पावस हे गाव स्वामी स्वरुपानंदांच्या स्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणून ओळखले जाते. याच गावात आंबा उत्पादन व्यवसायात देसाई कुटुंबाची ही चौथी पिढी काम करत आहे. कै.भाऊराव देसाई यांचे कराची येथे आंब्याचे दुकान होते. मात्र एका वेळेस बोटीने आंबे उशिरा पोहचल्याने व्यवसायात झालेल्या नुकसानामुळे व्यवसाय बंद करून ते नागपूरला आले. काही काळानंतर पुणे येथे त्यांनी आंब्याची वखार काढली. वखारीत आंबा मोठ्या प्रमाणात उरल्याने त्यावर पर्यायी मार्ग म्हणून केलेल्या आंबा प्रक्रियेचा प्रयोग यशस्वी झाल्यावर त्यांनी १९७६ मध्ये आंबा कॅनिंग फॅक्टरी काढली. आनंद यांचे वडील जयंत देसाई बीकॉम नंतर सीए होण्यासाठी मुंबईला जाणार होते. मात्र स्वामी स्वरुपानंद यांच्या इच्छेनुसार ते कोकणातच स्थायिक झाले आणि इथेच आंबा व्यवसाय बहरू लागला.
आंबा व्यवसायाची परंपरा वडिलोपार्जित असली तरी आनंद यांनी त्यात विशेष लक्ष घालून या व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञान आणि विपणनातल्या उत्तम नियोजनाची जोड दिली. वडिलांनी दूरदृष्टीने आनंद यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठात बीएस्सी हॉर्टीकल्चर आणि लहान भाऊ अमर यांना बँकॉक येथे बीएस्सी फूड टेक्नॉलॉजी विषयाच्या शिक्षणासाठी पाठविले. शास्त्रोक्त पद्धतीचे शिक्षण घेतल्यानंतर आनंद यांनी सुधारित पद्धतीने फळबागेचे व्यवस्थापन करण्यासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग केला आणि त्यात ते यशस्वी झाले.
त्यांनी आंबा कलमांची लागवड करून सुमारे १५० एकर क्षेत्रावर सिंचनाची सोय करून घेतली. हवामानातील बदलाप्रमाणे कीटकनाशके आणि बुरशी नाशकांची फवारणी केल्याने औषधांचा खर्च कमी झाला. माती परिक्षणानंतर सेंद्रीय खतांचा वापर केल्याने जमिनीचा पोत सुधारण्यासही मदत झाली. त्यामुळे चांगले उत्पादन मिळू लागले. आंब्यासाठी लाकडी पेट्यांचा वापर होत असल्याने आंबा खराब होण्याबरोबर खर्चही वाढत असे. त्याऐवजी आनंद यांनी क्रेटचा वापर सुरू केला. त्यांनी १५ ते १७ प्रकारच्या आंब्याच्या जाती बागेमध्ये लावल्या. त्यात सर्वाधिक मागणी असलेला पायरीसह सुवर्णरेखा, दूधपेरा, गोवामाणपूर आदी विविध जातींचा समावेश आहे. आंबा निर्यातीसाठी आवश्यक ग्लोबल गॅप सर्टिफिकेट मिळविल्याने 'देसाई बंधूंचा' आंबा जपानमध्ये जाऊ लागला.
भावाच्या मदतीने त्यांनी आपल्या फळबागेचा विस्तार तीनशे एकरपर्यंत वाढविला आहे. आंब्याचे मोठ्या प्रमाणावर होणारे उत्पादन लक्षात घेऊन त्यांनी देसाई प्रॉडक्टस् नावाची कॅनिंग फॅक्टरी सुरू केली. सुरुवातीला असलेली पाच टन माल बनविण्याची क्षमता आता १४ टनांपर्यंत पोहोचली आहे. या फॅक्टरीत उत्तम व्यवस्थापन केल्याने त्यांना आयएसओ ९००१ आणि आयएसओ - २२००० प्रमाणपत्रदेखील मिळाले. गुणवत्तेचे निकष पाळताना मँगो पल्प, अमृत कोकम, कैरी छुंदा, कैरी पन्हे, आंबा मावा आदी विविध उत्पादने तयार करून बाजारात ते लोकप्रिय करण्यात आनंद यांना यश आले आहे.
या फॅक्टरीतील मँगो पल्प अमेरिका, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर आदी देशात निर्यात होत आहे. उत्तम व्यवस्थापनाद्वारे फॅक्टरीचे कामकाज चालविताना फळबाग अधिक विकसित करण्याकडे त्यांनी सातत्याने लक्ष दिले आहे. कृषी आधारित उद्योगातून त्यांनी स्थानिक पातळीवर अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. आपल्या अभ्यासू वृत्तीमुळे त्यांनी आंब्याच्या विविध पैलूंची माहिती एकत्र करण्यावर सातत्याने भर दिला आहे. २००२ मध्ये चीन, जपान, तैवान आणि हाँगकाँग आदी देशांना भेट देऊन त्यांनी व्यवसायाच्या विविध पैलूंचा अभ्यास केला. या सर्व ज्ञानाचा उपयोग करून देसाई प्रॉडक्टस् नावारुपाला आणण्याची कामगिरी प्रक्रिया उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्यांना प्रेरक आणि मार्गदर्शक ठरली आहे.
देसाई यांच्या कार्याची दखल देशपातळीवर घेण्यात आली आहे. त्यांना लखनऊ येथील ऑल इंडिया मँगो शो आणि कोलकाता येथील मँगो महोत्सवात अनेक विभागात पारितोषिके मिळाली आहेत. डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या आबासाहेब कुबल पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला आहे. हापूस आंबा उत्पादनासाठी प्रक्रियेत आवश्यक बदलाबाबत त्यांनी अनेक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करताना बागायतदारांनी प्रक्रिया उद्योगाकडे वळल्यास व्यवसायात अधिक लाभ होईल, असे ते सांगतात. त्यांचे अनुभव आणि परिश्रम यामुळे त्यांच्या शब्दात असणारा विश्वास त्यांच्या बोलण्यातून जाणवतो.
'देसाई बंधू आंबेवाले' असा नावलौकीक मिळविणाऱ्या देसाई कुटुंबियांच्या या यशामागे वर्षानुवर्षाचे परिश्रम आणि अभ्यास आहे. प्रत्येक कामात सूक्ष्म नियोजन केल्यास त्याचे परिणाम उत्तमच येतात, हे सूत्र देसाई बंधूंच्या यशातून समोर येते. केवळ फळबागेचा विस्तार महत्त्वाचा नाही तर उत्पादन बाजारापर्यंत पोहचून त्याद्वारे हातात त्याचा मोबदला येईपर्यंत प्रत्येक टप्प्यात नियोजन महत्त्वाचे आहे हे त्यांनी आपल्या यशातून दाखवून दिले आहे.