Tuesday, January 31, 2012

माझ्या मामाचा गाव

'मामा' या शब्दातच स्नेह दडला आहे आणि गावाचं आणि निसर्गाचं नातंही जवळचं. गुहागर तालुक्यातील मुंढर या गावातल्या समीर साळवी यांच्या कृषी पर्यटन केंद्रावर गेल्यावर या दोन्ही शब्दातला अर्थ मूर्त रुपाने समोर दिसतो आणि गावाकडच्या या अद्भूत दुनियेत पर्यटक आनंदाने रमतो. 'फळबागांची शोभा पाहुया, मामाच्या गावाला जाऊ या..' असे म्हणतच जणू तो इथून परत फिरतो.

मुंढर हे गाव गुहागरपासून साधारण २० किलोमीटर अंतरावर आहे. गुहागरहून चिपळूणकडे जाताना चिखली गाव ओलांडल्यावर डावीकडे मुंढर फाटा लागतो. या गावात गेल्यावर उजव्या बाजूला असलेला 'माझ्या मामाचा गाव' असा फलक आपले लक्ष आकर्षून घेतो. मोकळ्या माळरानातून पुढे जात निसर्गरम्य परिसरात आपण येऊन पोहचतो. समोरच दिसणारी नारळाची झाडं आपलं स्वागत करतात. बाजूला चार-पाच मांजरी लाडीकपणे जवळ येऊन जणू तुम्ही तिथे आल्याचा आनंद व्यक्त करत असतात. हवेची थंड झुळूक प्रवासातला थकवा घालवते. साळवी दाम्पत्याने केलेल्या स्वागतानं तुम्ही काही वेळातच 'आपलं गाव' विसरून 'मामाच्या गावात' रमता.

सेवानिवृत्त मुख्याध्यापकाने घडविली कृषी क्रांती


उद्यमशीलता आणि एखादी गोष्ट करायचीच या ध्येयाने कार्य करणारी व्यक्ती अशक्य ते शक्य करण्याची किमया साधू शकते. यवतमाळ जिल्ह्यात या ध्येयाने झपाटलेल्या अनेक शेतकऱ्यांनी कृषी किमया साधली आहे. दारव्हा तालुक्यात बोरीअरब पासून काही अंतरावर असलेल्या हातगावचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक रामगीर गिरी हे याचे एक उत्तम उदाहरण आहे. त्यांनी परिश्रमाच्या जोरावर आपल्या शेतात क्रांती घडविली आहे. 
पारंपरिक शेती पद्धतीला फाटा देत या किमयागार शेतकऱ्याने हळद, ऊस व केळीच्या लागवडीतून समृद्धी आणली आहे. आज या शेतकऱ्याने घडविलेली हरितक्रांती बघण्यासाठी हातगावमध्ये शेतीतज्ज्ञांची रेलचेल पाहावयास मिळते.

Sunday, January 29, 2012

मातीचे वरदान

प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी परिश्रमाची शिदोरी उपयोगी पडते. मातीशी इमान राखून केलेल्या कष्टामुळे शेतकऱ्याला मातीतून सोने पिकविता येते. त्याला मिळालेली संपत्ती, मान सन्मान हे त्या मातीचेच वरदान असते. असेच वरदान लाभलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातीन नाणीज गावच्या चंद्रकांत इरमल या शेतकऱ्याचा शेतकरी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आलाय.

गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या इरमल यांचे शिक्षण कठीण आर्थिक परिस्थितीमुळे होऊ शकले नाही. वडिलोपार्जित शेती सहा एकर होती. मात्र पारंपरिक पद्धतीने शेती करताना कुटुंबाचे पालनपोषण करणेही तसे जडच होते. शिवणकला शिकून सुरू केलेला व्यवसायही गावात फारसा प्रतिसाद न मिळाल्याने पुढे चालू शकला नाही. मात्र अशाही परिस्थितीत हार न मानता त्यांनी शेतीकडे लक्ष देण्यास सुरूवात केली.

केशरी यश


विस्तीर्ण भूभागावर पसरलेली आंब्यांची फळबाग...बाहेरच्या बाजूस छानसा बंगला... छोटंसं कार्यालय आणि कार्यालयात संगणक आणि लॅपटॉपवर दोन शेतकरी भावंडं आंब्यांच्या विपणनाबाबत माहिती पाहून आपसात चर्चा करत आहेत... पारंपरिक 'शेतकरी' या संकल्पनेला बाजूला सारून नव्या युगातील तंत्रज्ञानाला सोबत घेऊन यशाचे अनेक टप्पे सहजपणे पार करणाऱ्या हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्याच्या पावस येथील 'देसाई बंधूं'च्या फळबागेतील हे दृष्य... तंत्रज्ञानामुळे होणारे अनुकूल परिवर्तन आणि प्रक्रिया उद्योगाचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या बंधुंपैकी आनंद देसाई यांना नुकतेच उद्यानपंडीत पुरस्काराने सन्मानित केले आहे.

Monday, January 23, 2012

कोट्याधीश संत्रा उत्पादक


अमरावती जिल्ह्याच्या पुसला येथील प्रगतशील युवा शेतकरी राजेंद्र केदार यांनी चक्क ४ कोटी रुपयांची संत्री विकून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. अलिकडच्या काळात संत्रा व्यवसाय डबघाईस आला असताना केदार यांनी मिळविलेले हे यश मात्र लक्षवेधक ठरले आहे. 

केदार यांच्या शेतात जवळजवळ एक कोटी संत्रा फळे आहेत. यातील ५० लाख संत्री तोडून बाजारातही गेली आहेत. मागील काही दिवसांपासून संत्र्यांची तोडणी सुरु असून त्यासाठी २०० महिला पुरुष सतत राबत आहेत. 

राजेंद्र केदार यांनी अमरावती विद्यापीठातून गणित विषयात बी.एस्‍सी केले आहे. त्यांचे सात भावंडांचे कुटुंब असून यातील चार शासकीय सेवेत कार्यरत आहेत तर तीन भावंडं शेती करतात. उच्चशिक्षित असतानाही राजेंद्र यांनी शेतीची वाट धरली हे विशेष. 

स्वखर्चातून बनतोय शेतरस्ता


शेतीच्या विकासात जर कुठला सर्वात मोठा अडचणीचा प्रश्न असेल तर तो म्हणजे शेतरस्त्यांचा. गावागावात शेत रस्त्यांमुळे वाद उभे राहिलेली अनेक उदाहरणे ऐकायला मिळतात. वर्षानुवर्षे सुरु असलेली ही अडचण सोडविण्यासाठी बुलडाणा तालुक्यातील माळवंडी गावात एक नवा प्रयोग पुढे आला आहे. येथील शेतकऱ्यांनी स्वत: पुढाकार घेत शेतरस्ता बनविण्याचे काम हाती घेतले आहे.

माळवंडी ते मातला हा शेतरस्ता कागदोपत्री मोठा असला तरी येथे प्रत्यक्षात बैलगाडी जाईल एवढीच वाट राहिली आहे. वर्षानुवर्षे या रस्त्यावरुन जाताना शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. दरवर्षी खड्डे भरावे लागायचे. यासाठी खर्चही मोठा व्हायचा. 

नान्नजची द्राक्षे सातासमुद्रापलिकडे


नान्नज म्हटले की नजरेसमोर उभे राहते ते सोलापूर जिल्ह्यात द्राक्ष उत्पादनात अग्रेसर असलेले एक गाव. कै.नानासाहेब काळे आणि त्यांचे चिरंजीव कृषीभूषण दत्तात्रय काळे यांनी अथक परिश्रमातून द्राक्ष संशोधन आणि उत्पादनामध्ये जिल्ह्याची कीर्ती सातासमुद्रापलिकडे पोहोचविली आहे. 

नान्नजच्या कै.नानासाहेब काळे यांनी बारामतीहून १९५८ साली प्रथम बिया असलेल्या द्राक्षाचे वाण आणून त्याची लागवड केली. त्यावेळी जिल्ह्यात द्राक्षांच्या जाती विकसित झालेल्या नव्हत्या. त्यामुळे बिया असलेली द्राक्षेही चवीने खाल्ली जायची. परंतु बी विरहित द्राक्ष संशोधन करण्याचा कै.काळे यांनी ध्यास घेतला. त्यासाठी त्यांनी कॅलिफोर्नियात विकसित झालेल्या 'थॉमसन सिडलेस' या द्राक्षाच्या जातीचे वाण १९६४ साली बारामतीहून आणले. त्यावर सातत्याने संशोधन करून त्यांनी १९८० साली 'सोनाका' हे नवीन वाण शोधले. तर पुन्हा दहा वर्षानंतर १९९० साली 'शरद सिडलेस’चा उदय झाला. 

Wednesday, January 18, 2012

शेततळ्याच्या पाण्यावर भाजीपाल्याची शेती


कोरडवाहू शेती ही बहुतांशी पावसाच्या पाण्यावरच अवलंबून असते. पावसाच्या अनियमितेमुळे अशा शेतीमधून मिळणारे उत्पन्न हे खात्रीशीर राहत नाही. यावर सामूहिक शेततळ्याचा पर्याय शोधून पाण्याची सोय झाल्याने कोरडवाहू शेतीमधूनच अधिक आणि खात्रीशीर उत्पन्न घेण्याचा यशस्वी प्रयोग बुलढाणा जिल्ह्याच्या लोणार तालुक्यातील कुबेफळ येथील शेतकरी रामराव फड यांनी करून दाखविला आहे.

फड यांनी कोरडवाहू शेतीला पाण्याचा शाश्वत आधार देण्यासाठी सामूहिक शेततळे तयार केले. शेताशेजारी असणाऱ्या ओढ्यावर सिमेंट बंधारा बांधला. त्यामुळे पाण्याची पातळी वर आली आहे. बंधाऱ्यालगत ४४ बाय ४४ मीटर आकाराचे १ कोटी २० लाख लिटर क्षमतेचे शेततळे तयार केले. या शेततळ्याचा फड यांना मोठा फायदा झाला असून कमी कालावधीत येणारी भाजीपाल्याची शेती या शेततळ्याच्या पाण्यावर त्यांनी फुलवली आहे.

स्थापत्य अभियंत्याने फुलवली आल्याची शेती


गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुका हा धान उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. तथापि, धान उत्पादनाची शेती दिवसेंदिवस तोट्याची ठरत असल्याने शेतकरी वैफल्यग्रस्त होत आहेत. परंतु आधुनिक तंत्रज्ञान व अंगभूत सृजनात्मकता यांचा मेळ घालून अर्जुनी मोरगाव तालुक्यातील आदिवासी बहुल व नक्षलग्रस्त प्रतापगड भागातील बेरोजगार स्थापत्य अभियंता यशवंत सोपानराव गणवीर यांनी शेतीमध्ये आल्याच्या शेतीचा नवा प्रयोग यशस्वी करुन दाखविला आहे.
यशवंत गणवीर यांनी आपल्या शेतीत अन्य पीक घेण्याची संकल्पना आखून तीन एकर शेतीत लगेच आर्थिक प्राप्ती होईल अशी पिके घेण्याचे ठरविले. अडीच एकर शेतीत त्यांनी आल्याची लागवड करुन सुमारे २५ टन उत्पादन घेतले आणि इतरांसाठी आदर्श निर्माण केला. त्यांचा आत्मविश्वास त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिला. त्याबरोबरच अर्ध्या एकर शेतीत त्यांनी हायब्रीड चना, मिरची, वांगी, बीट, कोथिंबीर व अन्य पिकांची लागवड केली. यातून वर्षाला ५० हजाराचे उत्पन्न घेण्याचा त्यांचा मानस आहे.

रेशीम उद्योगाने दाखविली प्रगतीची वाट


परंपरागत शेतीबरोबरच रेशीमकोष निर्मितीचा नाविण्यपूर्ण उपक्रम राबवून सातारा जिल्ह्याच्या कराड तालुक्यातील शेणोली येथील तरुण शेतकरी दीपक लोंढे यांनी उत्पन्न वाढीबरोबरच शेतकऱ्यांना नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी आपल्या वडिलोपार्जित शेतीत परंपरागत शेतीपद्धतीबरोबरच नव्या पद्धतीने रेशीमकोष निर्मितीत यशस्वी पुढाकार घेतला आहे. 

लोंढे हे गेल्या दहा वर्षापासून रेशीम शेतीचा यशस्वी प्रयोग करीत आहेत. त्यांनी सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर रेशीम उद्योग उभारला. बघता-बघता यात यश मिळत गेले. या उद्योगात नाविन्यता टिकवून रेशीमकोष निर्मिती करताना सायकल पद्धतीचा अवलंब करण्यात आला. निव्वळ शेतपिके न घेता त्याला शेतीपूरक व्यवसायाची जोड देऊन शेतकऱ्यांच्या अर्थिक परिवर्तनाचा नवा विचार त्यांनी याद्वारे मांडला आहे. 

पीकपद्धती बदलून सुपनेत विविध प्रयोग


शेतीत सलग तीच तीच पिके घेतल्याने जमिनीची उत्पादन क्षमता कमी होते. त्यासाठी पिकात फेरपालट व पिकाच्या मुळी बदलाने जमिनीचा कस टिकून राहतो. हे तंत्र लक्षात आल्याने सातारा जिल्ह्याच्या कराड तालुक्यातील सुपने येथील शेतीनिष्ठ प्रकाश आकाराम पाटील यांनी त्यांच्या शेतात विविधांगी प्रयोगांचा राबता सुरु ठेवला आहे. 

गेल्या दहा वर्षापासून श्री.पाटील हे स्वीटकॉर्न या मक्याच्या प्रकाराचे यशस्वी उत्पादन घेत आहेत. ऊसात आंतरपिके, शास्त्रशुद्ध मशागती व उपलब्ध शेतीचा पुरेपूर वापर करण्यात ते आघाडीवर आहेत. दैनंदिन सामाजिक व राजकीय क्षेत्रातील धडपडीबरोबर त्यांनी शेतीशीही आपले नाते घट्ट ठेवले आहे. 

सुपने विभागात त्यांची शेतजमीन मध्यम काळ्या प्रतीची आहे. उत्पादनासाठी जमीन पोषक असली, तरी शेतकऱ्यांना पिके घेताना प्रचंड मेहनत व चिकीत्सकपणा ठेवावा लागतो. या विभागातील ज्येष्ठ नेते (कै.) आकाराम गणपती पाटील यांना शेतीची नस माहिती होती. त्यांनी पारंपरिक शेती व्यवसायात विक्रमी उत्पन्नाच्या माध्यमातून तालुक्यात शेती प्रगतीचा वेगळा पायंडा निर्माण केला होता. सातत्याने डोक्यात शेतीची प्रयोगशाळा राबविणाऱ्या विचाराचे त्यांचे चिरंजीव प्रकाश पाटील यांनीही तोच प्रयोग पुढे सुरू ठेवला आहे. 

कोयना नदीवरुन लिफ्टने पाणी आणून त्यांनी आठ एकर शेतीला पाणीपुरवठा केला आहे. शेतकरी नगदी पिकांच्या उत्पन्नासाठी सर्रास प्रयत्नशील असतात. मात्र, प्रकाश पाटील एखाद्या पिकाकडे नगदी भावनेने न पाहता ठरलेल्या गणितानुसार उत्पन्न घ्यायचा जीव ओतून प्रयत्न करतात व नंतर त्या पिकात फेरपालट करतात. फेरपालट करताना पिकाची मुळी बदलण्यासाठीही त्यांचा विशेष प्रयत्न असतो. प्रत्येक वेळी जमिनीची पोत जाणून घेऊनच ते नवी पिके घेतात. त्याबरोबर हवामानाच्या अंदाजालाही त्यांनी महत्त्व दिले आहे. 

