Tuesday, August 30, 2011

निश्चयाचे बळग्रामीण भागातील आणि तेदेखील शेतकरी असलेल्या तरुणाच्या हातात लॅपटॉप आणि मोबाईल पाहिल्यावर आश्चर्य वाटणं स्वाभाविक आहे. रत्नागिरी जिल्ह्यात लांजा तालुक्यातील खरवसे गावातील मिलींद माने या तरुण शेतकऱ्याला भेटल्यावर एखाद्या इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्याला भेटल्यासारखं वाटतं. कॉलेजिअन तरुणाची वेशभूषा, हातात लॅपटॉपची बॅग, अंगात कोट, बाईकवर स्वारी...त्यांचा दुसरा सहकारी प्रविण जेधे मात्र पारंपरिक कोकणी वेषात...बनिअन आणि हाप पँट..तिसरे शरद चव्हाण मात्र शेतीवर काम करणारे वाटतात. तिघांची भेट घेतल्यावर वेगवेगळ्या क्षेत्रातील त्यांच्या क्षमतेमुळे त्यांनी उभा केलेला 'प्रभात ऍ़ग्रोटेक' हा कृषि प्रकल्प यशस्वी झाल्याचं लक्षात आलं.

खरं तर हे तिन्ही राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात व्यस्त राहणारे. प्रत्येकाची राजकीय विचारधारा वेगळी. मात्र कोकणातल्या लाल मातीत राबताना एकत्रितपणे घाम गाळून ओसाड माळरानावर पीक घेण्याचा निश्चय यांनी २००८ मध्ये केला. तत्पूर्वी सरपंच असलेल्या माने आणि चव्हाण यांनी ग्रीन हाऊस प्रकल्प करून पाहिला. त्यात त्यांना यश आले नाही. मात्र त्यांची धडपड पाहून त्यांचा तिसरा मित्र जेधे त्यांच्या मदतीला आला. कोकणात शेतीसाठी मोठी जमीन मिळणे फार कठीण असते. अशावेळी जेधे यांच्या परिवाराने भाडेपट्टयाने या तिघांना शेती करण्यासाठी जमीन दिली.

एकूण १५ एकर जमिनीवर तिघांनी कष्ट घेण्यास सुरुवात केली. शेतातून विजेची लाईन जात असल्याने स्पार्किंगमुळे पीक जळण्याचे प्रकार वारंवार होत. त्यामुळे कायम ओले राहील असे केळीचे पीक घेण्याचा निश्चय त्यांनी केला. कोकणात केळीचे पीक घेणे अत्यंत जिकीरीचे आहे. अत्यंत सुक्ष्म नियोजन आणि व्यवस्थापन केल्याशिवाय फायद्याची शेती करणे कठीण असते. तरीही बाजारातील केळीची मागणी लक्षात घेऊन या पिकाकडे या तिघांनी लक्ष घातले. 'रत्नागिरी जिल्ह्याची एकूण मागणी ४ हजार ट्रकची असताना केवळ २०० ट्रक उत्पादन होते' माने पिकाची निवड करण्यामागचं लॉजिक स्पष्ट करतात...

...प्रारंभी शेतात वाढलेले तण रसायनांची फवारणी करून जाळण्यात आले. त्यानंतर जमिनीची शास्त्रीय पद्धतीने मशागत करण्यात आली. कृषि विज्ञान केंद्राचे प्रा.परुळेकर, विजय दळवी आणि कोकण कृषि विद्यापीठाचे संचालक ए.जी.पवार या तिघांचे सुरुवातीच्या काळात बरेच मागदर्शन मिळाले. शेतीतील सुक्ष्म बाबी त्यामुळे शिकता आल्याचे चव्हाण सांगतात. काही गोष्टी अनुभवाने शिकविल्या. एप्रिल २००९ मध्ये पहिली लागवड करण्यात आली. पहिल्याच पिकाला फयान वादळाचा तडाखा बसला. मात्र या तिघांचा निश्चय कायम राहिला आणि शेतीची कामे नव्या उमेदीने सुरू केली.

केळीचे पीक घेताना कोकणातील हवामान लक्षात घेतल्यास होणाऱ्या नुकसानीचा एकूण व्यवसायावर परिणाम होऊ नये म्हणून लहान क्षेत्रात सिझन प्रमाणे कलिंगड, हळद, भेंडी, मका आदी पिके घेतल्याने या व्यवसायात आर्थिक स्थैर्य लवकर मिळाले. पहिले पीक ३२० टन मिळाले आणि केळीला ६ रुपये भाव मिळाला. त्यानंतर मात्र या तिघांनी मागे वळून पाहिले नाही. शेतीची विपणनासह सर्व कामे स्वत:च पाहत असल्याने त्यापासून मिळणाऱ्या फायद्यात दिवसेंदिवस वाढच होत आहे.

आता तिसरे पीक हातात आले आहे. केळीचे घड अठरा एकर क्षेत्रावर लागलेले दिसतात. शेतीची रचना करताना अंतर्गत रस्ते तयार केल्यामुळे मजुरांवर होणारा खर्च कमी झाला आहे. केळी पिकाचे व्यवस्थापन शिकण्यासाठी जळगाव येथे जाऊनही या शेतकऱ्यांनी सूक्ष्म अभ्यास केला आहे. मात्र कोकणच्या हवामानात केळीचे पीक चांगले येण्यासाठी संशोधनाची गरज असल्याचे ते सांगतात. सामुहिक पद्धतीने शेती केल्याने शेतीची कामे आणि विक्रीच्या संदर्भात निर्णय घेताना फायदा होत असल्याचा त्यांचा अनुभव आहे.

या शेतकऱ्यांच्या यशामुळे परिसरातील इतरही शेतकरी शेताची माहिती घेण्यासाठी येतात. कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विजय मेहता यांच्यासह अनेक मान्यवरांनी शेतीला भेट देऊन या तरुण शेतकऱ्यांचे कौतुक केले आहे. कोकणातील शेतकऱ्यांनी नव्या तंत्राचा वापर केल्यास कोकणात यशस्वी शेती करता येईल, असा त्यांचा विश्वास आहे. शेतात शेततळे करण्यात आले आहे. ठिबक सिंचनाची सोयदेखील करण्यात आली आहे. संपूर्ण शेतीला यांत्रिक पद्धतीने ठिबकच्या सहाय्याने पाणी दिले जाते. शेतात पॅकिंग शेड तयार करण्याचा प्रस्तावही मंजूर झाला आहे. वर्षाला २२ लाखापर्यंत उलाढाल होत आहे. शेतातील ही प्रगती इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शक आहे.

'केळीला लोकल मार्केटमध्ये डिमांड आहे. एक-दीड वर्षात रिटर्नस् मिळतात. क्लायमेट आणि मार्केटला व्हायेबल आहे' एखाद्या सराईत व्यवस्थापकाप्रमाणे माने शेतीची उत्साहाने माहिती देतात. त्याचबरोबर त्यांच्या सामाजिक जबाबदारीला जराही धक्का न लावता शेतीकडे लक्ष दिले जात असल्याचे ते आवर्जुन सांगतात. प्रत्येकाने आपली जबाबदारी वाटून घेतली आहे. निर्णय मात्र सामुहिक पद्धतीने घेतले जात असल्याने शेती दिवसेंदिवस अधिकच फुलते आहे. निश्चयाच्या बळाने या तिघांना यशाच्या वाटेवर पुढे नेलं एवढं मात्र निश्चित!

No comments:

Post a Comment

Popular Keywords

“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद