'मामा' या शब्दातच स्नेह दडला आहे आणि गावाचं आणि निसर्गाचं नातंही जवळचं. गुहागर तालुक्यातील मुंढर या गावातल्या समीर साळवी यांच्या कृषी पर्यटन केंद्रावर गेल्यावर या दोन्ही शब्दातला अर्थ मूर्त रुपाने समोर दिसतो आणि गावाकडच्या या अद्भूत दुनियेत पर्यटक आनंदाने रमतो. 'फळबागांची शोभा पाहुया, मामाच्या गावाला जाऊ या..' असे म्हणतच जणू तो इथून परत फिरतो.
मुंढर हे गाव गुहागरपासून साधारण २० किलोमीटर अंतरावर आहे. गुहागरहून चिपळूणकडे जाताना चिखली गाव ओलांडल्यावर डावीकडे मुंढर फाटा लागतो. या गावात गेल्यावर उजव्या बाजूला असलेला 'माझ्या मामाचा गाव' असा फलक आपले लक्ष आकर्षून घेतो. मोकळ्या माळरानातून पुढे जात निसर्गरम्य परिसरात आपण येऊन पोहचतो. समोरच दिसणारी नारळाची झाडं आपलं स्वागत करतात. बाजूला चार-पाच मांजरी लाडीकपणे जवळ येऊन जणू तुम्ही तिथे आल्याचा आनंद व्यक्त करत असतात. हवेची थंड झुळूक प्रवासातला थकवा घालवते. साळवी दाम्पत्याने केलेल्या स्वागतानं तुम्ही काही वेळातच 'आपलं गाव' विसरून 'मामाच्या गावात' रमता.
विजय साळवी हे मुंबईत एका कंपनीत नोकरीला होते. त्यांचं सासर अर्थात त्यांचा मुलगा समीर याचं आजोळ मुंढर गावचं. निवृत्तीनंतर काहीतरी उत्पन्नाची सोय हवी म्हणून त्यांनी या गावात जागा घेऊन नारळाची बाग लावली. सुरुवातीला समीरचे आजोबा या बागेकडे लक्ष देत. मात्र वाढत्या वयामुळे त्यांना नंतर लक्ष देणे कठीण झाले. अशावेळी समीर ६ महिने कॉलेजमध्ये आणि ६ महिने गावातल्या बागेकडे लक्ष द्यायला जात असे. आपल्या आजोळच्या मंडळींशी चर्चा करताना त्याला कृषी पर्यटनाची कल्पना सुचली.
समीरची आई सुजाता साळवी यांना वडिलांपासून शेतीकामाचा वारसा मिळालेला असल्याने त्यांनी बागेकडे विशेष लक्ष द्यायला सुरुवात केली. समीरने पर्यटन केंद्र सुरू करण्याकडे लक्ष दिल्यानंतर साळवी दाम्पत्य शहरातली नोकरी सोडून मुंढरला आले. बागेला कल्पकतेने वेगळा आकार देण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला आपल्या घरातील एका खोलीपासूनच या कामाची सुरुवात झाली. ओळखीच्या मंडळीच्या माध्यमातून केंद्राची प्रसिद्धी झाल्यावर पर्यटकांची संख्या वाढू लागली आणि पर्यटकांची मागणी पूर्ण करण्यासाठी आणखी चार खोल्या बांधण्यात आल्या.
साडेबारा एकर क्षेत्रात पसरलेल्या या बागेत येणाऱ्या पर्यटकांच्या आनंदासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मुलांना हाताने नारळ तोडून ते सोलण्याचा सुंदर अनुभव येथे घेता येतो. पाण्यात डुंबण्याची मजा घेण्यासाठी बागेत हौद तयार करण्यात आला आहे. शिवाय बाजूच्या नदीवर देखील असा अनुभव घेता येतो. बाग डोंगरावर असल्याने तरुणांना ट्रेकींगची मजाही अनुभवता येते. गजबजाटापासून दूर शांतनिवांत ठिकाण असल्याने दोन-तीन दिवसाच्या मुक्कामात सर्व शीण घालवता येतो.
बागेत अननस, टरबूज, भाजीपाला आदींची लागवड केली असल्याने लहान मुलांना शेतातली मज्जा अनुभवता येते. झाडाला कोकम कसे लागते, अननसाचे उत्पादन कसे घेतले जाते, हे प्रत्यक्षात बघताना मुले या बागेत रमून जातात. फळप्रक्रियेची कामे देखील पर्यटकांना जवळून पाहता येतात. बागेतील दगडांवर केलेले सुंदर रंगकाम बागेची शोभा वाढविणारे आहे. एकूणच कुटुंबासोबत सहलीची मजा लुटण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व बाबी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला आहे. सोबत पारंपरिक नृत्य पाहणे, बैलगाडीची सफर किंवा केळीच्या पानातलं जेवण या गोष्टी पर्यटनाचा आनंद द्विगुणीत करतात. परदेशी पर्यटकांना अंगण सारवणे किंवा गांडूळ खत तयार करणे असे नाविन्यपूर्ण अनुभव घेताना खूप मजा वाटते.
या बागेचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. या बागेच्या माध्यमातून शेतीतले अनेक प्रयोग साकारण्यात आले आहेत. शेतीतले नवे तंत्र आत्मसात करून सुजाताताई त्याचा प्रयोग या बागेच्या परिसरात करतात. त्यांनी ३८ गुंठ्यात १० टन कलिंगडाचे उत्पादन घेतले आहे. अनेक शेतीशाळांना मार्गदर्शन करण्यासाठीदेखील त्या जातात. एकात्मिक पीक संरक्षणाचे तंत्र वापरून त्यांनी ही बाग फुलविण्यात मोलाचे योगदान दिले आहे. डिफ्युजर तंत्राचा वापर परिसरात प्रथमच त्यांनी केला आहे.
शेतीचा विकास करताना त्याच माध्यमातून पर्यटन व्यवसाय वाढविण्यासाठी समीर आणि त्याच्या आई-वडिलांचे प्रयत्न सुरू आहेत. गुहागर तालुक्यातील या पहिल्या कृषी पर्यटन केंद्राने इतरांनाही या व्यवसायाकडे आकर्षित केले आहे. काही शेतकऱ्यांना या संदर्भात साळवी कुटुंबिय मार्गदर्शनदेखील करतात. कोकणातील निसर्गाच्या माध्यमातून इथल्या युवकांना रोजगार मिळावा ही त्यांची प्रामाणिक इच्छा आहे. त्यांनी स्वत:च्या शेतावरदेखील 'कमवा आणि शिका' या तत्वानुसार विद्यार्थ्यांची सोय केली आहे. काहीतरी नवीन करताना निसर्गाच्या सहवासात आयुष्य घालविण्याची साळवी कुटुंबाची ही अभिनव कल्पना निश्चितच कौतुकास्पद आहे आणि तेवढीच मार्गदर्शकही.