गेल्या दहा वर्षांपासून शेतीतील विविध ठिकाणी आलटून पालटून ते स्वीटकॉर्नचे उत्पन्न घेत आहेत. पिकासाठी सर्वार्थाने प्रयत्न करायचे, नंतर त्या प्रयत्नातून उत्पन्नाचे गणित मांडायचे व ठराविक उत्पन्नाची हमी घ्यायची हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. मक्यातून गुंठ्यास एक हजार रुपये उत्पन्न घेण्यात त्यांनी आघाडी ठेवली आहे. 

खरीपाच्या हंगामात ते बीजप्रक्रिया करुन सोयाबीन व भुईमुगाचे उत्पन्न घेतात. त्या पिकात घरखर्चासाठी मिरचीचे आंतरपीक घेण्याची त्यांची प्रथा आहे. त्यानंतर सुरु हंगामातील ऊसाच्या लागणी घ्यायच्या व त्यामध्येही मिरचीचे आंतरपीक घ्यायचे. ऊसातून एकरी पावणेदोन ते दोन टन उत्पन्न घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राहत्या घरालगतच त्यांचे गुऱ्हाळघर आहे. गुऱ्हाळ बंद झाल्यानंतर त्यालगतच्या शेतजमिनीत मशागत करुन ते स्वीटकॉर्नचे उत्पन्न घेतात. त्यांनतर दसरा सणाचा अंदाज घेऊन झेंडू फुलांचे उत्पन्न घेण्याची त्यांची परंपरा आहे. झेंडूच्या दोन ते अडीच महिन्यांच्या कालावधीत गुंठ्यास सातशे ते एक हजार रुपये उत्पन्न त्यांनी घेतले आहे. 

चार ते पाच फुटांचे अंतर ठेवून दोनआड ऊसाच्या पट्टा पद्धतीबरोबर त्यात हरभरा, लसूण व मिरचीची आंतरपिके त्यांनी घेतली आहेत. सोळा टक्के ब्रीक्स (गोडी) असणाऱ्या तैवानच्या कलिंगडाचे तालुक्यात प्रथमच त्यांनी मल्चिंग पद्धतीतून उत्पादन घेतले होते. त्यातून तीन महिन्यात तीस गुंठ्यांत ४७ हजारांचे उत्पन्न मिळाले होते. तसेच टरबूज, भात, देशी केळी, गव्हाचेही यशस्वी प्रयोग त्यांनी आतापर्यंत केले आहेत.

मुख्य पीक निघाल्यानंतर त्या शेताची जुळून नांगरट करायची, दोन वर्षांच्या फेऱ्यातून एकरी सात ट्रेलर शेणखत घालून शेताला विश्रांती द्यायाची व त्या वेळेत उपलब्धतेनुसार मेंढरांचे वाढे बसवण्याची त्यांची मशागत पद्धत आहे. एखाद्याने त्यांच्या शेतावर यावे आणि विविध प्रयोगांचा राबता पाहून केवळ शेतीच्या अभ्यासात गुंतावे, असे त्यांच्या शेतावरील फेरीतून जाणवते. त्यांची ही पद्धत शेतकऱ्यांसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरणारी आहे.

ऊसाला पर्याय अद्रक शेतीचा


ऊसाची शेती ही सधन शेती म्हणून ओळखली जाते. सध्या या पिकावर अशाश्वत भावाचे आलेले संकट पाहिले तर ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र ऊसाला पर्याय म्हणून आता आल्याची (अद्रक) शेती हा पर्याय पुढे येत असून सोलापूर जिल्ह्यात माढा तालुक्यातील वाकाव येथे अनिल मगर या वाणिज्य शाखेतील पदवीधर शेतकऱ्याने हा प्रयोग यशस्वी करून दाखविला आहे.

