ग्रामीण भागातील आणि तेदेखील शेतकरी असलेल्या तरुणाच्या हातात लॅपटॉप आणि मोबाईल पाहिल्यावर आश्चर्य वाटणं स्वाभाविक आहे. रत्नागिरी जिल्ह्यात लांजा तालुक्यातील खरवसे गावातील मिलींद माने या तरुण शेतकऱ्याला भेटल्यावर एखाद्या इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्याला भेटल्यासारखं वाटतं. कॉलेजिअन तरुणाची वेशभूषा, हातात लॅपटॉपची बॅग, अंगात कोट, बाईकवर स्वारी...त्यांचा दुसरा सहकारी प्रविण जेधे मात्र पारंपरिक कोकणी वेषात...बनिअन आणि हाप पँट..तिसरे शरद चव्हाण मात्र शेतीवर काम करणारे वाटतात. तिघांची भेट घेतल्यावर वेगवेगळ्या क्षेत्रातील त्यांच्या क्षमतेमुळे त्यांनी उभा केलेला 'प्रभात ऍ़ग्रोटेक' हा कृषि प्रकल्प यशस्वी झाल्याचं लक्षात आलं.
खरं तर हे तिन्ही राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात व्यस्त राहणारे. प्रत्येकाची राजकीय विचारधारा वेगळी. मात्र कोकणातल्या लाल मातीत राबताना एकत्रितपणे घाम गाळून ओसाड माळरानावर पीक घेण्याचा निश्चय यांनी २००८ मध्ये केला. तत्पूर्वी सरपंच असलेल्या माने आणि चव्हाण यांनी ग्रीन हाऊस प्रकल्प करून पाहिला. त्यात त्यांना यश आले नाही. मात्र त्यांची धडपड पाहून त्यांचा तिसरा मित्र जेधे त्यांच्या मदतीला आला. कोकणात शेतीसाठी मोठी जमीन मिळणे फार कठीण असते. अशावेळी जेधे यांच्या परिवाराने भाडेपट्टयाने या तिघांना शेती करण्यासाठी जमीन दिली.