पारंपरिक शेती पद्धतीला फाटा देत या किमयागार शेतकऱ्याने हळद, ऊस व केळीच्या लागवडीतून समृद्धी आणली आहे. आज या शेतकऱ्याने घडविलेली हरितक्रांती बघण्यासाठी हातगावमध्ये शेतीतज्ज्ञांची रेलचेल पाहावयास मिळते.
एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्येने नैराश्य आलेल्या विदर्भात शेतकऱ्यांकडून होणारे नवनवीन प्रयोग कृषी क्षेत्राला उभारी देणारे ठरत आहे. हातगावचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक रामगीर शंकरगीर गिरी यांनी आपल्या शेतात कृषीक्रांती घडविली आहे. वडिलोपार्जित शेतीचा व्यवसाय असल्याने शेती करण्याची आवड असलेल्या गिरी यांनी २००९ मध्ये निवृत्तीनंतर पूर्णवेळ शेतीकडे लक्ष देण्यास सुरूवात केली. सुरुवातीला पारंपरिक कापूस, सोयाबिन पीक घेत असताना त्यांनी आपल्या कल्पक वृत्तीतून अधिक पैसा मिळवून देणाऱ्या नगदी पिकांकडे लक्ष वळविण्यास सुरूवात केली.
प्रथमत: नांदेड जिल्ह्यातील हदगाव भागात हळदीचे विक्रमी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या यशोगाथेने त्यांना हळद पीक घेण्यासाठी प्रवृत्त केले. आपल्या पाच एकर शेतीमध्ये हळद लागवड करण्याचे ठरविल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष हदगावला भेट दिली. त्यानंतर प्रतिभा व शेलम या दोन जातीचे तब्बत ५० क्विंटल हळदीचे बेणे आणून त्यांनी सुप्तावस्थेत ठेवले. शेतीची खोलगट नांगरणी व वखरणी करुन रोटाव्हेटर मारले व पाच फूट अंतराने एक ते दीड फूट उंचीचे बेड पाडून हळदीची लागवड केली. आज रोजी पाच ते सहा फुटापर्यंत हळदीची उंची वाढली असून झाडांना भरपूर फुटवे निघाले आहेत. गिरी यांच्या मते वाळलेल्या हळदीचे एकरी ५० क्विंटल उत्पन्न आणि प्रति क्विंटल दहा हजार भाव गृहीत धरल्यास एकरी ४ लाख ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळू शकते.
त्यांनी केवळ हळदीचीच लागवड केली नसून औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथून माहीम जातीचे अद्रकाचे बेणे आणून हळदीप्रमाणेच त्याचीही लागवड केली आहे. त्यांच्या अद्रकचा प्लॉट सुद्धा पाहण्याजोगा आहे. फेब्रुवारी २०११ मध्ये त्यांनी आपल्या शेतात केळीच्या ग्रॅंड-१ जातीची उतीसंवर्धित ८ हजार रोपांची लागवड केली आहे. केळीच्या झाडांना भरघोस घड पडले असून एका महिन्यात केळीचे सुद्धा चांगले उत्पन्न अपेक्षित आहे. पाच एकर क्षेत्रात त्यांनी दर्जेदारपणे उसाची लागवड केली असून खुले २६५ या जातीचा ऊस लावला आहे. मागील वर्षी त्यांना एकरी ८० टन उसाचे उत्पन्न मिळाले होते.
गिरी यांनी शेतात ठिंबक सिंचनाची सोय केली असून पिकांवर रोग येऊ नयेत म्हणून ते स्वत: जातीने खबरदारी घेतात. नेटाफिम कंपनीचे अमरावती येथील विभागीय ॲग्रोनॉमिस्ट जेरासे यांच्या मार्गदर्शनामुळे त्यांना ही किमया साधता आली, असे ते सांगतात. आपल्या प्रमाणेच इतर शेतकऱ्यांनाही शेतीची किमया साधता यावी म्हणून त्यांनी गावात शेतकऱ्यांचे गट निर्माण केले आहेत.
शिक्षक म्हणून कार्यरत असताना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविले गेलेल्या गिरी यांच्यापासून इतर शेतकरीही प्रेरणा घेतील, असेच हे यश आहे.