तुळजापूरच्या आसपासचा बालाघाटचा डोंगर म्हणजे कधीकाळी उघडा बोडका असा डोंगर होता. डोंगरावर असणार्यांची शेती म्हणजे केवळ नावालाच! जिकडे तिकडे कुसळंच दिसायची. मात्र याच ठिकाणी अहोरात्र मेहनत, जिद्द आणि चिकाटीने सत्यवान सुरवसे या शेतकर्याने माळरानावर द्राक्षाची बाग फुलवली. केवळ मराठवाडय़ातीलच नव्हे तर राज्याच्या इतर भागातून तसेच कर्नाटक, आंध्र प्रदेशातील द्राक्ष विक्रेते सुरवसे यांच्या बागेत येऊन द्राक्ष खरेदी करत आहेत. तुळजापूरपासून जवळच असणार्या होर्टी या छोटय़ाशा गावातील सत्यवान सुरवसे यांनी स्वकष्टातून आणि योग्य मार्गदर्शनामुळे साधलेली ही किमया अनेकांना प्रेरणा देणारी आहे!
पारंपरिक शेती करणार्या कुटुंबातील सुरवसे यांनी आपल्या भावांच्या मदतीने डोंगराळ माळरानावर अक्षरश: नंदनवन फुलवले. केवळ दहावी पास असतानाही प्रागतिक शेतीचा मार्ग त्यांनी चोखाळला. सुरुवातीला बँकेमार्फत कर्ज घेऊन ही द्राक्ष बाग उभी केली. स्वत: मेहनत घेऊन बाग फुलवली. विंधन विहिरीचे पाणी ठिबक सिंचनाद्वारे प्रत्येक झाडाला देण्याची व्यवस्था त्यांनी केली. रासायनिक खतांऐवजी त्यांनी सेंद्रीय खताचा वापर केला. त्यामुळे उत्पादनात चांगलाच फरक पडला.
उत्पादन वाढीसाठी पश्चिम महाराष्ट्रात जाऊन त्यांनी तेथील द्राक्ष उत्पादकांचे मार्गदर्शन घेतले. या मार्गदर्शनाचा त्यांना खूपच उपयोग झाला. द्राक्षांपासून मिळालेल्या उत्पादनातून त्यांनी अधिक जमीन विकत घेतली. त्या ठिकाणीही द्राक्ष बाग लावली. गेल्या वर्षी त्यांनी आपल्या ५५ एकरात तब्बल ४०० टन द्राक्ष उत्पादन घेतले. याशिवाय आपल्या प्रमाणेच परिसरातील इतर शेतकर्यांनाही फायदा व्हावा या हेतूने त्यांनी बेदाणा उद्योग सुरु केला. यामुळे या शेतकर्यांचाही फायदा झाला.
सुरवसे त्यांच्या या आर्थिक समृद्धीचे सार नेमक्या शब्दांत मांडतात, शेती करायचे म्हटले तर शेतकर्यांनी स्वत: काम केले पाहिजे. शेती करताना जिद्द व चिकाटी आवश्यक आहे. स्वकष्टाशिवाय पर्याय नाही. शेतात स्वत: राबल्याशिवाय यश दिसत नाही.
सुरवसे यांच्या या कष्टाची फळे त्यांना आता चाखता येत आहेत. विविध राज्यातील व्यापारी स्वत: बागेत येऊन द्राक्षांची खरेदी करीत आहेत. वाहतूक खर्चातील बचत म्हणजे नफ्यात वाढ असे गणित ते मांडतात. एवढी मोठी बाग जोपासताना औषध फवारणी व मजुरीचा येणारा मोठा खर्च लक्षात घेऊन त्यांनी घरच्या पशुधनाचा वापर सेंद्रीय खत म्हणून केला. त्यांच्या या प्रयोगाला यश आले. त्यामुळे इतर शेतकरीही आता त्यांची बाग पाहण्यासाठी रांगा लावत आहेत. सुरवसे यांच्या कष्टाला मिळालेली ती पावतीच आहे!
No comments:
Post a Comment