स्वत:च्या शेतीमध्ये 12 एकर क्षेत्रात ऊसाची लागवड केलेली असताना देखील आल्याच्या पिकाकडे वळण्याचे कारण सांगताना मगर म्हणाले की, ऊसाच्या लागवडीपासून विजेची समस्या, मजुरांची टंचाई या समस्यांना सामोरे जात असताना तो कारखान्यात जाईपर्यंत जीवात जीव नसायचा. शिवाय, टनेज वाढविण्यासाठी तळहाताच्या फोडाप्रमाणे ऊसाची जोपासना करावी लागते आणि भाव किती द्यायचा, हे कारखान्याच्या हातात! त्यामुळे हे कुठेतरी थांबले पाहिजे, असा विचार मनात आला. पंढरपूर तालुक्यात कान्हापुरी परिसरात मोठ्या प्रमाणात आल्याचे पीक घेतले जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर तिथे जाऊन या पिकाची माहिती घेतली आणि सुरुवातीला दोन एकर क्षेत्रात आल्याची लागवड करण्याचा निर्णय घेतला.

Thursday, January 12, 2012

आठ एकरात डाळिंबाचे ७० टन उत्पादन


सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्यातील राजाळे जवळच्या बिरदेवनगर (जाधववाडी) हद्दीत आठ एकर क्षेत्रातून विनायक मनोहर नामजोशी यांनी भगव्या जातीच्या डाळिंबाचे ७० टन उत्पादन घेण्यात यश मिळविले आहे. 

श्री. नामजोशी हे फलटण संस्थानाचे भूतपूर्व अधिपती श्रीमंत मालोजीराजे नाईक-निंबाळकर यांचे नातू आहेत. ते शेती पिकविण्यात आनंद मानतात. त्यांनी येथील शेतील ऊस पीक घेतले आहे, तर बिरदेवनगर (जाधववाडी) हद्दीतील जमिनीचे दर गगनाला भिडलेले असताना त्यांनी १३ एकर क्षेत्रात डाळिंब पीक घेणे पसंत केले आहे. 

मत्स्यबीजोत्पादनात सातारा आघाडीवर..


सातारा जिल्ह्याने मत्स्यबीजोत्पादनात पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये आघाडी घेतली आहे. मार्च अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात ३ कोटी १२ लाख मत्स्यबीजांचे उत्पादन केवळ सातारा जिल्हयात झाले असून, ३०० मे. टन मत्स्योत्पादन करण्यात आले आहे. मत्स्योत्पादनामुळे १९ लाख ६० हजार ६२८ रुपयांचा महसूल जिल्ह्याला मिळाला आहे.

पावसाळ्यात जून-जूलै महिना माशांच्या प्रजोत्पादनाचा (ब्रिडिंग) हंगाम आहे. जिल्ह्यातील धोम मत्स्यबीज केंद्रात मत्स्य विभागाच्या वतीने माशांना इंजेक्शन देण्यात येते. त्यानंतर हे मासे अंडी घालतात व त्यापासून तयार होणारी मत्स्यबीजे धरून ती धोम तलावात साठवून त्यापासून बोटुकली व मत्स्योत्पादन घेतले जाते.

Friday, January 6, 2012

शेतात उमलले समृध्‍दीचे फूललहरी निसर्गावर अवलंबून राहत कापूस आणि सोयाबीन यांची परंपरागत शेती करण्‍यापेक्षा फूलशेतीचा वेगळा पर्याय निवडणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत नाही. ती शेती फायद्याची ठरते, असे यशस्‍वी प्रयोगाअंती वर्धा जिल्‍ह्यामधील सेलू तालुक्‍यातील वाहिदपूर गावच्‍या संजय अवचट यांनी दाखवून दिले आहे.

श्री. अवचट हे पॉलिहाऊस उभारुन तेथे जरबेरा या जातीच्या फुलाचे उत्पादन घेत आहेत. त्यांनी सेलूच्या बँक ऑफ इंडियाकडून ९.७५ लक्ष रुपयांचे कर्ज घेतले. त्यामध्ये अनुदान ३.१५ लक्ष रुपये मिळाले. एकूण १३ लक्ष १२ हजार रुपयांमध्ये पॉलिहाऊसची उभारणी करण्यात आली. या पॉलिहाऊसचे आकारमान ३६ × २८ चौ.मी. असून जरबेरा जातीच्या फोर्जा, बॅलेट, प्राईम रोज, गोलीमय, दाना ऐलीन, इन्सरन्स मनीबलू या फुलांचे उत्पादन घेण्यात येते.

Popular Keywords

“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद