एकीचे बळ हे नेहमीच मोठे असते. या बळातून सर्वसामान्य माणसेसुध्दा सहजपणे एखादे मोठे काम करतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कट्टा, ता. मालवण येथील सात मित्रांनी एकत्र येत या एकीच्या बळावरच हिरवाई नर्सरी फुलविली आहे.
कट्टा येथील विकास म्हाडगुल, किशारे शिरोडकर, शरद बोरसकर, दीपक पावसकर, राघो गावडे, महेंद्र माणगावकर व नारायण बिडये हे बालमित्र. लहानपणापासून एकत्र खेळले, बागडले. महाविद्यालयीन शिक्षणही एकत्रित पूर्ण केले. एकदुसऱ्याच्या सुखदु:खात सहभागी झाले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जो-तो पोटापाण्यासाठी नोकरीच्या शोधात वेगवेगळ्या ठिकाणी गेलं. सुदैवाने सर्वांनाच चांगली नोकरीही मिळाली. लौकिक अर्थाने प्रत्येकजण आपल्या संसारात रममाण झाला.
मात्र या सर्व रहाटगाड्यात एकमेकांची व गावाची नाळ तुटल्याची खंत त्यांना स्वस्थ बसू देईना. यासाठी सर्वांनी एकत्र येत गावाकडे काहीतरी निर्माण करावे जेणेकरून वर्षातून एकदा काही दिवस सर्व मित्रांना सहकुटूंब एकत्र जमता येईल व बालपणीच्या आठवणींना उजाळा देता येईल या भावनेतून त्यांनी १९९० साली मालवण तालुक्यातील गोळवण गावात सुमारे ३५ एकर जागा खरेदी केली. मात्र या जागेवर नेमके काय करायचे याविषयी काहीच निश्चित नव्हते. शासनाने फलोत्पादन विकासासाठी १०० टक्के अनुदान योजना चालू केली होती. या योजनेचा लाभ घेत त्यांनी ३५ एकर क्षेत्रात आंबा, काजू, नारळ, सुपारी अशा फळझाडांची लागवड केली. मात्र सुरुवातीला देखभालीअभावी यातील बरीचशी झाडे मरुन गेली. मात्र यामुळे हार न मानता या सातही जणांनी दुसऱ्या वर्षी स्वखर्चाने पुन्हा नव्याने लागवड केली. यावेळी बागेच्या देखभालीसाठी कृषी पदवीधर तरुणाची नेमणूक केली. त्याच्या मार्गदर्शनाखाली बागेचा विकास होऊ लागला.
बागेतून बऱ्यापैकी उत्पन्नही मिळू लागले. याचवेळी परिसरातील सर्वसामान्यांना रोजगार देण्यासाठी काय करता येईल याबाबत त्यांनी विचार सुरु केला व यातूनच हिरवाई नर्सरीचा जन्म झाला. सन १९९४ साली कृषी विभागाकडून रीतसर नर्सरी परवाना घेऊन नर्सरी चालू केली. नर्सरीत आंबा, काजू, आवळा, चिकू यासारख्या फळझाडांची निर्मिती होऊ लागली. दर्जेदार व खात्रीशीर कलमे माफक दरात मिळू लागल्यामुळे अल्पावधीतच नर्सरी प्रसिध्दीस आली.
कलमांची गुणवत्ता टिकून रहावी, यासाठी नर्सरीत मातृवृक्षांची लागवड करण्यात आली. नर्सरीच्या या गुणवत्तेमुळे दरवर्षी कर्नाटक, ओरिसा आंध्रप्रदेश, गुजरात, छत्तीसगड, आसाम या राज्यांमधून मोठ्या प्रमाणात काजू व आंबा कलमे निर्यात केली जातात. या नर्सरीमुळे परिसरातील ५० लोकांना थेट रोजागार उपलब्ध झाला आहे. नर्सरीला अनेक कृषी तज्ज्ञ, उद्योजक, राजकीय नेते यांनी भेट देऊन नर्सरीचे कौतुक केले. गेली २१ वर्षे या सातही मित्रांची एकजूट अबाधित आहे.
No comments:
Post a Comment