नागपूर जिल्ह्यातील नागपुरी संत्राला जगभरात मानाचे स्थान आहे. संत्र्याचे उत्पादन या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होते. परंतु गेल्या काही दिवसापासून संत्रा झाडावर फायटोपथोरा ही बुरशी चढत असल्यामुळे संत्र्याच्या उत्पादनाला ग्रहण लागले आहे. यामुळे संत्रा उत्पादक हवालदिल झाला आहे. संत्र्याला वाचविण्यासाठी कृषी खात्याने संत्रा शेतीशाळा घेऊन बुरशीचे ग्रहण हटविण्याचा आटोकाट प्रयत्न कृषी खात्यातर्फे होत आहे.
जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यात असलेल्या घोराड या गावी सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात संत्रा पिकाचे क्षेत्र ६० हेक्टर आर. निवडण्यात आले. या परिसरात असलेल्या गावांची निवड संत्रा शेतीशाळेसाठी करण्यात आली. या गावातील ३० शेतकऱ्यांची शेतीशाळेसाठी निवड करण्यात आली.
प्रामुख्याने संत्रा पिकावर होणारा अवाढव्य खर्च कसा कमी करता येईल, यादृष्टीने प्रयत्न करण्यात आले. यासाठी रासायनिक व सेंद्रिय पद्धतीच्या माध्यमातून एकात्मिक संत्रा फळझाडाचा विकास कसा करणे शक्य आहे. यासाठी नियोजन करण्यात आले. यासाठी बहरात येणारा अंबिया बहार लक्षात घेऊन नोव्हेंबर महिन्यात भिमराव गंगाराम डेरे यांची १०० संत्रा झाडे असलेली बाग निवडण्यात आली.
भिमराव गंगाराम डेरे यांच्या शेतातील ५० टक्के झाडे फायटोपथोरा व ढिंक्याने ग्रस्त असलेल्या संत्रा झाडांचे पुरुर्जिवन करण्याचे ठरविण्यात आले. झाडाची छाटनी त्या प्रमाणात करण्यात आली. दिवसेंदिवस जमिनीमधील जिवाणुंचे कमी होणारे अल्पप्रमाण लक्षात घेऊन सुपिकता कायम ठेवण्याच्या हेतूने संत्रा बागायतदारांना कमी खर्चात जिवाणुंची वाढ करण्यासंदर्भात जिवामृत व घनजिवामृत तयार करण्याचे प्रात्याक्षिक या संत्रा शेतीशाळेत दाखविण्यात आले.
कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे मित्र कीडींची संख्या वाढविण्यासाठी कमी खर्चामध्ये दशपर्मी अर्क, निमअर्क तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. शेणखताचा वापर करतांना एस-९ कल्चर तयार करण्याची पद्धती, शेतकऱ्यांना समजावून देण्यात आली. बहुतेक शेतकरी मोकाट पद्धतीने झाडांना पाणी देत असल्यामुळे रोगाचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. हे टाळण्यासाठी पाणी देण्याची पद्धत व नियोजन यावरही विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे शेतकऱ्यांना सांगण्यात आले.
शेतकऱ्यांनी संत्रा फळाचे दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात, याचेही मार्गदर्शन या शेतीशाळेत कृषी अधिकाऱ्यामार्फत देण्यात येते. संत्रा दलालामार्फत न विकता तो पॅकींग करुन विकल्यास संत्राला जास्त भाव मिळेल, याचीही जाणीव संत्रा उत्पादकांना करून देण्यात येते. अशा प्रकारच्या शेतीशाळा जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गात घेण्यात येतात. मग ते देवलापारचे आदिवासी शेतकरी महांग्या सुकलू सिरसाम असो किंवा पथराईचे चिंतामण श्रावण दिवटे असो. त्यांना या संत्रा शेतीशाळेचा लाभ झाला आहे. त्यांच्या संत्रा बागेत उत्कृष्ट दर्जाच्या संत्राचे उत्पादनही झाले. व संत्रा झाडांना नवे जीवनही मिळाले.
No comments:
Post a Comment