Thursday, August 11, 2011

युवा अभियंत्याची दुग्ध भरारी




नोकरीच्या मागे न लागता स्वमेहनतीने जिल्ह्यातील बेसखेडा (चांदुर बाजार) येथील व्यवसायाने इलेक्ट्रिकल इंजिनिअर असलेल्या युवकाने दुग्धव्यवसायात क्रांती घडविली आहे. पुणे येथील एका नामांकित कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी सोडून 'चॅलेंज' म्हणून त्याने दुग्धव्यवसाय स्विकारला आणि यशस्वीही करुन दाखविला. कुठल्याही शासकीय मदतीची अपेक्षा न बाळगता परिश्रमाने या व्यवसायात आपली वेगळी ओळख निर्माण करुन जिल्ह्यातील युवकांसाठी तो आदर्श ठरला आहे. रवी पाटील असे या होतकरु युवकाचे नाव आहे. कुटूंबाने शेतकरी असलेल्या या युवकाने शेतीला दुग्धव्यवसायाची जोड देऊन ही किमया साधली आहे.

समाजसेवी संस्था म्हणून काम करतांना आलेल्या अनेक प्रकारच्या अनुभवातून पाटील यांनी दुग्ध व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. मात्र आर्थिक तरतूदी अभावी त्यांचा हा व्यवसाय सुरु होऊ शकला नाही. त्यांचे वास्तव्य असलेल्या चांदुर बाजार तालुका परिसरात अनेक भाकड गाई कसायामार्फत कटाईसाठी जात होत्या. या गाईंना कसायापासून सोडविण्याच्या कामास त्यांनी प्रारंभ केला


एकदा कसायाकडून अशाचप्रकारे सोडविलेल्या गाई त्यांनी घरी आणल्या आणि याच गाईपासून त्यांनी दुग्ध व्यवसायास प्रारंभ केला. पुढे त्यांच्या गायींची संख्या चांगलीच वाढली. आज त्यांचेकडे विविध जातीच्या ६० गाई व ६४ गाईंची वासर आहेत. त्यापैकी २० गाई दुभत्या आहेत. या गाईंचे ४०० लिटर दुध निघते. त्यातील काही गाई १२ तर काही गाई ३० लिटरपर्यंत दुध देतात.

या व्यवसायाला प्रारंभ केल्यानंतर त्यांनी व्यवसाय आधुनिक पध्दतीने करण्यास प्रारंभ केला. त्यांनी आपल्या शेतातच मोठे शेड बांधले असून त्यामध्येच गाईचे संगोपन केले जाते. दुभत्या गाई व दुधाळू नसलेल्या गाईचे त्यांनी वेगवेगळे गट केले असून त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी बांधले जातात.

गाईंच्या वासरांसाठी त्यांनी वयानुसार व वजनानुसार वेगळी व्यवस्था केलेली आहे. गाईंना दिवसभर एकाच ठिकाणी बांधून ठेवल्यास स्नायूचे व स्तनाचे आजार होण्याची शक्यता असते. तसेच दुधाच्या प्रमाणातही घट येते. त्यामुळे मोकळ्या ठिकाणी गाईंना दिवसभर फिरता येतील यापध्दतीने बांधण्याची व्यवस्था त्यांनी केली आहे.

यांत्रिक पध्दतीने गाईंचे दुध काढल्या जात असल्याने वेळेची बचत होऊन दुध अधिक शुध्द राहत असल्याचे रवी पाटील यांनी सांगितले.

दररोज निघणाऱ्या ४०० लिटर दुधापैकी काही दुध ते गावातच विक्री करतात. व उरलेले दुध खाजगी कंपनीला विकतात. याशिवाय ते घरीच दही, पनिर, चक्का, चिज, तुप आदी वस्तू निर्माण करुन मागणी प्रमाणे ग्राहकांना पुरवितात. त्यांच्याकडे आठ एकर शेती असून चार एकर शेतीत त्यांनी गाईंसाठी केवळ चारा पेरणी केली आहे.

गाईंना अतिशय पोषक असणाऱ्या लुसर्न, बरसिंग, यशवंत, जयवंत, काडीघास, बाजरा, ज्वारी, मका, उस आदी विविध जातीच्या बहुवार्षिक चाऱ्याचे उत्पादन ते शेतात घेतात. त्यामुळे गाईच्या चाऱ्यासाठी त्यांना इतर ख्रर्च करावा लागत नाही. महिन्यात दुध, शेण, गोमुत्र व नविन कालवडी विक्रीतून १ लाख रुपयापर्यंतचे उत्पन्न होते. खर्च वजा जाता ५० हजारापर्यंतचे उत्पन्न शिल्लक राहत असल्याचे त्यांनी सांगितले.

गाईंच्या चांगल्या पोषणासाठी दहा किलो हिरवा चारा व दहा किलो कोरडे खाद्य असे २० किलो खाद्य प्रतिदिन ते गाईंना गरजेनुसार पुरवितात. दुधाव्यतिरीक्त अन्य उत्पादनाची साधनेही त्यांनी या व्यवसायातून निर्माण केले आहे. त्यांच्याकडे असलेल्या सर्व गाईंकडून वर्षाला ३०० ट्रॉली शेणखत निर्माण होते. दरररोज २०० लिटर गोमुत्र जमा होते. शेणखत विक्रीतूनही उत्पन्न मिळते.

शेडमध्ये निर्माण केलेल्या विशिष्ठ पध्दतीमुळे सर्व गोमुत्र एका मोठ्या टाक्यात जमा केले जाते. हे गोमुत्र ओलिताच्या पाण्यासोबत शेतात सोडले जात असल्याने शेताची उत्पादकता वाढविण्यासही मदत झाली आहे. अद्रकाची, हळद, मिरची, संत्रा, पपई, कपाशीची शेती करणाऱे शेतकऱी ४ रुपये लिटर प्रमाणे त्यांच्याकडून गोमुत्र खरेदी करतात.

जमीनीची सुपिकता वाढविण्यासाठी शेणखत अतिशय उपयुक्त ठरते. त्यांच्याकडे निर्माण होणारे शेणखत ते अन्य शेतकऱ्यांना देऊन त्याच्याबदल्यात गाईंसाठी लागणारा गव्हाचा भुसा शेतकऱ्यांकडनू घेतात त्यामुळे गाईंवर खाद्यापदार्थांसाठी कराव्या लागणाऱ्या खर्चात त्यांनी या पध्दतीनी कपात केली आहे. स्वत:च्या गाईंपासून मिळणाऱ्या दुधासोबतच परिसरातील शेतकऱ्यांचे दुधही ते संकलित करतात. जवळपास दरदिवशी हजार ते दीड हजार लिटर दुधाचे संकलन करुन अमरावती येथील एका खाजगी कंपनीला कमिशन बेसवर पुरवितात.

या व्यवसायतही त्यांना प्रतिलीटर एक रुपया याप्रमाणे दरदिवशी एक ते दीड हजाराच्या जवळपास उत्पन्न मिळते. त्यांच्याकडे विविध जातींच्या गाईंचा समावेश आहे. त्यात भरपूर दुध देणाऱ्या विदेशी जातीच्या जर्सी, होल्स्टेन तसेच साहिवाल, गीर, गौराळू व इंडियन जैन या देशी गाईंचाही समावेश आहे.

कसायाकडून कटाईसाठी जाणाऱ्या गाई अडवून त्या विकत घेऊन त्यांनी आपल्याकडून गाईंची संख्या वाढविली आहे. अशाच प्रकारच्या गाई अडवून परिसरातील ५० ते ६० कुटूंबात या गाईंपासून दुग्ध व्यवसाय सुरु झाला आहे. कसायापासुन सोडविलेल्या भाकड गायी पुन्हा उत्पादनक्षम बनवून जीवनदान देणे व चांगल्या अनुवांशिकतेचे वळु, शेतीउपयोगी बैल व कालवडी तयार करुन त्यांची विक्री करणे, कसायाकडून गाई सोडवितांना होणारा आनंद या व्यवसायात मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षाही अधिक असल्याचे रवी पाटील सांगतात.

या व्यवसायाचे चांगले नियोजन आणि परिश्रमाची तयारी ठेवल्यास चांगले उत्पन्न मिळू शकते. दुग्ध व्यवसाय करतांना गाईच्या संगोपनाकडे लक्ष देणे अधिक महत्वाचे ठरते. गाई व शेडची स्वच्छता गाईंसाठी आरोग्य सुविधेकडे लक्ष दिल्यास दुधातही वाढ होते. एक गाय एका कुटूंबाला चांगल्या पध्दतीने आर्थिक आधार देऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीसोबतच दुग्ध व्यवसायही करावा, असे ते म्हणतात. रवी पाटील यांनी कुठल्याही मदतीची अपेक्षा न ठेवता स्वमेहनतीने हा व्यवसाय उभा करुन उत्तुंग भरारी घेतली आहे. परिसरात विविध कुटूंबात दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी चळवळ म्हणून ते काम करीत आहे. दुग्ध व्यवसाय आज त्यांच्या परिवाराचा प्रमुख उर्दनिर्वाहाचे साधन बनले आहे. तसेच ते दुग्धव्यवसायाविषयी उपलब्ध असलेल्या साधनसमुग्री व कमी भांडवलामध्ये दुग्धव्यवसाय प्रशिक्षण, चारा निर्मिती व नियोजन याबाबत मार्गदर्शन करतात. आपल्या व्यवसायात त्यांनी केलेली प्रगती इतर युवकांना व शेतकऱ्यांना प्रेरणादायी अशीच आहे.

भाकड गाई उत्पादनक्षम

गायींचे संगोपन व्यवस्थित केले तर ती नियमित दूध देवू शकते. परंतू विदर्भात गायींच्या संगोपनाकडे शेतकरी नेहमीच दूर्लक्ष करतात. गाईला जंगलात सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत चरायला पाठवितात. याचा परिणाम तिच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे दूध कमी देते व भाकड होते. गायींची संख्या न वाढवता जास्त दूध देणाऱ्या जर्सी, होस्टेन व चांगल्या दूध देणाऱ्या देशी प्रजातीच्या गायी प्रत्येक शेतकरी कुटूंबांनी शेतीपुरक व्यवसायासाठी पाळाव्यात. याची जागृती अमरावती जिल्ह्यात रवि पाटील करत आहेत. आज चांदूर बाजार तालुक्यात शंभर शेतकरी गायीपासून दूधाचा व्यवसाय करत आहेत.

3 comments:

  1. good story pl mala ravi patil yancha contact no milu shakel ka ?
    manohar patil
    nashik 9881786561

    ReplyDelete
  2. लय भारी वाटलं भाऊ मला पण दुग्ध व्यवसाय सुरू करायचा आहे तुमच्या गाईड लाईनची आवश्यकता आहे pls मदत करा

    ReplyDelete
  3. Mobile number. 8655336523

    ReplyDelete

Popular Keywords

“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद