महाकृषि संचार सेवा शेतकर्यांना अतिशय उपयुक्त ठरेल. शेतकर्यांना या उपक्रमाचा शेतीच्या विकासासाठी करून घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
राज्य शासनाचा कृषी व पणन विभाग आणि भारत संचार निगम लिमीटेड यांच्या महाकृषी संचार सेवेचा गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे हा कार्यक्रम झाला.
मुख्यमंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, मोबाईलच्या तंत्रज्ञानामुळे अनेक बदल झाले आहेत. बँकिंगच्या क्षेत्रात मोबाईलमुळे बदल झाले आहेत. असेच बदल आता इतर क्षेत्रातही होतील. त्याची आज या महाकृषी संचार योजनेपासून सुरवात झाली आहे. या सेवेमुळे शेतकर्यांच्या जीवनात निश्चितच बदल होतील. मोबाईलच्या माध्यमातून शेतकर्यांचे एक महाकुटुंब निर्माण झाले आहे. शेतकर्यांच्या जीवनातील ही अतिशय महत्वाची बाब आहे.
कृषिमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, या सेवेमुळे विद्यापीठात सुरू असणारे संशोधन, शासनाचे विविध कार्यक्रम, योजना, बी-बियाणे यांची माहिती शेतकर्यांना मिळेल. आतापर्यंत पाच लाख शेतकरी या सेवेचे सदस्य झाले आहेत. आणखी अडीच लाख शेतकरी या सेवेत सहभागी होऊ इच्छितात.
ग्राम विकास मंत्री जयंत पाटील, जलसंधारण मंत्री डॉ. नितीन राऊत, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय मंत्री मधुकरराव चव्हाण, कृषी राज्यमंत्री गुलाबराव देवकर, फलोत्पादन राज्यमंत्री राजेंद्र गावित, कृषी विभागाचे प्रधान सचिव डॉ. सुधीरकुमार गोयल आदी उपस्थित होते. कृषी आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी आभार मानले.
महाकृषी संचार सेवेबाबत
कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि शेतकर्यांना मोबाईल सीयूजी सेवा उपलब्ध करून देणार. यामुळे शेतकर्यांना कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्याशी कमी खर्चात संपर्कात राहणे सोयीचे होणार आहे. उपक्रमात सहभागी होणार्या शेतकर्यांना हवामानविषयक सल्ला, खते, बी-बियाणे यांची उपलब्धता, गुणवत्ता, कृषी विभागाच्या योजना इत्यादींच्या माहितीसाठी तत्काळ देणे सोयीचे होणार आहे. तसेच शेतकर्यांना एसएमएसव्दारे शेतीबाबत विनामुल्य सल्ला दिला जाणार आहे.
No comments:
Post a Comment