संत्रा, मोसंबी हे शब्द जरी कानावर पडले तरी ओठांवर जीभ फिरविण्याचा मोह कोणालाही आवरता येत नाही. द्राक्षांचा जिल्हा म्हणून नाशिकची ओळख दूरपर्यंत आहे. परंतु मोसंबी पिकाचं राज्य हे मराठवाड्यात आहे. असे असले तरी नाशिक जिल्ह्यातील भगूर या गावातील किरण देशमुख या तरुण शेतकऱ्याने निसर्गाचा समतोल राखत आपल्या शेतात मोसंबीची लागवड करुन आधुनिक शेतीचा अनोखा प्रयोग केला आहे.
निसर्गाच्या लहरीपणामुळे नाशिकचे द्राक्ष उत्पादक शेतकरी अतिशय हैराण झालेले आहेत. परंतु भगूरच्या किरण देशमुखने अत्यल्प खर्चात फळबागांचा अनोखा प्रयोग राबविण्याचे धाडस केले आहे. त्यांनी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली आपले बी.ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर वडिलांनी घेतलेल्या शेतीवरच आपला उदरनिर्वाह करण्याचा निर्णय घेतला. वडील सेवानिवृत्त झाल्यानंतर ते पुन्हा आपल्या मूळगावी भगूर येथे राहण्यास आले. परंतु जालन्यात महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना आपल्याच मित्रांचे मोसंबीचे बाग कसे असतात याची माहिती चर्चेतून घेण्याचा प्रयत्न किरणने केला होता.
भगूरला आल्यानंतर वडिलांनी संपूर्ण कौटुंबिक जबाबदारी किरणवर सोपविली. त्याप्रमाणे शेती करायची पण ती परंपरागत न करता आधुनिक प्रकारची करायची असा निर्णय त्यांनी घेतला. प्रथमत: कमी उत्पन्नाचा फटका बसेल याची पूर्ण जाणीव मनाशी ठेवत शेती व्यवसायावर आपली नजर केंद्रित केली. त्यांनी शेताच्या बांधावर सागवानी झाडांची लागवड केली. त्याचबरोबर आंब्याच्या विविध जातीचे रोपटे लावले. त्याला काही फारसा खर्च आला नाही. परंतु जेव्हा या रोपट्याचे रुपांतर झाडात झाले तेव्हा खऱ्या अर्थाने त्यांचा आत्मविश्वास वाढला व शेतीला अजून वेगवेगळ्या प्रयोगातून प्रगतीपथावर कसे नेता येईल याकडे त्यांचे मन वेग घेऊ लागले.
त्याचे मन महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जालन्यात पाहिलेल्या मोसंबीच्या बागांपर्यंत जाऊन पोहोचले. जालना गाठून तेथे आपल्या महाविद्यालयीन मित्रांचा शोध घेऊन आपली नवीन कल्पना त्यांना बोलून दाखविली. मित्रांनाही ही कल्पना आवडली व त्यांनी लगेच मदतीचा हात पुढे केला. त्याप्रमाणे त्यांनी जालन्याहून सव्वाशे रंगपूर जातीचे मोसंबीचे कलम विकत घेतले. याची लागवड कशी करायची याची पूर्ण कल्पना नसल्याने त्यांनी जालन्याहून आपल्या सहकाऱ्यांना हे कलम लावण्यासाठी भगूरला आणले.
जवळच्या काही लोकांनी त्यांच्या प्रयत्नांची थट्टा केली. परंतु त्यांनी निंदकाचे घर असावे शेजारी या म्हणीप्रमाणे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपले काम सुरु ठेवले. या प्रयोगाला त्यांची पत्नी सुजाता देशमुख यांनी साथ दिली. जेव्हा या झाडाला निसर्गाच्या लहरीपणाचा कोणताही प्रादुर्भाव न होता चांगल्या प्रकारचे फळ आले तेव्हा अनेकांनी त्यांच्या शेतीत जाऊन व आधुनिक शेतीचा प्रयोग पाहून कौतुक आणि अभिनंदन केले.
मोसंबी पिकविण्याचे मनाशी बाळगलेले स्वप्न त्यांनी प्रत्यक्षात उतरविले आहे. मेहनतीचे चीज होते असा विचार ठेवून त्यांनी शारीरिक कष्टाबरोबरच बौध्दिक क्षमतेचा वापर केला. मोसंबी लागवडीचा प्रयोग यशस्वी करुन एक नवा पायंडा या तरुण शेतकऱ्याने पाडला आहे.
No comments:
Post a Comment