Wednesday, January 18, 2012

पीकपद्धती बदलून सुपनेत विविध प्रयोग


शेतीत सलग तीच तीच पिके घेतल्याने जमिनीची उत्पादन क्षमता कमी होते. त्यासाठी पिकात फेरपालट व पिकाच्या मुळी बदलाने जमिनीचा कस टिकून राहतो. हे तंत्र लक्षात आल्याने सातारा जिल्ह्याच्या कराड तालुक्यातील सुपने येथील शेतीनिष्ठ प्रकाश आकाराम पाटील यांनी त्यांच्या शेतात विविधांगी प्रयोगांचा राबता सुरु ठेवला आहे. 

गेल्या दहा वर्षापासून श्री.पाटील हे स्वीटकॉर्न या मक्याच्या प्रकाराचे यशस्वी उत्पादन घेत आहेत. ऊसात आंतरपिके, शास्त्रशुद्ध मशागती व उपलब्ध शेतीचा पुरेपूर वापर करण्यात ते आघाडीवर आहेत. दैनंदिन सामाजिक व राजकीय क्षेत्रातील धडपडीबरोबर त्यांनी शेतीशीही आपले नाते घट्ट ठेवले आहे. 

सुपने विभागात त्यांची शेतजमीन मध्यम काळ्या प्रतीची आहे. उत्पादनासाठी जमीन पोषक असली, तरी शेतकऱ्यांना पिके घेताना प्रचंड मेहनत व चिकीत्सकपणा ठेवावा लागतो. या विभागातील ज्येष्ठ नेते (कै.) आकाराम गणपती पाटील यांना शेतीची नस माहिती होती. त्यांनी पारंपरिक शेती व्यवसायात विक्रमी उत्पन्नाच्या माध्यमातून तालुक्यात शेती प्रगतीचा वेगळा पायंडा निर्माण केला होता. सातत्याने डोक्यात शेतीची प्रयोगशाळा राबविणाऱ्या विचाराचे त्यांचे चिरंजीव प्रकाश पाटील यांनीही तोच प्रयोग पुढे सुरू ठेवला आहे. 

कोयना नदीवरुन लिफ्टने पाणी आणून त्यांनी आठ एकर शेतीला पाणीपुरवठा केला आहे. शेतकरी नगदी पिकांच्या उत्पन्नासाठी सर्रास प्रयत्नशील असतात. मात्र, प्रकाश पाटील एखाद्या पिकाकडे नगदी भावनेने न पाहता ठरलेल्या गणितानुसार उत्पन्न घ्यायचा जीव ओतून प्रयत्न करतात व नंतर त्या पिकात फेरपालट करतात. फेरपालट करताना पिकाची मुळी बदलण्यासाठीही त्यांचा विशेष प्रयत्न असतो. प्रत्येक वेळी जमिनीची पोत जाणून घेऊनच ते नवी पिके घेतात. त्याबरोबर हवामानाच्या अंदाजालाही त्यांनी महत्त्व दिले आहे. 

गेल्या दहा वर्षांपासून शेतीतील विविध ठिकाणी आलटून पालटून ते स्वीटकॉर्नचे उत्पन्न घेत आहेत. पिकासाठी सर्वार्थाने प्रयत्न करायचे, नंतर त्या प्रयत्नातून उत्पन्नाचे गणित मांडायचे व ठराविक उत्पन्नाची हमी घ्यायची हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. मक्यातून गुंठ्यास एक हजार रुपये उत्पन्न घेण्यात त्यांनी आघाडी ठेवली आहे. 

खरीपाच्या हंगामात ते बीजप्रक्रिया करुन सोयाबीन व भुईमुगाचे उत्पन्न घेतात. त्या पिकात घरखर्चासाठी मिरचीचे आंतरपीक घेण्याची त्यांची प्रथा आहे. त्यानंतर सुरु हंगामातील ऊसाच्या लागणी घ्यायच्या व त्यामध्येही मिरचीचे आंतरपीक घ्यायचे. ऊसातून एकरी पावणेदोन ते दोन टन उत्पन्न घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राहत्या घरालगतच त्यांचे गुऱ्हाळघर आहे. गुऱ्हाळ बंद झाल्यानंतर त्यालगतच्या शेतजमिनीत मशागत करुन ते स्वीटकॉर्नचे उत्पन्न घेतात. त्यांनतर दसरा सणाचा अंदाज घेऊन झेंडू फुलांचे उत्पन्न घेण्याची त्यांची परंपरा आहे. झेंडूच्या दोन ते अडीच महिन्यांच्या कालावधीत गुंठ्यास सातशे ते एक हजार रुपये उत्पन्न त्यांनी घेतले आहे. 

चार ते पाच फुटांचे अंतर ठेवून दोनआड ऊसाच्या पट्टा पद्धतीबरोबर त्यात हरभरा, लसूण व मिरचीची आंतरपिके त्यांनी घेतली आहेत. सोळा टक्के ब्रीक्स (गोडी) असणाऱ्या तैवानच्या कलिंगडाचे तालुक्यात प्रथमच त्यांनी मल्चिंग पद्धतीतून उत्पादन घेतले होते. त्यातून तीन महिन्यात तीस गुंठ्यांत ४७ हजारांचे उत्पन्न मिळाले होते. तसेच टरबूज, भात, देशी केळी, गव्हाचेही यशस्वी प्रयोग त्यांनी आतापर्यंत केले आहेत.

मुख्य पीक निघाल्यानंतर त्या शेताची जुळून नांगरट करायची, दोन वर्षांच्या फेऱ्यातून एकरी सात ट्रेलर शेणखत घालून शेताला विश्रांती द्यायाची व त्या वेळेत उपलब्धतेनुसार मेंढरांचे वाढे बसवण्याची त्यांची मशागत पद्धत आहे. एखाद्याने त्यांच्या शेतावर यावे आणि विविध प्रयोगांचा राबता पाहून केवळ शेतीच्या अभ्यासात गुंतावे, असे त्यांच्या शेतावरील फेरीतून जाणवते. त्यांची ही पद्धत शेतकऱ्यांसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरणारी आहे.

Popular Keywords

“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद