शेतकरी आणि कात भट्टय़ातून कात उत्पादन करणार्या व्यावसायिकांना त्यामुळे पूर्वीपेक्षा अधिक फायदा मिळू लागला आहे.
जिल्ह्यातील बहुतांशी तालुक्यांमध्ये जंगलात खैराची नैसर्गिक झाडे आहेत. पूर्वीपासूनच कातभट्टय़ा या जंगलांच्या परिसरात पेटविल्या जातात. आता काताची मागणीही वाढली आहे. त्यामुळे भट्टयांचे कामही वाढले आहे. देवगड तालुक्यातील फणसगाव परिसरात दरवर्षी कोटय़ावधी रुपयांची उलाढाल करणार्या कातभट्टया सध्या सुरु आहेत. परिसरातील शेतकर्यांची खैर तोडणी मोठय़ा प्रमाणात सुरु झाली आहे. फणसगाव परिसरात नाद, गवाणे, वाघिवरे, वेळगिवे, बुरंबावडे, उंडील, कुणकवण, पोंभुर्ले, धालवली, कोर्ले, महाळुंगे आदी भागातील शेतकरी खैराची तोड करीत असतात.
खैराची तोड करताना शेतकरी खैराचे झाड मुळापासून खोदून काढतो. त्यामुळे त्या झाडावर नवीन झाड उगवत नाही. या झाडाचे पडणारे बी जंगली भागात रुजून येऊन अशी झाडे नव्याने तयार होतात. तोडल्यानंतर त्याची पूर्ण साल काढली जाते. यानंतर आत असणार्या साडीव भाग वेगळा करुन तो कातभट्टीवर नेऊन विकला जातो. या साडीव भागाचे वजन करताना मण हे प्रमाण मानले जाते. एक मण म्हणजे चाळीस किलो वजन धरण्यात येते. एका मणाला सध्या नऊशे ते एक हजार रुपयाचा चढता भाव मिळतो आहे. त्यामुळे येथील शेतकरी खैराच्या झाडांची काळजी घेतो. या झाडांना वाढीसाठी कोणतेही खतपाणी दिले जात नाही. ती नैसर्गिक वाढत जातात आणि शेतकर्यांना लाखो रुपये मिळवून देतात. फणसगाव परिसरात सात ते आठ कातभट्टय़ा सध्या पेटत आहेत. रात्रंदिवस हे काम सुरु असते. कातभट्टय़ा चालवणारे बहुतांशी व्यावसायिक हे सावंतवाडी तालुक्यातील तळवडे गावाच्या परिसरातील आहेत. या भट्टय़ा दरवर्षी त्या-त्या जागेवरच शासनाची परवानगी घेऊन चालविल्या जातात.
कातभट्टयांमुळे त्या त्या भागातील ग्रामपंचायतींनाही कर मिळतो. दरवर्षी काताचे भाव वाढत चालल्याने व्यावसायिक आणि शेतकर्यांच्या उत्पन्नातही वाढ होत आहे. फणसगाव परिसरात प्रशांत कोरगावकर, सुरेश वराडकर, विलास परब, प्रकाश परब, थॉमस फर्नांडीस या व्यावसायिकांच्या कातभट्टया आहेत.
पारंपरिक शेतीबरोबरच कोकणातील शेतकर्यांनी जर खैराच्या झाडांचे व्यवस्थित संगोपन करुन त्यात नवनविन प्रयोगाद्वारे सुधारणा केल्यास त्यांना आर्थिक उत्पान्नाचे नवे दालनच उघडे होईल.
No comments:
Post a Comment